आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरेचा पुरुषी फास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रातिनिधिक छायाचित्रे - Divya Marathi
प्रातिनिधिक छायाचित्रे
परंपरेने लादलेले पुरुषसत्ताक संस्कार आणि त्या संस्कारांचा प्रभाव सर्वच समाजसमूहांवर कमी-जास्त प्रमाणात असतो. इतर समाजात या विरोधात वेळप्रसंगी बंड पुकारण्याच्या शक्यता असतात, पण बहुलिंगी समाजातल्या ‘स्त्रियां’ना या पुरुषसत्ताक व्यवस्थेचा होणारा जाच कल्पनेपलीकडचा असतो...
 
L.G.B.T.A.I.Q.H या अजूनही प्रवाहाबाहेर राहिलेल्या समूहाच्या शोषणाच्या प्रमुख कारणांमध्ये ‘पुरुषसत्ता’ हे एक मुख्य कारण आहे. समाजात प्रस्थापित असण्या-नसण्याचे निकष, ही पुरुषसत्ताक व्यवस्था ठरवत असते. बहुलिंगी समुदायाचे जगणे बहुसंख्येने असलेल्या स्त्री-पुरुषांच्या व्यवस्थेत त्रासदायक ठरते. या व्यवस्थेच्या शंृखला बहुलिंगी समुदायाचे शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण करतात, म्हणून हा समुदाय बहुसंख्यांच्या नियमांना आव्हान देत आपली वेगळी वाट निवडतो. असं असलं, तरी जडणघडणीचा प्राथमिक काळ पुरुषसत्ताक व्यवस्थेत घालवलेला असल्या कारणास्तव, त्यांच्यावरही त्या व्यवस्थेचा प्रभाव कळत-नकळत राहतो. जी व्यवस्था आपण झुगारून स्वतंत्र होऊ पाहतोय, तिचेच प्रतिबिंब घेऊन बहुलिंगी समाज जगत असतो.
 
हे यासाठी सांगावं वाटतंय, कारण स्त्री-पुरुष नातेसंबंधात पुरुषसत्तेने जितके कठोर निर्बंध बायकांना घातले आहेत, बहुलिंगी समाजावरही याच पुरुषसत्तेचा प्रभाव आहे. मात्र त्यावर स्पष्ट भाष्य करणेही अवघड होऊन बसते आहे. इथे नातेसंबंधात जो कुणी पुरुषी भूमिका किंवा सत्तास्थानं उपभोगतो, तो स्त्री भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण करत असतो. स्त्री भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीला, त्याचा विरोध करता येत नाही. किंबहुना त्याला असं वाटतं, की तो पुरुषी भूमिका बजावणाऱ्या शरीराचा नैसर्गिक अधिकारच आहे. कारण लहानपणापासून ते संस्कार त्या शरीरावर झालेले असतात, की स्त्रीची भूमिका ही नेहमी पॅसिव्ह असते. ती सहनशील असते, आणि ‘पुरुषाला कुठल्याही परिस्थितीत समजावून घेणे’ हे तिचं कर्तव्य असतं! उदाहरणच घ्यायचं झालं तर...
 
१) लेस्बियन जोडी प्रामुख्याने समाजातील महिलांच्या ठरावीक व्याख्यांच्या संस्कारात घडलेली असते, म्हणून यांच्यात सामंजस्य जास्त आढळतं. अर्थात यांच्यात शोषणाचं प्रमाण कमी असलं तरी यातही जी स्त्री ‘पुरुषी’ भूमिका बजावत आहे, ती बाहेर पुरुष जसे आपल्या महिलांना वागणूक देतात, बंधनात ठेवू पाहतात, ‘स्त्री भूमिका’ बजावणाऱ्या शरीरावर ताबा ठेवू पाहतात, तसंच वागते. सामाजिक नजरेत जरी ती स्त्री असली, तरी त्यांच्या नात्यात ‘पुरुष’ असते. त्यातून शोषणाची बीजं रोवली जातात. मग त्या नात्यात ‘स्त्री भूमिका’ बजावणाऱ्या स्त्रीने कुठले कपडे घालावेत, कुणाशी मैत्री करावी, कसं जगावं, हे कळत-नकळत त्या पुरुषी भूमिका बजावणाऱ्या स्त्रीभोवती फिरत असतं. बंड करून सामाजिक शोषण प्रक्रिया तोडून बाहेर पडलेल्या व्यक्ती लैंगिक बहुसंख्यांचीच शोषणाची व्यवस्था अमलात आणतात. काही वेळ ती व्यवस्था बहुसंख्यांच्या व्यवस्थेपेक्षाही जाचक असते. पण स्वतः निवडलेली वाट आणि सामाजिक मान्यता नसल्या कारणास्तव, या नात्यात होणाऱ्या शोषणाची बाहेर कुठेही वाच्यता होत नाही. समाजाच्या व्याख्येविरोधातले स्त्री किंवा पुरुष ही घुसमट आणि अन्याय सहन करत राहतात.
 
२) शोषणाचा हाच प्रकार ‘गे’ असणाऱ्या जोडप्याबाबतीत तितक्याच तीव्रतेने दिसून येतो. इथेही पुरुषी मानसिकतेचा ‘तो’ आहेच आणि ‘अपुरुषी’ भूमिकेतील तो आहेच. पुरुषी ‘तो’ सारखा त्याच्यावर संशय घेत असतो, प्रसंगी मारहाणही करतो. त्याच्या बाहेर जाण्यायेण्याच्या वेळाही तोच ठरवतो. असं कर; नाही तर असं करीन, असं सारखं धमकावत राहतो. तरी अपुरुषी भूमिकेतला तो काहीही करू शकत नाही, कुणाला या नात्यातील दुःख सांगू शकत नाही. सांगितलं तरी ते समजून घेण्याऐवजी टिंगल केली जाईल, याची भीती अधिक वाटते. कायदेशीर न्याय मागायची तर व्यवस्था या नातेसंबंधांसाठी नाहीच. सोबतच त्याला हेही वाटतं की, त्याचे त्याच्यावर प्रेम आहे म्हणून ‘तो’ तसं वागतो. या सगळ्यांमध्ये बाहेरील पुरुषसत्तेपेक्षाही या वेगळ्या नात्यातील पुरुषसत्ता अजून तीव्र स्वरूप धारण करते. या नात्यात समलिंगी असूनही शारीरिक संबंधात स्त्री भूमिका स्वीकारलेल्या व्यक्तीला सामाजिक आणि नात्याअंतर्गत, अशा दुहेरी शोषणाला सामोरे जावे लागते.
 
३) तृतीयपंथी समुदायाचे शोषण तर त्या पुढे जाऊन होते. कारण, त्या पूर्ण स्त्रीसदृश आयुष्य घालवू पाहतात, म्हणून जोडीदार सर्रास त्यांची लूट करतात. त्यांना कळतही असतं, की त्या या नात्यात फसवल्या जात आहेत, तरी त्या मानसिक आधार आणि शारीरिक गरजांपोटी फसत राहतात... तृतीयपंथी समुदायाचे जोडीदार हे शक्यतो बहुसंख्य पुरुषांमधले पुरुष असतात, जे त्यांचा सोयीने वापर करतात. घर, समाज, ‘मूल पाहिजे’ असली कारणं देऊन सोडून देतात. बाकी लिंगभाव आणि लैंगिकतांपेक्षा तृतीयपंथींचे होणारे शोषण हे टोकाचे असते. शिक्षणाचा अभाव व कुटुंब सोडल्यामुळे आलेले एकटेपण कित्येक वेळा आत्महत्या करण्याचे कारण ठरते.
 
इतर वेळी, स्वातंत्र्याची आस घेऊन वेगळी वाट निवडणाऱ्या या घटकांना अस्तित्व, ओळख, आणि प्रेम या सगळ्याच पातळीवर शोषणाला सामोरे जावे लागते; पण ‘पुरुषी’ मानसिकतेमुळे नात्यांतर्गत होणारे शोषण त्यांनाही चुकत नाही. परंपरेने लादलेला हा पुरुषी फास कसा सोडवता येईल, याचा विचार आधी बहुसंख्येतल्या समाजाने आणि मग बहुलिंगी समाजाने करायला हवा.
 
disha.kene07@gmail.com
बातम्या आणखी आहेत...