आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतला मराठी बंदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरी-धंद्यात बरकत येण्यासाठी घराबाहेर पडणारे अनेक असतात. मात्र अमरावतीच्या लक्ष्मण रावांनी हिंदी लेखक होण्याच्या ईर्ष्येने थेट दिल्ली गाठली. कधी मोलमजुरी करून तर कधी चहाची टपरी सुरू करून 24 पुस्तके आणि 2 नाटकांचे लेखन केले. स्वत:ची प्रकाशन संस्थाही सुरू केली...
एखाद्या विशिष्ट हेतूने गाव-राज्य सोडून बाहेर पडणा जिद्दी माणसांच्या कथा आपण ऐकल्या आहेत. एखादे स्वप्न उराशी बाळगून त्या स्वप्नपूर्तीसाठी देशाटन करणांच्याही गोष्टी आपण ऐकल्या. सत्ता, प्रेम, ईर्ष्या, व्यापार, श्रीमंत होणे, सिनेमात कार्यकर्तृत्व सिद्ध करणे, अशी स्थलांतराची विविध कारणे असली तरी लेखक होण्यासाठी आपला गाव-भूप्रदेश सोडून परराज्यात, परभाषिक प्रदेशात जाणारा मनस्वी माणूस म्हणून लक्ष्मण राव यांची कथा जाणून घ्यायला हवी.
फेब्रुवारी 2012 मध्ये प्रगती मैदानावर ‘वर्ल्ड बुक फेअर’मध्ये लक्ष्मण राव प्रथम भेटले. त्यांचा पुस्तकांचा सात नंबर हॉलमध्ये स्टॅण्ड होता. लक्ष्मण राव मूळचे अमरावती जिल्ह्यातले. त्यामुळे गप्पा सगळ्या मराठीतच झाल्या.
लेखक होणे हे लक्ष्मण रावांचे विलक्षण स्वप्न होते. गुलशन नंदा यांच्या कादंब वाचून आपणही गुलशन नंदांसारखे लेखक व्हावे, ही इच्छा मनी धरून त्यांनी हिंदी पुस्तकांचे वाचन सुरू केले. विसाव्या वर्षीच अलाहाबाद येथील चतुर्वेदी, प्रसाद शर्मा, व्याकरण वेदान्ताचार्य पण्डित तारिणीश झा यांच्या संस्कृत-हिंदी शब्दकोशांचा अभ्यास केला. त्या वेळी लक्ष्मण राव केवळ दहावीची परीक्षा पास होऊन अमरावती शहरात एका सूतगिरणीत कामगार होते. 1975 च्या एप्रिल महिन्यात त्यांनी अमरावती सोडले. काही दिवस भोपाळमध्ये राहिले. 30 जुलै 1975 ला दिल्लीत पोहोचले ते लेखक होण्याचे स्वप्न घेऊनच. दिल्लीत गेल्यानंतरचा संघर्ष दाहक होता. राहायला जागा नाही. चरितार्थाचे साधन नाही. पोटासाठी मजुरी करणे, भांडी घासणे, चहाच्या टपरीवर काम करणे, अशी कामे करून, कोठेतरी जमिनीवर झोपून रात्र काढायची, असा त्यांच्यासाठी कष्टमय, क्लेशदायक काळ होता.
दिवसभर मोलमजुरीचे काम करायचे आणि रात्री लेखन करायचे, या ध्यासातून त्यांचे कादंबरीलेखन सुरू होते. कादंबरी लिहून पूर्ण झाली; पण अनोळखी शहरात प्रकाशक मिळेना. काही प्रकाशकांनी पुस्तक प्रकाशनासाठी पैसे मागितले. दिल्लीतील प्रकाशन व्यवहाराबद्दल बोलताना लक्ष्मण राव म्हणतात, ‘आता मुन्शी प्रेमचंद आपले स्क्रिप्ट घेऊन आले तरी इथले प्रकाशक त्यांच्याकडे प्रकाशनासाठी पैसे मागतील, तर माझी काय गत?’ प्रचंड आर्थिक ओढाताणीतून त्यांनी स्वत:च प्रकाशन संस्था काढायची असे ठरवले. ‘भारतीय कला साहित्य प्रकाशन’ या नावाची एका निष्कांचन मराठी माणसाची प्रकाशन संस्था दिल्लीत 1979 मध्ये सुरू झाली. आपल्याच ‘नई दुनिया की नई कहानी’ या कादंबरीचे प्रकाशन करून त्यांनी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.
1979 पासून लक्ष्मण राव चरितार्थासाठी मजुरी सोडून विष्णू दिगंबर या गर्दीच्या रस्त्यावर, एका झाडाखाली बसून पान-विडी-सिगारेट विकू लागले. कधी महानगरपालिकेचे कर्मचारी, तर कधी पोलिस येऊन त्यांना तेथून हुसकावून लावत. पण एक यशस्वी साहित्यिक होण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. या कष्टमय काळात त्यांचे लेखन चालूच होते.
पुस्तक प्रकाशित केले; पण वितरक मिळेना, बुजुर्ग वितरकांनी प्रती ठेवून घेतल्या तरी काही दिवसांनंतर तशाच किंवा एखाद-दुसरी विकून बाकीच्या प्रती परत केल्या. थोड्याफार विक्रीचे पैसेही वेळेवर मिळत नव्हते. शेवटी लक्ष्मण रावांनी स्वत:च सायकलवर फिरून पुस्तके विकायला सुरुवात केली. मोलमजुरीचा आणि घामाचा पैसा त्यांनी आपल्या पुस्तकात ओतला होता.
पहिल्याच कादंबरीमुळे लक्ष्मण राव दिल्लीत चर्चेचा विषय झाले. एक पानपट्टीचे दुकान चालवणारा माणूस आणि लेखक? या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसत नव्हता. परंतु 1981 मध्ये ‘टाइम्स ऑ फ इंडिया’च्या रविवार पुरवणीत त्यांचा परिचय प्रसिद्ध झाला आणि लोकांचा त्यांच्या धावपळीवर, लेखक असण्यावर विश्वास बसला. लेखानंतर लक्ष्मण राव यांचा परिचय, मुलाखती दिल्लीतील अनेक वृत्तपत्रांतून तसेच रेडिओ, दूरदर्शनवरून प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे हळूहळू त्यांची ओळख प्रतिष्ठित लोकांबरोबर होऊ लागली.
आता लक्ष्मण रावांनी चहाची टपरी सुरू केली. चहाच्या टपरीशेजारीच त्यांची पुस्तके विक्रीसाठी असत. दिल्लीतील एका खासदाराला याचे वेगळेपण व कष्ट जाणवले. चहाच्या टपरीवाल्या लेखकाला ते 27 मे 1984 रोजी ‘त्रिमूर्ती भवन’मध्ये घेऊन गेले. त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींबरोबरची भेट हा त्यांच्यासाठी अत्युच्च क्षण होता. इंदिरा गांधींच्या आयुष्यावर एखादे पुस्तक लिहावे, अशी इच्छा लक्ष्मण रावांनी व्यक्त केली; पण इंदिराजी म्हणाल्या, ‘माझ्यावर अनेकांनी लिहिलं आहे. आता माझ्याऐवजी पंतप्रधानांच्या प्रशासन पद्धतीविषयी लिहा.’ त्यावर त्यांनी ‘प्रधानमंत्री’ हे नाटक लिहिले व आपल्या प्रकाशन संस्थेतर्फे प्रसिद्ध केले. परंतु मधल्या काळात इंदिरा गांधींची हत्या झाली व त्यांना हे पुस्तक द्यायचे राहून गेले. लक्ष्मण रावांसाठी ही मोठी खंत आहे.
आजपर्यंत लक्ष्मण रावांची 24 पुस्तके व 2 नाटके प्रकाशित झाली आहेत. ‘रामदास’ या कादंबरीवर ‘रामदास’ हे त्यांचे नाटकही प्रसिद्ध आहे. ‘श्रीराम सेंटर’, ‘प्यारेलाल भवन’ अशा प्रसिद्ध नाट्यगृहात त्यांच्या नाटकांचे प्रयोगही झाले आहेत.
आपल्या आयुष्याची दिशा नक्की ठरवून तशी वाटचाल करणारे लक्ष्मण राव हे उत्तम गृहस्थी आहेत. 1986 मध्ये त्यांचा रेखावहिनींशी विवाह झाला. त्यांच्या सहजीवनाचा प्रवास सुरू झाला. त्यांच्या दोन मुलांपैकी परेश सी.ए.ची परीक्षा देत आहे, तर हितेश बी. कॉम.ला आहे. कुटुंबातील या तिघांचेही सहकार्य लक्ष्मण रावांना आहे.
अमरावती जिल्ह्यातील एका सामान्य सावजी कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मण रावांचे खरे नाव लक्ष्मण भिरभाटे. दिल्लीत हे नाव अनेकांना उच्चारायला कठीण, म्हणून त्यांनी लक्ष्मण राव हे नाव धारण केले. आज लक्ष्मण राव चरितार्थासाठी चहाची टपरी चालवतात. रात्री दहा वाजता घरी आल्यावर पुन्हा अंघोळ व जेवण करून पहाटे चारपर्यंत रोज लिहितात. सकाळी अकराला पुन्हा टपरीवर. एका लेखकाला अर्थार्जनासाठी चहाची टपरी चालवावी लागते, ही गोष्ट सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय अपमानकारक व लाजिरवाणी. पुस्तके लिहून व प्रकाशित करून पोट भरता येत नाही, हे दाहक सत्य यातून समोर येते.
इंग्रजीचा वाढता प्रभाव पाहून या जिद्दी माणसाने आता इंग्रजीत आपले लेखन-प्रकाशन करायचे ठरवले आहे. दिल्लीत काही मराठी लेखक होते व आहेत, परंतु दिल्लीत जाऊन हिंदीत लिहिणारा व आता इंग्रजीतही प्रकाशन संस्था काढणारा लक्ष्मण राव एकमेवच!
गुलशन नंदांप्रमाणे लेखक होण्याचे स्वप्न पाहून दिल्लीला गेलेल्या लक्ष्मण रावांच्या कामाची नोंद माजी पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या कार्यालयाने घेतली. परदेशी पत्रकारांनी घेतली. विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले. एका ध्येयवेड्या माणसाच्या या कर्तबगारीला व लेखकपणाला सलाम!