आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhananjay Lambe Artical On District Literature Festivel

जिल्हा साहित्य संमेलनाची संजीवनी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवगिरीचे यादव राजे रामदेवराय यांनी 800 वर्षांपूर्वी मराठीचा राजभाषा म्हणून स्वीकार केला होता, तर वेरूळचे आजोळ असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी 400 वर्षांपूर्वी मराठीला राजमान्यता दिली होती. त्यांच्याच या भूमीत हे छोटेखानी टुमदार साहित्य संमेलन झाल्याचे विशेष महत्त्व.
साहित्य परिषदेकडे उत्साहाने भांडून संमेलन
मिळवण्याचे दिवस सरले असतानाही....
डिसेंबर-जानेवारी म्हणजे साहित्य संमेलनांचा मोसम. ज्या लेखकांची पुस्तके वाचली जातात, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची, पाहण्याची संधी देणारे हे उत्सव. अखिल भारतीय साहित्य संमेलनापासून तालुका पातळीपर्यंतची संमेलने भरवण्याचा मूळ हेतू हाच, पण हल्ली विविध प्रकारच्या हेतूंचा शिरकाव झाल्यामुळे मूळ हेतू विस्मरणात जाऊ लागला आहे. संमेलन म्हणजे उत्सव आणि उत्सव म्हटले की आर्थिक पाठबळ, माणूसबळ ओघाने आलेच. कितीतरी संमेलने याच मुद्द्यावरून रद्द होतात. साहित्य परिषदेकडे उत्साहाने भांडून संमेलन मिळवण्याचे दिवस सरले आहेत. आता असा उत्साह परिषदेला शोधावा लागतो. या व्यवहाराला फाटा देणारी घटना नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यात घडली. खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी या एका छोट्या गावातील काही उत्साही मंडळी मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिका-यांना भेटली आणि गावात जिल्हा पातळीवरील साहित्य संमेलन भरवण्याची परवानगी मागितली. अर्थात, असे संमेलन व्हावे अशी परिषदेच्या पदाधिका-यांचीही इच्छा होती. कारण खुलताबाद तालुक्याला मराठीची प्राचीन परंपरा आहे. देवगिरीचे यादव घराण्यातील राजे रामदेवराय यांनी 800 वर्षांपूर्वी मराठीचा राजभाषा म्हणून स्वीकार केला होता, तर वेरूळचे आजोळ असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी 400 वर्षांपूर्वी मराठीला राजमान्यता दिली होती. अर्थात, ही पार्श्वभूमी इतिहासकारांसह अनेकांना ठाऊक होती, पण त्यामुळे खुलताबाद तालुक्यात संमेलन घ्यावे, असे आजतागायत कुणालाही वाटले नव्हते. बाजारसावंगीच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचे सर्वेसर्वा डॉ. संजय गायकवाड यांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी तयारी सुरू केली.
मान्यवरांच्या मांदियाळीने आयोजकांच्या प्रयत्नाची पाठराखण, संमेलनाचा उद्देश साध्य :
भारत-रशिया संबंधांवर पीएचडी करणारे डॉ. गायकवाड यांना मराठी साहित्य संमेलनाची कल्पना सुचणे हा तसा विरोधाभासच होता, पण संघटन कौशल्य पणाला लावून त्यांनी तयारी केली आणि हे पहिले जिल्हा संमेलन यशस्वी करून दाखवले. मुला-मुलींनी, विशेषत: मुलींनी स्वावलंबी होऊन आपले आयुष्य आपल्या मनासारखे घडवावे, शेतात राबून मागे राहू नये हा डॉ. गायकवाड यांचा हट्ट. त्यासाठीच त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केली आणि अल्पावधीत ती नावारूपालाही आणली. साहित्य संमेलन भरवण्यामागे त्यांचा हाच उद्देश होता. तो यशस्वीही ठरला. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक पुस्तक विकत घेतले, दिवसभर ज्येष्ठ साहित्यिकांच्या विचारमंथनाचा आस्वाद घेतला आणि काहीतरी वेगळे करण्याचा संकल्पही केला.
राजकीय पाठबळाविना संमेलन यशस्वी :
विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे, ख्यातनाम साहित्यिक रा. रं. बोराडे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. कौतिकराव ठाले, साहित्यिक आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे बाबा भांड अशा अनेक मान्यवरांनी दुर्गम भागातील या संमेलनाला केवळ हजेरीच लावली नाही, तर या प्रयत्नाची पाठराखणही केली. कोणत्याही राजकीय पाठबळाविना हे संमेलन यशस्वी करून दाखवले, ही त्यांची आणखी एक जमेची बाजू. खुलताबाद तालुक्यातील रहिवासी असलेले तरुण पत्रकार संजय वरकड यांची संमेलनाध्यक्षपदासाठी निवड करून या मंडळींनी एक वेगळाच पायंडा पाडला, ज्यामुळे तरुणांमध्ये साहित्याची आवड निर्माण होण्यास मदत होईल.
संमेलनाचे फलित :
० अव्यक्त ग्रामीणींना व्यक्त होण्यासाठी ऊर्मी देणारे उपयुक्त संमेलन. या सकस साहित्याची दखल घ्यावी लागेल.
० ग्रामीण भागात संवेदनशील साहित्यनिर्मिती कित्येक दशकांपासून होत आली आहे आणि या सकस साहित्याची दखल देशपातळीवर घ्यावी लागली आहे. तथापि अजूनही ग्रामीण माणूस अनेक अर्थांनी अव्यक्त आहे. त्याला व्यक्त होण्याची संधी मिळवण्याची ऊर्मी अशा संमेलनांतून मिळत असते. ग्रामीण माणसाचे दु:ख, आनंद, वेदना साहित्यातून व्यक्त व्हाव्यात, यासाठी ही संमेलने उपयुक्त ठरतातच, शिवाय त्यातून स्वावलंबनाचा विचार मिळाला तर त्याचे आयुष्य समृद्ध होण्यास हातभार लागतो.
० साहित्याला संजीवनी देणा-या मातीतल्या संमेलनांचे जागोजागी आयोजन होण्याची आशा
० स्पष्ट उद्देश, ग्रामीण, संवेदनशील कार्यकर्त्यांचे मोहोळ, विद्यार्थी-शिक्षकांचा सक्रिय सहभाग आणि ज्येष्ठ साहित्यिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पहिले संमेलन यशस्वी झाले आहे. यातून अशा संमेलनांचे जागोजागी आयोजन होण्याची आशा निर्माण झाली.