आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dharmapratap Singh About Story Of Sanjay Leela Bhansali

मी संजय लीला भन्साली...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैयक्तिक पातळीवरच्या
छोट्या बदलाची कृती हीच मोठ्या सामाजिक परिवर्तनाची नांदी असते. म्हणूनच लोकापवाद बाजूला सारून बदलाचं पाऊल उचलणाऱ्यांच्या धाडसाचं कौतुक करायला हवं आणि समजून घ्यायला हवा त्यांच्या कृतीमागचा अर्थ. आजच्या मधुरिमामध्ये, लिंगभेदासारख्या विषमतेला विरोध करून स्त्री-पुरुष समानता अंगीकारणाऱ्या, आपल्या नावात आईलाही समान स्थान देणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, कवी वैभव छाया, पत्रकार नामदेव अंजना यांच्यासह इतर समविचारी तरुण मंडळींना आपण भेटणार आहोत. स्वत:ची अशी वेगळी ओळख अभिमानानं मिरवणाऱ्यांची आणि स्त्रीत्वालाही मोठं करण्याचा आग्रह धरणाऱ्यांची संख्या जेव्हा वाढेल, तेव्हा महिला दिन मुद्दाम वेगळा साजरा करण्याची गरज उरणार नाही...

आपल्या देशात स्त्रीला एकतर देवी म्हणून पुजले जाते किंवा तिला अबला मानून केवळ भोगवस्तू म्हणून तिच्याकडे तुच्छतेने पाहिले जाते. स्त्रीशक्तीचा आदरपूर्वक उल्लेख औपचारिकपणे क्वचितच केला जातो. स्त्री म्हणजे मातृसत्ता. ती केवळ अपत्याला जन्म देत नाही, तर आयुष्यात खंबीरपणे उभे राहण्यासाठी, काहीतरी सकारात्मक कार्य करण्यासाठी त्याला सक्षम बनवते. आज स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे उघडल्यामुळे ती उंबरठ्याबाहेर पडून सक्षमपणे पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवत आहे. शहरांमधील हे आधुनिकतेचे वारे ग्रामीण भागातील, तळागाळातील स्त्रीपर्यंत पोहोचेल, तेव्हाच ती आपल्या अधिकारांप्रती जागृत होईल. आणि स्त्रियांची सर्वांगीण प्रगती होईल.

मला स्त्रियांविषयी प्रचंड आदर वाटतो आणि तो व्यक्त करण्यासाठी केवळ महिला दिनाचे औचित्य मला मान्य नाही. आपण आपल्या वागण्यातून, कामातून तो व्यक्त केला पाहिजे. सिनेसृष्टीशी निगडित असल्याने स्त्रियांप्रती माझ्या भावना मी माझ्या चित्रपटांमधून सहजपणे व्यक्त करू शकतो आणि तसा प्रयत्न मी निश्चितच करत आहे. ‘ब्लॅक’, ‘गुजारिश’ या माझ्या चित्रपटांमधील नायिका म्हणूनच वेगळ्या आहेत. ‘बाजीराव मस्तानी’मध्येही मी स्त्री व्यक्तिरेखा अतिशय आदरपूर्वक पेश केल्या आहेत. ‘राम-लीला’ हा चित्रपट मी माझ्या आईसाठी बनवला आहे, हे मी अभिमानाने सांगतो. माझ्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच मी माझ्या नावासोबत तिचे (लीला) नाव लावतो. त्यामुळे मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो. आता सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव लावणे अनिवार्य आहे; परंतु मी गेल्या २२-२३ वर्षांपासून आईचे नाव लावतोय, याचा माझ्या आईलाही अभिमान आहे. मी पहिली टीव्ही मालिका बनवली, तिचे कथानकही आईवर नितांत प्रेम करणाऱ्या मुलाचे होतेे. तोसुद्धा आपल्या नावासोबत आईचे नाव लावतो- ‘सरस्वती चंद्र’.

खरं तर अगदी प्राचीन काळापासून आपण पाहिलं तर प्रत्येक कालखंडात स्त्रियांनी नवनिर्माणात सक्रिय योगदान दिलेलं आहे. वैदिक काळात आर्यावर्तसारख्या महान राष्ट्राच्या निर्माणात गार्गी, मैत्रेयी, अरुंधती यांसारख्या दूरदर्शी स्त्रियांनी निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पौराणिक कथांमध्येही स्त्रियांच्या गौरवगाथा येतात. उदा. दशरथ राजा जेव्हा युद्धभूमीवर निघाला तेव्हा कैकयीने त्याचे सारथ्य केले होते. युद्ध सुरू असताना रथाचे चाक
निखळले तेव्हा आपल्या हाताच्या बोटावर तिने चाक ताेलून धरले व दशरथाला युद्धात विजयी केले. मध्ययुगीन काळातील रजिया सुलतान, अहिल्याबाई, चांद बीबी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू, अरुणा असफ अली, विजया लक्ष्मी पंडित अशा कितीतरी स्त्रियांची नावे घेता येतील... ‘आझाद हिंद फौजे’मध्ये स्त्रियांच्या पलटणीचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्यासारख्या क्रांतिकारकांना मदत करणाऱ्या स्त्रियांची लांबलचक यादी होईल. त्यांनी स्वत:चे जीवन राष्ट्र आणि मानवतेसाठी वाहून घेतलेच, शिवाय स्वतंत्र भारताच्या निर्माणासाठी आपले सर्वस्व समर्पित केले.

भारताच्या प्रगतीमध्ये पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबरोबरच पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी यांचे याेगदानही संस्मरणीय आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भागीदारी नोंदवणाऱ्या या ज्ञात-अज्ञात स्त्रियांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आजच्या स्त्रियांची स्थिती समाधानकारक आहे का? असा प्रश्न मनात येतो. स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनंतरही एकविसाव्या शतकातील स्त्रियांप्रती समाजाची वर्तणूक फारशी बदललेली दिसत नाही, असेच खेदाने म्हणावे लागते. सकारात्मक बदल निश्चितच होताहेत, पण ते सर्वदूर नाहीत. पुरुषांच्या इतक्याच सक्षम असलेल्या स्त्रियांना आजही खऱ्या अर्थाने आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळालेले नाही, असे मला वाटते!
शब्दांकन : धर्मेंद्र प्रताप सिंग
(dpsingh@dbcorp.in)