आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमची अभिमानाची लेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्पिता हे आमच्या गोड मुलीचे नाव. आम्ही अनाथ आश्रमातून दत्तक घेतलेली आमची अभिमानाची मुलगी! काही कारणास्तव आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आणि अनाथाश्रमातून मुलगा न घेता मुलगीच घ्यावी या निर्णयापर्यंत पोहोचलो. आश्रमातील सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर प्रत्यक्ष मूल दाखवण्याची वेळ आली. मनात खूपच धास्ती होती. कसे मूल असेल? आपण ते व्यवस्थित सांभाळू का वगैरे प्रश्न मनात रुंजी घालत होते. अशातच संचालिका श्रीमती तगारे मॅडम (भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद) यांनी आम्हाला दोन मुली दाखवल्या. दोघींपैकी एकीची निवड करणे अवघड होते कारण दोघींनाही आईबाबांची गरज होती. एकीला निवडले तर दुसरीवर अन्याय तर करत नाही ना, ही भावना मनाला स्पर्शून जात होती; परंतु एकीचीच निवड करणे गरजेचे होते.
या दोन मुलींमध्ये आजची अर्पिता व त्या वेळची ज्ञानेश्वरी होती. गोड हसणारी, ओळख परिचय नसतानाही न रडता सहज आमच्याकडे आली. दुसरी सारखी रडणारी. अर्पिताच घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर अर्पिताला घरी आणण्याची प्रक्रिया पार पडली, अर्पिताला आमच्याकडे तिचे हक्काचे आईवडील म्हणून सुपूर्द करण्यात आले. तिला आम्ही आणले तेव्हा आम्हीच दोघेही तिचे स्वागत करणारे होतो. आमची मुलगी म्हणून आमच्या आयुष्यातील सर्वात मोलाचा, आनंदाचा आणि अभिमानाचा तो क्षण. कधीच न विसरता येणारा.
तिच्यासाठी खेळणी, ड्रेस, दुधासाठी वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्या, सारे काही जगावेगळे करण्याची इच्छा आम्हाला होती, अजूनही आहे. एखाद्याच्या दु:खात आनंद मानून त्याला आपले करण्याचा निर्णय आम्हा दोघांचाच. दुस-याचे दु:ख आपण थोडे तरी कमी करू शकतो या भावनेने आम्ही तिला दत्तक घेतले. तिच्या नावापुढे आम्ही दोघांची नावे लावली. (अर्पिता दीपाली रवींद्र पाटील) ख-या अर्थाने अर्पिताने आमची दोघांची मुलगी म्हणूनच आपल्या समाजासमोर यावे हेच आमचे स्वप्न आहे.
ती खरोखरच खूप गोड मुलगी आहे. माझे सर्व नातलग तिच्याकडे एक आश्रमातील मुलगी या नात्याने वागतात, बोलतात; परंतु ती कुणाला, दादा, काका, मामा, मामी, काकू अशा वेगवेगळ्या नावांनी सगळ्यांना तोंडभरून पुकारते. त्यांच्याशी अगदी आनंदात गप्पा करून आपलेसे करते.
जरी मी नसेल जन्म तिला दिला
तरी ती आमचीच आहे.
हृदयातील आणि उदरातील
स्वत:ची ती माउली आहे.
सोडून दिले जरी असेल जन्मदात्रीने तिला
त्यात तिचा गुन्हा काय आहे?
प्रत्येक घराघरातल्या मुलींसारखी
ती एक देवाची देणगी आहे!
अर्पिताला हिंदी, मराठी छान बोलता येते. मम्मीला जास्त हिंदी बोलता येत नाही म्हणून मराठी बोलते. पप्पांना हिंदी बोलता येते म्हणून पप्पांशी हिंदी बोलते. मी आजारी असेन तर तिला चिंता लागते. ऊठ, आजारी पडू नकोस. आराम कर. काम करू नकोस.
ती आमच्या अभिमानाचा नि प्रेमाचा विषय आहे.