आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी न मी राहते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नृत्य आणि संगीताच्या तालावर मराठी मध्यमवर्गीय घरांमधूनही अलीकडच्या काळात पावलं थिरकताना दिसतात. लग्नप्रसंगातही त्यासाठी खास दिवस राखून ठेवला जातो. २९ एप्रिल या आंतरराष्ट्रीय नृत्यदिनाच्या निमित्ताने कथ्थक शिक्षिका व कोरिओग्राफर अशा दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या एका नृत्यांगनेचं हे मनोगत. खेरीज, या दिनाचं औचित्य साधून नृत्य का आवश्यक आहे, ते सांगणारा एक लेख पान तीनवर.

नृत्याचा किडा कधी चावला, ते नक्की आठवत नाही; पण लहान असल्यापासून मी सतत नाचत असायचे, असं आई म्हणते. अगदी कचरा टाकायला बाहेर जातानाही मी नाचतच जायचे, त्यावरून ओरडाही खाल्लाय मी खूप. माझं लहानपण गेलं मुंबईतल्या परळ या कामगारवस्तीत. गणपती व इतर सण दणक्यात साजरे व्हायचे तिथे, अजूनही होतात म्हणा. तिथे पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात नाचले. आमचा भाग तसा गरीब वस्तीचा, कथ्थक वा भरतनाट्यम असे शास्त्रीय नृत्य शिकवणारे क्लास जवळ नव्हते, ते होते दादरला. आमच्या ओळखीची एक ताई आशा जोगळेकरांकडे शिवाजी पार्कला नृत्य शिकायला जाणार होती, मग आईला वाटलं मी तिच्यासोबत जाऊ शकेन. आठवीत होते तेव्हा. ती माझी शिस्तबद्ध नृत्याशी पहिली ओळख. या माझ्या गुरू, ज्यांना मी मावशी म्हणत असे, अगदी आता, काही दिवसांपूर्वी त्या गेल्या, तोपर्यंत त्यांचं माझ्यावर लक्ष होतं.

नाच मला आवडायचाच, पण मी मावशींकडे शिकायला लागल्यावर माझ्यावर योग्य ते संस्कार झाले. मला सगळे गुरू खूप उत्तम मिळाले. मावशी तर जागतिक ख्यातीच्या, रमेश पुरव, संदीप सोपारकर हे गुरूदेखील त्याच तोडीचे. मला खंत एवढीच की, मी स्वत: फार परफाॅर्म करत नाही. इतरांना शिकवण्यात आणि इतरांचं नृत्य बसवण्यातच माझा फार वेळ जातो. मी आळशी आहे, हे जास्त खरं आहे. त्यामुळेच रोजचा रियाझ होत नाही. पण अजूनही मला माझ्या विद्यार्थ्यांना ठुमरी करून दाखवताना जो आनंद मिळतो, तो वेगळाच असतो. एक वेगळंच कनेक्शन लागलेलं असतं. नाचताना मी माझी राहिलेली नसते. मला तितकाच आनंद शिकवतानाही मिळतो. आताची पिढीही तितकीच गंभीर आहे शिकण्याबद्दल, प्रामाणिक आहे, त्यांनाही शास्त्रीय नृत्य शिकण्याचा तितकाच कळवळा आहे, जितका आम्हाला होता. त्यांच्यात जास्तीचंही काही आहे, ते म्हणजे तत्परता. त्यांच्या हाताशी आता इंटरनेट, मोबाइल आहेत. कोणतंही गाणं, नृत्य, वेगळा नृत्यप्रकार ते पटकन शोधतात. जे आम्हाला गुरुंकडून मिळालं, तेच आमच्या माध्यमातून त्यांना मिळतंय आणि तीही प्रामाणिक, मेहनती, विनम्र आहेत, असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं.
मेहनत आवश्यक आहेच, जशी इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी असते. रूपारेल कॉलेजला नाटक/नृत्य यांना खूप वाव होता, म्हणून मी तिथे हक्कानं अॅडमिशन घेतली. अभ्यासाच्या जोडीनेच नृत्याच्या परीक्षा देत विशारद झाले. मग मी सचिन शंकर बॅले ग्रुपमध्ये, नाट्यशालामध्ये कांचन सोनटक्केंसाेबत विशेष मुलांसाठी काम केलं. हे करता करताच मी लाॅ केलं, एक वर्ष तर यूपीएससीचाही अभ्यास केला. कारण बाबांची इच्छा होती की, मी युनिफाॅर्ममधली नोकरी करावी, आयपीएस वगैरे. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, हे काही आपलं काम नाही. मग मी परळलाच एक नृत्याचा क्लास सुरू केला. त्या सुमारास माझं लग्न झालं. नवऱ्याला सांगितलं, मला काही कायद्याची प्रॅक्टिस, धावतपळत ट्रेन पकडून आॅफिसला जाणं जमायचं नाही. त्यानेही ते मानलं. आणि मी बोरिवलीलाही नृत्याचा क्लास सुरू केला. दोन्ही ठिकाणी मी शिकवत होते. त्याच दरम्यान माझा पहिला व्हिडिओ अल्बम आला, ढगाला लागली कळ आणि तो प्रचंड गाजला. मग माझा पहिला चित्रपट आला, एक होती वादी. यानंतर काम मिळतच गेलं. मी शंभरहून अधिक चित्रपटांची कोरिओग्राफी केली. ईटीव्हीवरचा, बहुधा आपल्याकडचा पहिला डान्स रिअॅलिटी शो, नूपुर मी केला. मग काही शोजमध्ये कोरिओग्राफी केली, काहीमध्ये परीक्षक होते. चित्रपट करायचे म्हणून मी सिनेमॅटोग्राफीचाही छोटासा अभ्यासक्रम केला. मला मी बसवलेलं नृत्य कसं दिसायला हवं, ते माहीत होतं. ते कसं दाखवायचं, हे कॅमेरा ठरवतो, म्हणून ते शिकले. ‘देवकी’ चित्रपटासाठी मला राज्य पुरस्कार मिळाला.

हे करत असतानाच मी शिकत होते आणि शिकवतही. मी थोडी पाश्चिमात्य पद्धतीची नृत्यंही शिकले. कथ्थकमध्ये अलंकार पदवी घेतलीच होती, आता चारेक वर्षांपूर्वी नागपूरच्या कालीदास विद्यापीठातून नृत्य विषय घेऊन मास्टर इन फाइन आर्ट‌्स केलं. एकटीने परफाॅर्म करायचं, हे माझं स्वप्न आहे. सध्याच्या ज्या जबाबदाऱ्या घेतल्यात त्या पाहता ते जरा कठीण आहे, पण अशक्य नाही. मावशी आता सारखी आठवण करून द्यायला नाहीत, ते फार जाणवतं आता.
(deepalivichare.03@gmail.com)