आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ययाती\' करण्‍याचा वैज्ञानिक प्रपंच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2008मधील ख्रिसमसच्या दिवशी अमेरिकेत ‘द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन’ हा चित्रपट प्रकाशित झाला. एफ. स्कॉट फिटझगेराल्डने 1922मध्ये लिहिलेल्या याच शीर्षकाच्या कथेवर हा लोकप्रिय चित्रपट आधारित होता.

बेंजामिन बटनचा जन्म होतो. जन्मताच आई मरते. तो अनाथाश्रमात वाढतो. हे मूल जन्मताच ऐंशी वर्षाच्या म्हातार्‍यासारखे दिसते. हे म्हातारे मूल प्रथम व्हिलचेअरमध्ये बसते. प्रौढासारखे बोलते. जसे जसे त्याचे वय वाढते तसतसे त्याचे रूप बदलते. ते तरुण आणि नंतर कुमार होते. मरताना 84व्या वर्षी तान्हे बाळ होऊन मरते.

मग ‘स्टेम सेल्स’ मूळपेशी आणि बेंजामिन बटन यांचा संबंध काय? मूळपेशींबाबत लिहिताना मी ही कथा नेहमी सांगतो. याचे कारण आता मानवी शरीरातील प्रौढपेशींना विज्ञान पुन्हा ‘मूळपेशीत’ रूपांतरित करू शकते. म्हणजे बटनचा जीवन प्रवास कसा उलटा झाला, तसाच काहीसा प्रौढ पेशींना मूळपेशी बनवण्याचा प्रकार. भारतीय पुराणकथेचा आधार घेऊन सांगायचे तर हा ‘ययातीकरणाचा’ वैज्ञानिक प्रपंच.

गर्भधारणेत स्त्रीबीजाशी पुरुषबीजाचे मिलन होऊन फलन होते. भ्रूण तयार होतो. त्यात अनंत पेशी तयार होतात. या भ्रूणातील मूळपेशी. या मूळपेशींमध्ये सबंध शरीर म्हणजे प्रत्येक अवयव तयार करण्याची क्षमता असते. म्हणून या मूळपेशींचे नाव ‘टोटीपोटंट’ असे ठेवले आहे. टोटल-पूर्ण पोटंसी-क्षमता असलेल्या मूळपेशी. या फक्त भ्रूणात असतात. पुढे संपूर्ण मानवी शरीर तयार होते. वाढत्या वयाबरोबर शरीराची झीजतुट होत असते. ही झीजतुट भरून काढण्यासाठी प्रत्येक अवयवात मूळपेशी असतात. या मूळपेशी फक्त तोच अवयव तयार करतात. म्हणजे त्वचेमधील मूळपेशी त्वचेच्या पेशी तयार करतात, यकृतातील मूळपेशी यकृताच्या पेशी तयार करतात वगैरे. पण निसर्गात त्या कोणताही अवयव तयार करू शकत नाहीत, म्हणून यांना टोटीपोटंट पेशी म्हणत नाहीत.

अस्थीमज्जेतही मूळपेशी असतात. या मूळपेशींची इतर अवयवांच्या पेशी निर्माण करण्याची क्षमता यकृत, त्वचा, मेंदू या अवयवातील मूळपेशींपेक्षा जास्त असते. याचा अर्थ मानवी शरीरात बहुविध प्रकारच्या मूळपेशी असतात. त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांचे वर्गीकरण केलेले असते.

प्रत्येक अवयवात जर मूळपेशी आहेत तर मग अवयवात विकृती निर्माण झाल्यानंतर त्या तो अवयव पूर्णपणे पुन्हा तयार का करत नाहीत? अवयवाला इजा झाल्यानंतर निसर्गत: त्या अवयवातील मूळपेशी ती इजा बरी करण्याचा प्रयत्न करतात. इजा छोटीशी असेल तर त्या यशस्वी होतात. पण इजा मोठी असेल तर ती दुरुस्त करणे या मूळपेशींच्या आवाक्याबाहेरचे असते. अशा वेळेला बाहेरच्या मूळपेशींची गरज भासते. विज्ञान ही गरज भागवण्याच्या प्रयत्नात आहे.

जर प्रत्येक अवयवात मूळपेशी आहेत तर त्या वेगळ्या काढून, परीक्षानळीत वाढवून त्या परत शरीरात का सोडता येत नाहीत? हा दुसरा कळीचा प्रश्न. अवयवातील मूळपेशी काढून त्यांचे परीक्षानळीत संवर्धन करणे प्रायोगिक स्तरावर शक्य आहे. परीक्षानळीत तयार होणार्‍या मूळपेशींची संख्या खूपच कमी असते. इजा झालेल्या अवयवात टोचून तो बरा करता येईल इतक्या संख्येने मूळपेशी अजून परीक्षानळीत तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले नाही.

एवढे सगळे करण्यापेक्षा भ्रूणामधील टोटीपोटंट पेशी का नाही वापरायच्या आणि हवा तो अवयव का नाही निर्माण करायचा? हा तिसरा कळीचा प्रश्न.

टेस्टट्युब बेबी(आय.व्ही.एफ.)मध्ये परीक्षानळीत गर्भ तयार करण्याचे जैवतंत्रज्ञान विज्ञानाला अवगत झाले आहे. आज जगभर या तंत्रज्ञानामुळे लाखो मुले जन्माला येतात. लाखो भ्रूण परीक्षानळीत वाढवता येतात. जगभरच्या टेस्टट्युब बेबी केंद्रात लाखो भ्रूण पेढीत तयार आहेत. या भ्रूणातील टोटीपोटंट पेशी अवयव तयार करण्याकरता वापरता येतील. पण अवयव तयार करण्यासाठी भ्रूण वापरायचा व मग नष्ट करून टाकायचा, हे मानवी नैतिकतेत बसत नाही. त्यामुळे भ्रूणावरील संशोधनास अमेरिकेसारख्या प्रगत देशात कायद्याने बंदी आहे. इतर देशातही भ्रूणावरील संशोधनाबाबत कडक कायदे आहेत. गोळाबेरीज, भ्रूणातील टोटीपोटंट पेशी वापरता येत नाहीत.

जैवविज्ञानाने त्यावर उपाय शोधला. बरेच अवयव निर्माण करता येतील अशी क्षमता असलेल्या मूळपेशी प्रौढपेशींपासून तयार करण्याचे संशोधन जैवविज्ञानाने सुरू केले. गेल्याच वर्षी जपानच्या क्योटो विद्यापीठातील डॉ. शिन्या यामानाका यांना या संशोधनाबद्दल वैद्यक नोबेल मिळाले. प्रौढपेशींमधील चार संदेश प्रथिनांची आज्ञावली बदलली म्हणजे त्यांचे काम बदलते व त्या प्रौढपेशींचे रूपांतर मूळपेशीत होते. हे त्यांच्या संशोधनाचे सार.

अलीकडेच जपान येथील डॉ. टाकेबे यांनी प्रौढपेशींपासून मूळपेशी तयार करून त्यापासून यकृतपेशी तयार केल्या. या यकृतपेशींचा कळा त्यांनी वाढवला. त्याची व्हिडियो फिल्म नेचरच्या वेबसाइटवर नुकतीच टाकली आहे. हे संशोधन त्यांनी उंदरावर केले.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. दिपक श्रीवास्तव यांनी ‘कनेक्टिव टिश्यु’मधील प्रौढपेशींचे रूपांतर मूळपेशीत करून त्यातून हृदयाच्या पेशी तयार केल्या. अशी आणखी काही उदाहरणे देता येतील. नैतिकतेला वळसा घालून जैवविज्ञानाने नवीन अवयव तयार करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. हजारो रुग्णांना आज मुत्रपिंड, यकृत, हृदय अशा अवयवांची गरज आहे. त्यांच्यासाठी हा आशेचा किरण आहे.

हे संशोधन अजून प्रायोगिक स्तरावर आहे. काही काळ वाट पाहावी लागणार आहे. भारतात तसेच इतर काही देशांत मूळपेशी उपचाराची केंद्रे दिसू लागली आहेत. मराठी माध्यमांमध्येही महाराष्ट्रातील अशा केंद्रांबाबत बातम्या येत असतात. अशी केंद्रे विज्ञानाधिष्ठीत असतात की नाही, याबाबत शंकाच आहे. मूळपेशींचे जैवतंत्रज्ञान सुविकसित केंद्रातच होते. तेव्हा असाध्य रोगाच्या रुग्णांनी अशा केंद्रांकडे धाव घेऊ नये, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
dranand5@yahoo.co.in