आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळपुटा उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रातिनिधिक  छायाचित्र - Divya Marathi
प्रातिनिधिक छायाचित्र
बसस्टँडमधला बाळांना स्तनपान करण्यासाठी असलेला ‘हिरकणी कक्ष’. पण तो कशासाठी? निसर्गदत्त नातेही पडद्याआड ठेवण्याची वेळ का यावी आपल्यावर? नेमक्या दुखण्याचा इलाज कधी करणार आहोत आपण?
 
कार्यक्रमानिमित्त सध्या गावोगाव फिरण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसचा वापर वाढलाय. आणि म्हणून वेगवेगळ्या गावांच्या बसस्टँडवर जाणं होत आहे. असंच एका बसस्टँडवर लहान बाळांना स्तनपान करण्यासाठी असलेल्या हिरकणी कक्षाकडे नजर गेली आणि का कोण जाणे, मला हसायलाच आले! हिरकणी कक्षाची सफाई हा विषय म्हणजे मला न सुटणारं एक मोठं कोडं आहे. पण मला त्यापुढे जाऊन असं वाटतं की, निसर्गदत्त नात्यालाही पडदा तयार करण्याची वेळ आपल्यावर का यावी? आपलं दुखणं कुठे आहे आणि आपण इलाज कुठे करत आहोत? ज्या देशात आईकडे ईश्वराचं स्वरूप म्हणून पाहिलं जातं, तिथं ही हिरकणी कक्षाची गरज का भासली असावी? एकीकडे स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणारे आपण बऱ्याचदा ममत्व, त्याग, समर्पण, कारुण्य, लज्जाभाव असल्या आपल्या सोईच्या संकल्पना तिच्यावरच लादतो आणि स्वतःवरील जबाबदाऱ्या टाळण्याची पळवाट शोधत तिच्यासाठी तिच्यावर उपकार केल्याच्या अाविर्भावात आणखी एक बंधन लादून मोकळे होतो.
 
मध्यंतरी एक ब्राझिलियन मिनिस्टर त्यांच्या संसदेत बाळाला दूध पाजतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावर जगभरात चर्चा आणि वाद सुरू झाले, मात्र बदलाच्या प्रवासात सामील होण्याऐवजी आपण आपली पुरुषप्रधान मानसिकता कवटाळून, प्रश्न का तयार होताहेत यापेक्षा उत्तर सदृश नवीन प्रश्न उपस्थित करून स्त्रीला सुरक्षित केल्याच्या आविर्भावात मिरवत आहोत?
 
जेव्हा आपण ‘पुरुषी मानसिकता’ ही संकल्पना विचारात घेतो, तेव्हा ती पुरुषांच्याच भोवती फिरवून का तपासली जाते? त्या पुरुषसत्तेचे आणि त्या मानसिकतेचे आपण सर्वच वाहक झालो आहोत, हे आपण व्यक्ती म्हणून केव्हा मान्य करणार आहोत? ही मानसिकता स्त्रियांमध्येही भिनवली गेलेली आहे; ज्यातून वरकरणी जरी स्त्रीच स्त्रीच्या विरोधात दिसत असली तरी सूत्र मात्र पुरुषसत्तेच्या हातात असतात. म्हणून स्त्रीचे शोषण करण्यात स्त्रियाच कशा अग्रस्थानी आहेत, हे भासवलं जातं. त्यातून शीलत्वाच्या संकल्पनांचे पिंजरे तयार होतात. त्यातून स्त्रिया, स्त्रियांच्या गोष्टींना दुय्यम म्हणून पाहिले जाते. ‘नाकर्त्याला बांगड्या घाला हातात!’, असं म्हणणारे आम्ही हे त्याच्यासोबतच इतरांना हे दाखवत असतो की, बाईसारखं असणं कसं वाईट आणि पुरुषी सन्मानाला कसं टोचणारं वगैरे आहे!! होय ना? बाईविषयी प्रचंड हीन धारणा घेऊन जगणारे जेव्हा तिला देवी किंवा आदर्श म्हणवून भांडवल करून नतमस्तक होण्याचे नाटक करतात, तेव्हा चीड येते. दोन विरुद्ध टोकाच्या भूमिका घेऊन जगताना यांची घुसमट कशी होत
नाही...?
 
सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या वेगळ्या रांगा, प्रवासातील आरक्षित जागा, आणि बरंच काही जे बचावाच्या दृष्टीने योग्य वाटत असलं तरी त्यांच्या असण्याची गरज का भासावी? त्या पुढच्या टप्प्यावर आपण केव्हा उपाययोजना आखणार आहोत? आणि नेमकं हेच धोरण बहुलिंगी समुदायाच्या प्रश्नांनाही लागू पडतं.. बहुसंख्य असलेल्या स्त्री-पुरुष समुदायात या बहुलिंगी समुदायाला स्वीकारार्हता मिळावी, यावर काम न करता त्याच्यासाठी वेगळ्या सोयी, सोयीस्कररीतीने उभ्या करण्यात धन्यता मानली जात आहे. ज्या अर्थी त्यांच्या वेगळ्या सोयी केल्या जाताहेत, त्या अर्थी त्यांची सोय जरी होत असली तरी त्यांचं व्यक्ती म्हणून सामान्यीकरण न होता, वेगळं असणंच अधोरेखित होत आहे. या समुदायांना सार्वजनिक ठिकाणी वेगळ्या सुविधा समुहाला बहुसंख्याक समुदायात मिसळू देतील? आपण मानसिकतेच्या परिवर्तनावर केव्हा बोलणार आहोत? उघडपणे स्तनपान करवणाऱ्या आईला बाई म्हणून पाहणाऱ्या आपल्या किळसवाण्या नजरा केव्हा झुकणार आहेत? सोबतच तृतीयपंथी समुदायाच्या असण्याचा निकष पुरुषसदृश नजरेतून पाहणे केव्हा सोडणार आहोत?
नेमक्या दुखण्याचा इलाज केव्हा करणार आहोत आपण? लिंगभावाच्या पुढे जाऊन, जेव्हा आपण एकमेकांना पाहू, तेव्हा खरी समानता प्रस्थापित होईल. तोपर्यंत प्रत्येकाला सोयीनुसार सोयी उपलब्ध करून देणे, ही आपली पळवाट असेल.
 
अंधाऱ्या खोलीत
कोपऱ्यात कुठेतरी, 
कुठे...?
ते मी नाही सांगणार कुणालाच 
कारण ती आहे नग्न 
म्हणून मी तिला कोंडून ठेवले आहे...
तिचे नग्न राहण्याचे अधिकार 
अबाधित राहावेत म्हणून 
मी तिला कोंडून ठेवले आहे ...
तिच्या आकारहीन शरीराला
आणि तेही नग्न पाहून 
लिंग, जात, वर्ण इत्यादीच्या
रंगात रंगवून 
संस्कृती, संस्कार, आणि सदाचाराच्या
चौकटीत तिचा जीव जाऊ नये 
म्हणून मी तिला कोंडून ठेवले आहे...
निघाली ती जर 
प्रकाशात बाहेर
नखशिखांत न्याहाळतील नजरा तिला 
आणि किंचितही उपभोग्य वाटली ती
तर रोज होतील तिच्यावरही 
पाशवी बलात्कार 
म्हणून मी तिला कोंडून ठेवले आहे...
 
disha.kene07@gmail.com
बातम्या आणखी आहेत...