आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंगेवाली बाईस निर्वाणीचे पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 काही लोक अजेंडा घेऊन मैदानात उतरतात. काही प्रोपागंडा करण्यासाठी मैदानात पाऊल टाकतात. पण तुझ्या "दी मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस' नावाच्या कादंबरीत विद्यमान शासन व्यवस्थेविरोधातला अजेंडा उघड झाला आहे आणि त्यातला प्रोपागंडाही स्पष्टपणे कळतोय... म्हणूनच तुझी ही कादंबरी जाणीवपूर्वक वाचली. वाचली म्हणजे काय, बिटविन द लाइन्स, अंडरकरंट्स असं सगळं थांबून-थांबून बारकाईने अॅनलाइज केलं. प्रत्येक पान एकदा नव्हे दोनदा नजरेखालून घातलं. म्हटलं बघू या, जीवनाचं असं कोणतं तत्त्वज्ञान, कोणतं वैश्विक सत्य उघड केलंस ते. पण तू तर एकदमच चतुर निघालीस...
 
पंगेवाली बाईस,
….....
पत्रलेखन परंपरेला धरून असलेला या पुढचा मायना मी लिहिणार नाही. कारण साष्टांग नमस्कार घालण्याइतपत तुझी या देशात पात्रता शिल्लक नाही. सप्रेम नमस्कार म्हणण्याइतपत तुला आता सामाजिक प्रतिष्ठा राहिलेली नाही. त्यामुळे विनंती विशेषचाही प्रश्न येत नाही.
तुझी "दी मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस' नावाची कादंबरी वाचली. वाचली म्हणजे काय, त्यातल्या बिटविन द लाइन्स, अंडरकरंट्स असं सगळं थांबून-थांबून बारकाईने अॅनलाइज केलं. प्रत्येक पान एकदा नव्हे दोनदा नजरेखालून घातलं. म्हटलं बघू या, जीवनाचं असं कोणतं तत्त्वज्ञान, कोणतं वैश्विक सत्य उघड केलंस ते. पण तू तर एकदमच चतुर निघालीस. 
कादंबरीची पार्श्वभूमी एक्स्पेक्टेड. पात्रं एक्स्पेक्टेड. घटना-प्रसंग एक्स्पेक्टेड. पात्रांची कहाणी-वेदना, आक्रोश-आकांत सारं काही एक्स्पेक्टेड. आणि ओळखीचे स्टिरिओटाइप्स असूनही अशी काही कादंबरी रंगवलीयस की, एखाद्याच्या डोक्यातून ती सहजासहजी जाऊच नये. पात्रा-पात्रांमधले संवाद आठवून रात्रीचा डोळा एखाद्याचा लागूच नये. आफताब उर्फ अंजूम, सद्दाम हुसेन, तिलोत्तमा उर्फ तिलो, मुसा, नागा, बिप्लब दासगुप्ता उर्फ गार्सन होबार्ट, संगीता मॅडम "हरामजादी', डॉ. आझाद भारतीय, आणि कोण कोण... व्यवस्थेने नाकारलेल्या  वंचितांचं संमेलनच भरवलंस तू. 
 
जन्मापासूनच स्त्रीसुलभ आचार-विचार असलेला आफताब नावाचा तरुण कोंडमारा सहन न झाल्याने हिजड्यांचा "ख्वाबगाह' अशी ओळख असलेल्या अलिप्त जगात जाऊन मुक्तीचा अनुभव घेतो. पुढे अंजुम अशी ठसठशीत ओळख घेऊन स्वत:हून त्या व्यवस्थेतून तिरमिरीत बाहेर पडतो. थेट कब्रस्थानातच "जन्नत गेस्ट हाउस' नावाने स्वत:चं बस्तान बसवतो. अंजुमच्या संगतीला आंधळा इमाम येतो. गाई-गुरांची कातडी सोलणारा दलित "सद्दाम हुसेन' येतो. "जंतर-मंतर'वरच्या सरकारविरोधी आंदोलनात अंजुम शिरते तर तिला तिथे अलम दुनियेला फाट्यावर मारून स्वत:च्या अटींवर आयुष्य जगणारी आर्किटेक्ट तिलो भेटते. आजन्म आंदोलनांना वाहून घेतलेला डॉ. आझाद भारतीय भेटतो. आंदोलनस्थळी एका नक्षली महिलेनं टाकून दिलेलं मूल सापडतं. ती ते "ख्वाबगाह'त घेऊन येते. पोटच्या पोराप्रमाणे त्याला वाढवते. तिलोला घर भाड्याने देणारा बिप्लब दासगुप्ता हा इंटेलिजन्स ब्युरोचा ऑफिसर असतो. तिलोचे कॉलेज मित्र मुसा आणि नागा अनुक्रमे काश्मिरी फुटीरवादी, लष्कराच्या मर्जीतले पत्रकार बनलेले असतात. हे तिघेही मनाने कधी ना कधी तिलोमध्ये गुंतलेले असतात. अंजुमच्या मनावर गुजरातच्या दंगलीचे व्रण कोरले जातात. तिलो काश्मीरमध्ये लष्कराने उभारलेल्या टार्चर कॅम्पचे अनुभ‌व घेते. या सगळ्यांच्या आयुष्याचा माग काढत, या सगळ्यांच्या वाटा-आडवाटा धुंडाळत तुझी ही कादंबरी प्रस्थापित धर्म-समाज आणि शासन व्यवस्थेचा क्रूर-अति क्रूर चेहरा तेवढा उघड करत जाते. हिंदी, उर्दू, काश्मिरी, मल्याळम, तेलुगू, संस्कृत अशा कितीतरी भाषांना स्पर्श करते. नादमय आणि उपरोधिक भाषाशैली, सुन्न करणारी वाक्यरचना, आघात करणारे शब्द पानापानांवर आपलं अस्तित्व दाखवत राहतात. हे सगळं ठीकचय, मुरलेली लेखिका या नात्यानं तेवढं तर तुला यायलाच हवं. पण कादंबरी लिहिताना Making Of Developed India (MODI)मधला एकही आनंदी माणूस तुला दिसला नाही? काय म्हणावं या कर्मदरिद्रीपणाला? तुला कळत कसं नाही, "दी ग्रेट इंडियन मिडल क्लास' ही शिवी आहे की कौतुक, याचा अंदाज नसलेले समस्त भारतीय त्यांचा सर्वोच्च आनंद मॉलमध्ये शोधतात, सिनेमातल्या नट-नट्यांमध्ये शोधतात, क्रिकेटच्या मॅचमध्ये शोधतात, शासनसत्तेने भरवलेल्या उत्सव-महोत्सवांत, पंतप्रधानांच्या बहारदार भाषणात शोधतात, आणि तुझी ही पात्रं आनंद कशात शोधतात? तर एका कब्रस्थानात, दहशतवादाच्या आगीत सापडलेल्या काश्मिरात, पीर-फकिरांच्या दर्ग्यात, हिजड्यांच्या "ख्वाबगाह'त, आदिवासींची वस्ती असलेल्या जंगलात. तुला काय सांगायचंय, कोणतं तत्त्वज्ञान ऐकवायचंय? माणसाला असलेली नात्याची आस ही खरं तर वेदनेची आस असते? प्रत्येक नवं नातं सोबत वेदना घेऊन येतं? माणूस संपला की, फक्त एक तेवढी वेदना संपते? माणूस नव्या वेदनेसह जगतच राहतो? पण कशासाठी?
"Happy families are all alike, but every unhappy family is unhappy in it's own way...' लिओ टॉलस्टॉयचं हे अजरामर वाक्य खरं करण्यासाठी मेंदूला झिणझिण्या आणण्याइतकं नागडं जग रंगवावं एखादीनं? अरे, तेल लावत गेला तुझा अटमोस्ट हॅपिनेस. लिहून घे, पाहिजे तर बाँडपेपरवर मी तुला लिहून देतो. तुझ्या कादंबरीतल्या पीडित-वंचित पात्रांना या जगात स्थान नाही. व्यवस्थेला हिजड्यांच्या, दलितांच्या, मुस्लिमांच्या, आदिवासींच्या असण्या-नसण्याशी देणं-घेणं नाही. पण मी तर म्हणतो, तुझ्या पात्रांची जगण्याची लायकीच नाही. तरीही लेखक-समीक्षक जेरी पिंटो तुझ्या या कादंबरीची तारीफ करताना म्हणतो, "an important novel, an interesting one, seriously flawed yes, but ambitious in a way that will make many of us want to punish it and the author.'
कादंबरीकार करण महाजनला तर तू जागतिक दर्जाची लेखिका आहेस, असं वाटतं. "न्यूयॉर्क टाइम्स'मध्ये तुझ्या कादंबरीवर लिहिताना तो म्हणतो, "it is a relief to encounter the new book and find Roy the artist fully and brilliantly intact: prospering with stories and writing in gorgeous, supple prose...'
कुणी काहीही म्हणो, लेखिका असशील तू तुझ्या घरची. 
 
बाय द वे, तुला घर-दार, आई-बाप, भाऊ-बहीण, काका-मामा कुणी आहे की नाही? तू गेल्या २० वर्षांत जी काही गरळ ओकत आलीय आणि या कादंबरीत तू जो काही कहर केलाय, त्यावरून तरी तू गावावरून ओवाळून टाकल्यासारखीच वाटतेस. अरे, ही कादंबरी आहे का काय आहे? वास्तव खूप बीभत्स असतं, सॅडिस्टिक माणसांनी भरलेलं असतं, पण म्हणून टॉर्चरची पानपानभर वर्णनं यावी? पात्रांच्या तोंडून कानातले केस जाळणाऱ्या शिव्यांचा भडिमार करवून घ्यावा? हेही मान्य की, वास्तवात आग लागल्याशिवाय कल्पनेत धूर काढता येत नाही, पण त्याला काही धरबंध? काही लिमिट? संस्कृती-परंपरेची काही चाड? ते उजवे म्हणतात, तेच खरं. डाव्यांना इंटरेस्ट कशात तर डिसरप्शनमध्ये. मांडलेला डाव मोडून टाकण्यामध्ये.
 
खरं तर या सगळ्याचा पुस्तकाचं कव्हर पाहिल्यावरच अंदाज आला होता. तू ढीग मेहनत घेतली असशील, पण असं कधी पुस्तकाचं कव्हर असतं का? कब्रस्थानातली कबर आणि तीसुद्धा टॉप अँगलने शूट केलेली. त्यावर पुन्हा लंडनमध्ये बसलेल्या कुणा कव्हर डिजायनरने म्हणे स्वत:ची क्रिएटिव्ह अक्कल पाजाळलीय. तुला यापेक्षा दुसरं काही सकारात्मक, पॉझिटिव्ह सुचलं नाही का? युपी इलेक्शनदरम्यान कब्रस्थान-शमशान या शब्दांवरून मोठं राजकारण झाल्याचं तुला दिसलं नाही का? गावात कब्रस्थान तयार होत असतील, तर शमशानही तयार झाले पाहिजेत... ही थेट माननीय पंतप्रधानांची मागणी तुझ्या कानी आली नाही का?  समोरच्याने चिखलात दगड मारला म्हणून आपणही मारावा? तुझ्यासारख्या स्वत:ला बुद्धिवादी म्हणवणाऱ्या बाईला शोभतं हे सगळं?
 
म्हणूनच कादंबरीच्या नावाखाली तू गाडलेली प्रेतं फक्त उकरून काढणार, याचा दाट संशय होताच मला. अरे मी म्हणतो, झालं गेलं माणसानं विसरून जावं. संधी मिळतेय म्हटल्यावर पुन:पुन्हा किती वेळा माती उकरत बसावं? या जगात काही चांगलं तुला दिसतच नाही का? अख्ख्या कादंबरीत प्रगतीचा "प्र' नाही आणि विकासाचा "व' नाही. इव्हेंट नाहीत, की अनाउन्समेंट नाहीत. जादूचे खेळ नाहीत, की त्वेषपूर्ण भाषणं नाहीत. स्मार्ट सिटी नाहीत. मेट्रो नाहीत. बुलेट ट्रेन नाहीत. रॉकस्टार रिसेप्शन नाही, ग्रँड वेलकम नाही. रेड कार्पेट नाही. स्वयंस्फूर्त ब्रँड अम्बेसेडॉर अमिताभ बच्चन नाही, की "भारतरत्न' सचिन तेंडुलकर नाही. हे सोडून बाकीचीच भरताड जास्त. सगळं कसं निराश-हताश-छद्मी-उपरोधिक. काय ती वाक्यं? "the streets of the city that comes alive only when it had to bury it's dead.'... प्रत्येक पानावर रडारड. धर्मवाद्यांची कापाकापी,लष्करी अधिकाऱ्यांनी काश्मिरी आणि आदिवासींचा केलेला छळ, फुटीरवाद्यांची घोषणाबाजी, दगाबाजी, संशय, विश्वासघात, खून, एन्काउंटर, एके-४७ रायफल, भ्रष्टाचारी अधिकारी, त्यांच्या लोचट बायका, उठता-बसता आई-बहिणीवरून शिव्या घालणारे पोलिस, पीडितांची मानसिक कुतरओढ, हिजड्यांचा भावनिक स्फोट… आणि या सगळ्याच्या जोडीला कबरीच कबरी. प्रेतंच प्रेतं. लिहून घे, तुझी ही कादंबरी कुणी वाचणार नाही. 
आणखी एक सांगायचं राहून गेलं. "अटमोस्ट हॅपिनेस'मधली गावं खरी आहेत, शहरं आणि मोहल्ले खरे आहेत. घटना-प्रसंग खरे आहेत, पात्रांची नावं खोटी असली तरीही खऱ्या जगातली ती खरीखुरी माणसं आहेत. तरीही तू या सगळ्याला कादंबरी म्हणण्याचा उद्दामपणा करतेस. पण तो तुझा प्रश्न आहे. 
 
आणि काय गं, वास्तवाच्या नावाखाली माजी पंतप्रधान, भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सामील "दुसरे गांधी', त्यांचा राजकीय महत्त्वाकांक्षेने पछाडलेला अँग्री यंग शिष्य, सबंध भारतवर्षावर गारूड केलेला "गुजरात का लल्ला' या व्यक्तिरेखा रेखाटताना दिल्लीची परवानगी घेतली होतीस का तू?
"मी अरुंधती रॉय उर्फ पंगेवाली बाई, ईश्वराला स्मरून असे लिहून देते की, देशाची इभ्रत मी जगापुढे टांगणार नाही. अन्यथा देशद्रोहाच्या गुन्ह्यास मी पात्र असेन...' असं अॅफेडिव्हिड लिहून दिलं होतंस का तू? मी ईश्वर-बिश्वर मानत नाही, असला शहाणपणा इथे सांगू नकोस. तुझ्या या शहाणपणाला किंमत शून्य आहे.
 
गेली वीस वर्षं वंचित-शोषितांवरचा अन्याय, अत्याचार बघून तुला म्हणे प्रश्न पडला होता. तुझ्या डोक्यात म्हणे तुंबळ रण माजलं होतं. त्या रणाचाच परिणाम म्हणून तू ही कादंबरी लिहिलीस. चांगलंय. चार वेगवेगळ्या दिशांना आकारास येणारं जग चितारायचं, भिन्न स्वभावाच्या, शारीरिक-मानसिक-भावनिक गरजा असलेल्या व्यक्तिरेखा जन्माला घालायच्या, त्यांचं म्हणून एक विश्व निर्माण करायचं, त्यातून आपल्याला हवा तसा अर्थ काढून संबंधितांना मेसेज द्यायचा, आपली विचारधारा वाचकांच्या गळी उतरवायची, देशोदेशींच्या बुद्धिजीवींची पसंती मिळवायची, हे काम वाटतं तितकं सोपं नाही. कादंबरीच्या फॉर्ममध्ये तर अजिबातच सोपं नाही. कारण, कल्पनेतलं का होईना, पण पात्र जन्माला घालायचं, सरावलेल्या पाणबुड्यासारखं त्याच्या अंतर्मनात शिरायचं, त्याची छिन्नविच्छिन्न वेदना-व्यथा आधी एकटीने जगायची, अनुभवायची आणि मग कागदावर उतरवायची, यासाठी मन खूप संवेदनशील-संयमी तरी हवं किंवा निबर-निलाजरं तरी. तू कुठल्या कॅटेगरीत बसतेस, हे तुलाच ठाऊक. याच्याशी कुणाला देणं-घेणं असण्याचं कारण नाही. पण एक सांगतो, या कादंबरीतली पात्रं डिट्टो तुझ्यासारखी आहेत. विपरीत परिस्थितीतही व्यवस्थेला शरण न जाणारी. आणि एवढं करूनही अंगात रग असलेली. "How to tell a shattered story? By slowly becoming everybody. No. By slowly becoming everything.' असं धाडसाने म्हणणारी. अँड रिअल डेंजर लाइज हिअर ओन्ली...
 
परवा कुणी तरी म्हणालं, वेदनेच्या प्रवाहाने ओलेत्या झालेल्या जमिनीत वेदनेचीच पिकं येणार. मी म्हणतो, कथा-कादंबरी म्हटली म्हणजे ती वेदनांनी भरलेलीच पाहिजे का? तसा काही नियम आहे का? कायदा आहे का? अरे, एखाद्या झुंडीने एकाला ठेचून मारलं आणि दुसऱ्याला नुसतंच जखमी करून सोडून दिलं, तर त्या जिवंत सोडून देण्यातली सकारात्मकता तुझ्या डोळ्यांना दिसत नाही का?
आपल्याला हे पण मान्यय की, काही लोक अजेंडा घेऊन मैदानात उतरतात. काही प्रोपागंडा करण्यासाठी मैदानात पाऊल टाकतात. पण तुझ्या या कादंबरीत विद्यमान शासनव्यवस्थेविरोधातला तुझा अजेंडासुद्धा उघड होतोय आणि प्रोपागंडासुद्धा कळतोय. तू आणि तुझे हितचिंतक याला साहित्य म्हणतात, कादंबरी म्हणतात; पण बाकीचे याला सरळसरळ देशद्रोह मानतात. हे बघ बाई, दिवस फार वाईट आहेत. इशारे समजून घे. आता फार वेळ न घालवता तू तुझं चंबूगबाळं आवरतं घे. सोमालियात जा, तिकडे बुरुंडीत जा, पण आता इथे एक क्षणही काढू नकोस. उद्या दिल्लीहून असा काही "मास्टरस्ट्रोक' मारला जाईल की, तुझ्या नावे एखादा पुरस्कारच जाहीर होऊन जाईल. मग बसशील बोंबलत. तू तो नाकारलास की दिल्ली म्हणेल, हे डावे असतातच नतद्रष्ट. आम्ही कौतुकाचा हात पुढे केला, त्यांनी तो नाकारला. ज्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच खरं! बरं एवढं म्हणून दिल्ली शांत बसणार नाही. सत्तेतले शिलेदार सोशल मीडियातल्या शिलेदारांना आदेश देतील. मग त्यानंतर जे काही होईल, त्याला दुसरं-तिसरं कुणी नाही तर केवळ आणि केवळ तूच जबाबदार असशील.   
 
तेव्हा ही शेवटची विनंती. तुझी या देशाला जराही गरज नाही. आता तुझ्यात जी काही सृजनाची आग आहे किंवा बौद्धिक मैथुनाची जी काही खाज आहे, ती तिकडे सोमालियात, बुरुंडीत जाऊन भागव.
 
मागे एका मुलाखतीत तुला उमाळे फुटले होते. म्हणे- Everything that I know is here! Everyone that I know! And I’ve never really lived outside, abroad, so the idea of going to live all alone in some strange country is also terrifying...
पण बिलिव्ह मी, तुझ्या राडेबाजीची तिकडेच अधिक गरज आहे.  
या उपर अधिक सांगणे न लगे...
तुझा हितचिंतक,
दीपांकर
divyamarathirasik@gmail.com