डेंग्यू हा विषाणूमुळे होणारा ताप आहे. आजारी व्यक्तीच्या रक्तातील डेंग्यू विषाणू एडिस इजिप्ती जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात संक्रमित केले जातात. साथीने येणारा आजार असल्याने तो ओळखणे सोपे जाते. ठरावीक वेळापत्रकाप्रमाणे डेंग्यू आजार वागतो. त्यामुळे लक्षणे वेगवेगळी असली तरी त्यातील गांभीर्य लक्षात येते. बरे वाटेपर्यंतचा काळ साधारण १० दिवसांपेक्षा जास्त नसतो. डेंग्यूचे डास शहरी वस्त्यांत जास्त प्रमाणात आढळतात. साथीचा आजार असल्याने यात आजार होण्याआधीच खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना : डासांची घनता कमी करणे आणि डास चावू नये म्हणून उपाययोजना करणे यांचा समावेश आहे.अंग झाकणारे कपडे घालावेत. मच्छरदाणी किंवा क्रीमचा वापर करावा. रुग्णास डास चावणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. डासांची उत्पत्ती होऊ न देणे किंवा नष्ट करणे गरजेचे आहे.
डेंग्यू आजाराची लक्षणे
- सुरुवातीला अचानक ताप येतो. हा ताप ७ दिवसांपेक्षा कमी काळ असतो.
- डोकेदुखी, सांधे, अंग दुखणे, डोळ्यांमागे वेदना.
- डोळे लाल होणे, डोळे आल्यासारखा भास होणे.
- औषधी घेऊनही ताप बरा झाल्यासारखे वाटत नाही.
- चार, पाच दिवस सारखा वारंवार ताप येतच राहतो.
- 5-6 दिवसांनी कमी होतो, पण प्रचंड थकवा जाणवतो.
- भूक मंदावणे, चक्कर येणे, थंड घाम सुटणे, उलटी होणे.
- अंगावर गोवरासारखे पुरळ येतात किंवा कधी येत नाहीत.
रोगनिदान
- 5 ते 7 दिवसांत
आपोआप बरा होतो.
- प्लेटलेट्स 40 हजारांखाली गेल्यास रक्तस्त्रावाचा धोका संभवतो.
- काहींना हिरड्या, नाक, जठर, आतडीतून रक्तस्त्राव होतो.
- जठरात रक्तस्त्राव झाल्यास उलटीत दिसतो. आतड्यात झाल्यास विष्ठा काळसर दिसते.
- त्वचेवर रक्ताचे बारीक ठिपके दिसतात.