आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोटर नगरीचे दिवाळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील डिट्रॉइट शहर हे मोटर नगरी म्हणून जगभर गाजले होते. आता ते दिवाळे निघालेले शहर म्हणून ओळखले जात असून त्याला 1800 कोटी डॉलर्सचे कर्ज झाले आहे. फोर्ड, जनरल मोटर्स व क्राइस्लर हे तीन मोठे मोटर कारखाने या शहरात निघाले आणि ते त्या शहराच्या केंद्रस्थानी होते. या कारखान्यांमुळे लहानमोठ्या बँका व इतर उद्योग या शहरात आले. 1950मध्ये या शहराची लोकवस्ती होती वीस लाख, तर आज आहे सात लाख. शहरात तेव्हा फुटबॉल व बास्केटबॉलची सुसज्ज क्रीडांगणे होती. संगीताच्या कार्यक्रमांचा जल्लोष चालत होता. इतकेच नव्हे, तर तिथल्या दोन-चार संगीतकारांनी चांगलेच नाव कमावले होते. लहानमोठ्या आलिशान इमारती उभ्या होत्या आणि इतर बांधकामांना बहर आला होता.
अमेरिकन मोटर कंपन्यांना जगभर मागणी होती आणि अमेरिकनांना जितके मोठे तितके आपले वैभव प्रदर्शित करणारे, असे तेव्हा आणि आजही वाटत असल्यामुळे लांबलचक मोटरी तयार करण्याची अमेरिकन मोटर कंपन्यांतच चढाओढ होती. तेव्हा अमेरिकेतच तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होते. यामुळे या मोटरींच्या चालकांना काही अडचण नव्हती.

डिट्रॉइटमध्ये काही इतर उद्योग होते, तरी मोटरीभोवतीच आर्थिक जीवन फिरत होते. अमेरिकेच्या इतर भागांतून गोरे व काळे लोक मोठ्या प्रमाणावर या शहरात येत होते. देशातच वर्णभेदाचा फैलाव झाला होता. डिट्रॉइट अलिप्त राहणे शक्य नव्हते. यामुळे साठीच्या दशकात दोन मोठे दंगे होऊन फार मोठी जीवित व वित्तहानी झाली. परिणामत: लोकांचे स्थलांतर सुरू झाले. त्यातले अनेक आसपासच्या लहान व मध्यम प्रमाणात वस्ती असलेल्या गावांत राहू लागले. स्थलांतर करणार्‍यांत गोर्‍या लोकांचे प्रमाण अधिक होते. तसेच चांगले सुशिक्षित व तंत्रकौशल्य अंगी असलेले काळे होते. यामुळे खुद्द डिट्रॉइटमध्ये दोन्ही वंशांतील अशा लोकांचे प्रमाण बरेच कमी झाले. स्थलांतराला जोर आला तो अमेरिकन मोटरधंदा जपान, कोरिया इत्यादी देशांतल्या मोटर कंपन्यांच्या स्पर्धेत मागे पडू लागल्यावर. टॉयोटा, होंडा आणि कोरियाच्या काही गाड्या अमेरिकन बाजारपेठ जिंकू लागल्या आणि आजही हीच अवस्था आहे. म्हणजे ज्या उद्योगाभोवती या शहराचे जीवन फिरत होते, तोच खालावल्यावर शहराची घसरगुंडी झपाट्याने होत गेली.

इराणच्या शहाने तेल उत्पादक अरब देशांना दाखवून दिले की, तेल हे मोठे अस्त्र आपल्या हातात आहे. याचा उपयोग त्या सर्व देशांनी करून घेतला. तेलाचे चढे भाव आणि भरपूर तेल पिणार्‍या अमेरिकन मोटरी यांच्या कचाट्यात अमेरिकन मोटर कंपन्या सापडल्यामुळे त्या आर्थिक संकटात सापडल्या. एकंदरच देशाची आर्थिक घसरण होऊन अमेरिकेच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा अतोनात वाढला. इराक व अफगाण युद्धांमुळे कर्जाचा डोंगर वाढण्यास चालना मिळाली.

बेकारी वाढली आणि आजही ती आठ टक्के आहे, तर डिट्रॉइटमध्ये ती सोळा टक्क्यांहून अधिक. आर्थिक मंदीवर उपाय म्हणून बँका व मोटर कंपन्यांना सरकारने अब्जावधी डॉलर्स परतफेडीच्या बोलीवर दिले. मोटर कंपन्यांना 80 अब्ज डॉलर्स इतके कर्ज मिळाले. फोर्ड या कंपनीने मात्र कर्ज घेतले नाही. कर्ज मिळाले म्हणून बराच मोठा रोजगार वाढला नाही. उलट कंपन्यांनी मोटरी सुधारण्यासाठी नव्या तंत्राचा वापर केला. यांत्रिक सुधारणा झाल्यामुळे कामगारांच्या संख्येत घट झाली. डिट्रॉइटमधील तिन्ही कंपन्यांचे कारखानेही याच मार्गाने गेले.

अमेरिकन घटनेप्रमाणे राज्याचा गव्हर्नर व शहरांचा महापौर यांना फार मोठे अधिकार असतात. शहर पातळीवरही राजकीय स्पर्धा अतिशय तीव्र आहे. डिट्रॉइटच्या महापालिकेत गेली पन्नास वर्षे डेमॉक्रॅटिक पक्षाचेच प्राबल्य राहिले आणि या सर्व काळात त्याच पक्षाचा महापौर राज्य करत होता. विद्यमान महापौराच्या आधी जो महापौर होता, तो गेली काही वर्षे तुरुंगाची हवा खात आहे. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आणि खोटे व्यवहार यासाठी ही शिक्षा झाली आहे. क्लेमन यंग हा 1974 ते 94 पर्यंत महापौर होता. त्याने कामगार संघटना बळकट केल्या आणि सवलतींची खैरात केली. काही अधिकार्‍यांना निवृत्ती निधीत एक पैसाही भरावा लागत नाही. मोटर कंपन्यांची भरभराट होती तेव्हा कर्मचार्‍यांना वेतन, रजा, निवृत्तिवेतन इत्यादी चांगली कमाई होती. इतकेच नव्हे, तर मोटर कंपन्यांत काम करणारांना वेतन व इतर बाबतीत सवलतींचे जे प्रमाण होते तितके वा तसे इतर व्यवसायातील कर्मचारी मागत होते आणि कामगार संघटना बळकट असल्यामुळे या मागण्या मान्य होत होत्या.

या सर्व क्षेत्रांत निवृत्तीनंतरचे निधी स्थापन झाले होते. महापालिकेचे कर्मचारी घेतले तर आरोग्य व निवृत्तीसाठी स्वतंत्र निधी होते. आता अठरा अब्जांचे जे कर्ज आहे त्यात शहराच्या कर्मचार्‍यांच्या निवृत्तिवेतनाचे साडेतीन अब्ज आहेत. इतर कर्मचार्‍यांना द्यायची रक्कम सहा कोटी चाळीस लक्ष डॉलर्स आहे. निवृत्तिवेतनाबरोबर महागाई वाढली म्हणून दरमहा पंचेचाळीस डॉलर्सची वाढ देण्याचा करार पाळावा लागतो.

चार कोटी डॉलर्सच्या निधीत दर महिन्याचा हप्ता नुकताच भरता आलेला नाही. शहराच्या कर्जरोख्यांसाठी डॉलरमागे 75 सेंट द्यावे लागतील; पण ते देणे शक्य नसल्यामुळे 34 कोटींचे कर्ज वाढले. तारण नसलेल्या 11 कोटींच्या कर्जासाठी 2 कोटी भरून काही काळ निभावून नेण्यासाठी वाटाघाटी झाल्या, पण ती रक्कम भरणे अशक्य आहे. अधिकृत जुगारी अड्ड्यांकडून 1 कोटी 10 लक्ष दरमहा मिळतात, पण त्यांच्याकडून केलेल्या हातउचलीमुळे ही रक्कम मिळत नाही. म्हणजे फाटलेल्या धोतरास कोठेही हात लागला तरी ते अधिकच फाटते, तशी स्थिती आहे.

महापालिकेचे उत्पन्नच मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे सर्व नागरी सेवांत कपात झाली आहे. अमेरिकेत पोलिस यंत्रणा नगरपालिकांच्या नियंत्रणाखाली असते. डिट्रॉइटच्या या सेवेत कपात झाली आहे. त्यामुळे धोक्याचा म्हणून फोन केला तर पोलिस येण्यास तास-दीड तास लागतो. दिवस-दोन दिवस आपण घरी नसलो तर आवाराच्या कुंपणाची व घराच्या खिडक्या-दारांची शाश्वती नाही. अनेकांनी निरनिराळ्या भागांतून स्थलांतर केले असले तरी काही कसे तरी राहतात. शहर मुळातच अवाढव्य आहे. त्यामुळे पोलिस, बस, टपाल इत्यादी सेवा या विखुरलेल्या वस्त्यांना पुरवाव्या लागतात. यामुळे खर्च वाढला आहे. तसेच महापालिकेला कराच्या रूपाने मिळणारी आवक एकदम खाली गेली. या अवस्थेत वीजपुरवठा अनियमित झाला असून रस्त्यावरचे चाळीस टक्क्यांहून अधिक दिवे बंद असतात. यामुळे गुन्हेगारांचे फावले. डिट्रॉइटने गुन्ह्यांच्या बाबतीत उच्चांक गाठला असून पालिकेच्या रुग्णवाहिकांपैकी तीस टक्क्यांहून अधिक बंद आहेत; कारण परवडत नाही. या रीतीने दिवाळखोर झालेल्या महापालिकेला कर्ज मिळणेही कठीण झाले आहे. ऐपत नसलेली व्यक्ती असो वा स्थानिक स्वराज्य संस्था व सरकार, कोणीही असो; कर्जफेडीची शाश्वती नसल्यावर असेच होणार. शिकागोसह इतर काही मोठी शहरे याच मार्गावर पूर्णत: नसली तरी बर्‍याच प्रमाणात आहेत.

अमेरिकन लोक मुळातच कमालीचे खर्चिक आहेत. ऋण काढून सण साजरा करण्याची त्यांची वृत्ती आहे. बँकेत पैसे नसताना घर खरेदी करण्यार्‍या या लोकांनी आणि कसलाही विचार न करता सढळ हाताने कर्ज देणार्‍या बँकांनी आर्थिक संकट आणले. सरकारही महासत्तेच्या कैफात राहून सर्व जग बदलायला निघाले आणि कर्जाचा बोजा फक्त वाढला.

अमेरिकन सरकार या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्ज फेडू शकणार नाही. याच संस्थांना आतापर्यंतच्या धोरणात आणि कारभारात बदल करणे भाग आहे. मॅसॅच्युसेट राज्याची एक महिला गव्हर्नर बोस्टनपासून दूर राहत असल्यामुळे सरकारी हेलिकॉप्टरने रोज घरी जात-येत होती. असले दिवटे अधिकारी दिवाळेच वाजवणार.
govindtalwalkar@hotmail.com