आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुपेडी अनुभवांची एकसूत्री गुंफण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेब्रुवारी महिन्यात हैदराबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटांना इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा यासीन भटकळ जबाबदार असल्याच्या बातम्या वाचल्या आणि काही दिवसांपूर्वीच वाचून संपवलेल्या पुस्तकाची आठवण आली. हरीश नंबियार या पत्रकाराने एका मित्रासोबत बुलेट मोटारसायकलवरून केलेल्या भारतभ्रमणाची ही कथा आहे ‘डीफ्रॅगमेंटिंग इंडिया : रायडिंग अ बुलेट थ्रू द गॅदरिंग स्टॉर्म’. दहशतवाद, हिंदू-मुस्लिम संबंध, भारताची राजकीय परिस्थिती, वगैरे कोणताही विषय डोक्यात न ठेवता सुरू केलेल्या भटकंतीची ही कहाणी आहे. हरीशच्या डोक्यात जरी निव्वळ भारत फिरायचा उद्देश असला तरी तो निघाला 2 मार्च 2002 च्या पहाटे. त्यांनी प्रवासाचा पहिला टप्पा वापी गाठला. त्या वेळेपर्यंत गोध्रा हत्याकांड घडलेले होते. वापी हे महाराष्ट्र व गुजरात सीमेवरचे व्यापारी शहर. जन्माने मल्याळी असलेला हरीश याच शहरात मोठा झाला. गोध्रा कांडामुळे त्याच्या या प्रवासाला एक अनपेक्षित पार्श्वभूमी मिळाली. त्यामुळेच मुंबई, मालेगाव, धुळे, नागपूर, संबलपूर, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, बंगळुरू, मैसूर, मंगलोर, भटकळ, गोवा, रत्नागिरी, रोहा आणि पुन्हा मुंबई अशा या प्रवासात झालेल्या सर्व संभाषणांना मिळालेली हिंदू-मुस्लिम संबंधांची जोड त्याला टाळता आली नाही.

प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात हरीश आणि त्याचा बुलेटचालक, कट्टर शिवसैनिक, कोकणी मित्र रोहन यांना भटकळ हे समुद्रकिनारी वसलेले गाव लागले. हरीश मुंबईतला क्राइम रिपोर्टर. कारकीर्दीच्या सुरुवातीला मुंबई बॉम्बस्फोट, दंगली यांचे वार्तांकन केलेला. त्यामुळे भटकळच्या किनार्‍यावर परदेशातून शस्त्रास्त्रे व सोन्याचे स्मगलिंग होते, गावात मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे, छोटी-मोठी हिंदू-मुस्लिम भांडणे होत असतात, आदी तपशील त्याला माहीत होते. मात्र तोपर्यंत या गावाचा देशपातळीवरील दहशतवादी कारवायांशी संबंध फारसा जोडला गेलेला नव्हता. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये काम करताना हरीशकडे या गावातून एक खबर्‍या भेटायला आला. अवैध सोन्याची पोलिसांना माहिती देणार्‍या खबर्‍याला 20 टक्के सोने मिळते, ते नियमानुसार आपल्याला मिळालेले नाही. त्यासाठी एखाद्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याकडे शब्द टाकावा, अशी विनंती करायला हा खबर्‍या हरीशकडे आला होता. त्याच्याशी बोलतानाच हरीशला कळले होते की तिथे एका मुस्लिम कुटुंबातली लहान मुलगी घरात लपवलेल्या स्फोटकांशी खेळताना मरण पावली होती. गावावरून पुढे गोव्याकडे जाताना ही सर्व माहिती हरीशच्या डोक्यात होती. त्यामुळे त्याने परतल्यानंतर भटकळमधील मुस्लिम समाजाविषयी अधिक तपशील जाणून घेतला. त्यातून यासीन भटकळ ज्या समाजात मोठा झाला त्याविषयीची रंजक माहिती त्याला मिळाली.

हा समाज आहे नवायत. अरब पुरुष व जैन स्त्रिया यांच्या संकरातून जन्माला आलेला. कोकणी, अरेबिक, फारसी व संस्कृत अशी मिश्र भाषा बोलणारा. मुख्यत: व्यापारी. व्यापारासाठी इराक/इराण/येमेनमधून भारतात येणारे अरब व्यापारी किनार्‍यावरच्या जैन व्यापार्‍यांच्या मुलींशी विवाह करत. त्यांचे व्यापारासाठी फिरणे सुरूच राही व या बायका मुलांसह आपापल्या माहेरच्या घरीच राहत. त्यामुळे या समाजाच्या चालीरीतींवर जैन समाजाचा मोठा प्रभाव आहे. त्यांचा पेहराव, दागिने व जेवणखाण जैनांच्या जवळचे आहे. आताआतापर्यंत नवायत लोक सूर्यास्तानंतर जेवत नसत. या गावात 1919 मध्ये सुरू झालेली शाळा आहे, तिथे उर्दू माध्यमातून शिक्षण दिले जाते. कालांतराने वडील किंवा घरातील पुरुष कामानिमित्त सतत घराबाहेर असल्याने नवायत मुलगे शिक्षणापासून दूर गेले व नीतिबाह्य वर्तनाच्या जाळ्यात अडकले, मुली मुलांपेक्षा अधिक शिकलेल्या आहेत, असे भटकळमधील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ पदाधिकार्‍याने हरीशजवळ बोलताना कबूल केले. हरीशने बंगळुरूमधल्या एका मध्यममार्गी उर्दू नियतकालिकाच्या संपादकीयाचा आधार देऊन नमूद केले आहे की, नवायतांना मातृभूमीची (भटकळच्या मातीची) प्रचंड ओढ आहे आणि तितकेच आकर्षण संपत्ती कमावण्याचे आहे, ज्यासाठी त्यांना ही मातृभूमी सोडून जावे लागते. या द्विधेतून मार्ग काढण्यासाठी समाजातल्या धुरीणांनी पुढाकार घेण्याची वेळ आलेली आहे.

जवळच असलेल्या मणिपालच्या पै समाजाचे उत्तम उदाहरण त्यांच्यासमोर आहे. (मणिपाल हे भारतातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे.) पुस्तकाच्या सुरुवातीला वापीत पोहोचल्यावर हरीश त्याच्या बालपणीच्या मित्रांना भेटतो, त्याचे वर्णन आहे. अनेक वर्षांनी भेटणारे हे पस्तिशीतले, वेगवेगळ्या भाषा बोलणारे मित्र. त्यांचा आपापसातला संवाद मजेशीर आहे. पुस्तकात इतरही अनेक विलक्षण व्यक्ती भेटतात. ओरिसात समाजसेवा करणारा त्याचा मित्र अनुपम, संबलपूरमध्ये शाळेचा प्राचार्य असलेला, इराणहून इकडे येऊन स्थायिक झालेला बहाईपंथीय तराज, त्याची बहाई पत्नी सीमा आणि अस्खलित फारसी बोलणारी त्यांची दोन मुले, ओरिसातलाच पट्टचित्रकार भास्कर ज्याला दिल्लीतील प्रदर्शनादरम्यान एका बाईने क्रिकेट खेळणार्‍या कृष्ण व राधेचे पट्टचित्र काढायला सांगितले होते, ऋषिकुल्य येथे ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्याचे काम करणारा रवींद्र साहा, बंगळुरूमधली हरीशची मैत्रीण मॅगी आणि तिचे कुटुंब, दोन मुलांना एकटीने वाढवणारी सुरेखा, भ्रमिष्ट झालेला आपला नवरा आपल्याआधी जावा यासाठी प्रार्थना करणारी मैसूरची दुर्गाआंटी. या सगळ्यांना हरीश एका संस्कृतीच्या, राजकारणाच्या, धर्माच्या, भाषेच्या धाग्याने असा काही जोडत जातो की ती सगळी एकमेकांशी काहीएक संबंध नसलेली माणसे आहेत, हेच आपल्या लक्षात येत नाही. या सगळ्या घरांमध्ये त्याला भेटलेल्या लहान मुलांची वाढ कोणत्या परिस्थितीत, धर्म/भाषेच्या चौकटीत होत आहे, याचेही तो उत्तम विश्लेषण करतो.

या प्रवासात अर्थातच महत्त्वाचा आहे रोहन. हरीशला दुचाकीसुद्धा चालवता येत नाही, तर ‘बुलेट हा रोहनचा लाडका मुलगा जणू. तिच्या बारीकसारीक आवाजावरून, आवाजातल्या फरकावरून, रोहनला तिच्या तब्येतीचा अंदाज येतो.’ त्याची शिवसेनेची पार्श्वभूमी, नुकतंच लग्न झालेल्या बायकोची आठवण येणं, तिच्यासाठी इतक्या दिवसांत काहीच घेतलं नाही म्हणून कुंदापुरा येथे एका प्रदर्शनात ओरिसा हँडलूमची साडी घेणं आणि प्रसंगोपात्त हरीशची साथ देणं यातून एक सरळसाधा मध्यमवर्गीय मुंबईकर मुलगा डोळ्यांसमोर उभा राहतो. त्याच्याकडे हरीशसारखी पत्रकाराची काहीशी व्यापक दृष्टी नाही, एकमार्गी हिंदुत्ववादी विचार आहे. तरीही तो आपला वाटतो. या निवेदनात मधूनमधून हरीशने जवळजवळ दोन दशकांच्या त्याच्या पत्रकारितेतल्या अनुभवांची चपखल पेरणी केली आहे आणि ती उपरी वाटत नाही, तर निवेदनाचा भाग म्हणून सहजपणे जुळते. हे आहे एक प्रवासवर्णन. पण त्यात नुसते ठिकाणांचे वा भेटलेल्या व्यक्तींचे वर्णन नाही तर त्यात सजग पत्रकाराच्या दृष्टिकोनाची सुंदर महिरप आहे; ज्यामुळे ते एका झपाट्यात वाचून होते.

डीफ्रॅगमेंटिंग इंडिया : रायडिंग अ बुलेट थ्रू द गॅदरिंग स्टॉर्म
हरीश नंबियार, सेज पब्लिकेशन्स
किंमत -रु. 350, पाने- 240