आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटक्‍या दगडांची भन्‍नाट कहाणी ( धर्मराज माहूलकर)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूचर, जलचर, खेचर असे सर्व प्राणी सतत भटकत असतात. ते त्यांचं सजीवपणाचं एक लक्षण आहे. पण दगडासारखी निर्जीव व जड वस्तू भटकते, यावर विश्वास बसणे कठीण. बरेच जण असे म्हणतील की, ही लोणकढी थाप आहे. पण अमेरिकेत कॅलिफोर्नियाजवळ डेथ व्हॅली नावाचा एक भाग आहे; या भागामध्येच लिटल बॉनी क्लेअर फ्लाया, नेवाडा नावाचा भूभाग आहे. या भागातील दगड हे भटके आहेत.

तुम्ही म्हणाल, एका-दोघा जणांनी ते पाहिले असेल, किंवा दगडांच्या या हालचालींमागे माणूस किंवा एखाद्या सजीवाचा संबंध असावा. पण ही दगडांची होणारी हालचाल हजारो लोकांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली आहे. या हालचालीमागे कुठल्याही सजीवाचा हात नाही, हे या सर्वांनी मान्य केले आहे. कारण, सजीवांचा या हालचालीमागे हात असला, तर त्यांच्या वावरण्याच्या खुणा तेथील परिसरात स्पष्ट दिसल्या असत्या. येथील दगड भटकतात, ही गोष्ट स्थानिक लोकांना व बाहेरील जगातील लोकांना व शास्त्रज्ञांना इ. स. १९०० पासून माहीत आहे, आणि तेव्हापासून यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न होत आहे.

बरं, हे दगड एकाच दिशेने वाटचाल करतात, असे नाही; तर काही दगड सरळ रेषेत जातात, काही डावीकडे वळतात, काही उजवीकडे वळतात, तर काही चक्क पुढे जाऊन पुन्हा माघारी फिरतात. सारख्याच आकाराचे दोन दगड असले, तर काही काळ दोन दगड काही अंतर बरोबर जातात, व त्यातील एक अचानक उजवीकडे वळण घेतो व दुसरा डावीकडे वळण घेतो. दगडांच्या वाटचालींच्या या खुणा स्पष्टपणे जमिनीवर आढळून येतात. यात कुठल्याही प्राण्यांच्या वावराच्या खुणा अजिबात आढळून येत नाहीत.

या सगळ्या प्रक्रियेचा विचार करता, येथील जमिनीला किंचितसा उतार आहे, हे जाणवते; पण उभट उतारावरील दगडसुद्धा ढकलल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत, हा सर्वांचा अनुभव आहे. शास्त्रज्ञांनी या दगडांची पाहणी केली, तेव्हा त्यांना आढळले की, साधारणत: छोटे दगड म्हणजे ५ इंच रुंदी असलेले ते १८ इंचापेक्षा जास्त रुंदी असलेले दगड सहसा भटकत नाहीत. झाली तर त्यांची वाटचाल ही अगदी थोड्या अंतराकरिता होते. जास्त भटकतात ते ६ ते १८ इंच रुंदी असलेले दगड. या दगडांची भटकण्याची गतीही शास्त्रज्ञांनी नोंदली आहे. यानुसार हे दगड एका मिनिटाला सरासरी ५ मीटर वाटचाल करतात. वाटचालीमुळे निर्माण होणाऱ्या व्रणांची खोली साधारणत: पाऊण इंच भरते. आणखी दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, यातील बहुतेक दगड हिवाळ्यातच फिरतात, फार क्वचित दगड पावसाळ्यात भटकताना आढळले.

काहींना वाटले की, हे दगड म्हणजे प्युमाईस (Pumice) या दगडाचा प्रकार असावा. प्युमाईस हा एकमेव असा दगडाचा प्रकार आहे की, तो खूप हलका असून तो पाण्यावर सहज तरंगतो. प्युमाईससारखे दगड वाऱ्याच्या झोतामुळे भटकत असावेत, असे त्यांना वाटते. पण प्रत्यक्षात येथे असणारे दगड सिनाईट (Syenite), डोलोमाईट (Dolomite), ब्लॅक डोलोमाईट (Black Dolomite) या प्रकारातील आहेत. सिनाईट हा आपल्याकडे आढळणाऱ्या बसॉल्ट सारखाच जड असून तो अग्निजन्य खडकाच्या प्रकारामध्ये मोडतो. डोलोमाईट हा रूपांतरित खडकाचा प्रकार असून तोही खूप जड असतो.

जवळजवळ दोन शतके हे गूढ गूढच राहिले. शास्त्रज्ञांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाच यश आले नाही. पण जेम्स आणि रिचर्ड नॉरीस या दोघा भावांनी, हे गूढ उकलायचा निश्चयच केला. त्यांनी हिवाळ्यातील २० डिसेंबर २०१३ ते ३१ जानेवारी २०१४ हा काळ संशोधनासाठी निवडला. त्यांनी एकूण ६० दगडांची निवड केली. यातील काही दगड (Cavity) पोकळी असलेले होते. या दगडांतील पोकळीत त्यांनी जीपीएस व टाइमलॅप्स फोटोग्राफीच्या (याच्या साहाय्याने व्हिडिओ फुटेज पाहता येते) ही यंत्रणा बसवली. हे सर्व पाहण्यासाठी या दोघांनी या परिसरात वेदर स्टेशनही स्थापन केले.
नोंदीनुसार २० डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१४ या काळात काही दगडांनी २२४ मीटर वाटचाल केली. काही दगड डावीकडे, तर काही दगड उजवीकडे वळले. वरील यंत्रणेच्या साहाय्याने दगडांची गती, दिशा, वेग यांची नोंद केली गेली आणि इतर सर्व अभ्यास केल्यानंतर हे दोन भाऊ हे गूढ उकलण्यात यशस्वी झाले. मागच्याच वर्षी त्यांचा शोधनिबंध PIOS-ONE या ऑनलाइन जर्नलने प्रसिद्ध केला.

त्यांनी त्यात म्हटले आहे की, अमेरिकेतल्या नेवाडा प्रांतातला हा प्रदेश अल्पवृष्टीचा आहे. जो काही पाऊस पडतो, तो फक्त हिवाळ्यातच. त्यातही लिटल बॉनी हे पूर्ण सुकून गेलेले विस्तीर्ण तळे आहे. गाळ साचून ते पूर्णपणे भरले आहे. मातीने पूर्ण भरल्यामुळे या तळ्याच्या पृष्ठभागावर अतिशय बारीक मातीचा थर आला आहे. या भागातील रात्री बऱ्याच थंड असतात. जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा या तळ्याच्या पृष्ठभागावर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे रात्र पडताच बर्फाच्या पातळ चादरीमध्ये रूपांतर होते. बर्फाचा हा थर अगदी पातळ म्हणजे, काही मिलीमीटर असतो. दिवस उगवल्यानंतर सूर्य वर येतो, तेव्हा त्याच्या उष्णतेमुळे दगडांच्या आजूबाजूचे बर्फ वितळते व पृष्ठभागावरील बर्फाच्या चादरीचे शेकडो पातळ तुकडे होतात. या बर्फाच्या तुकड्याखाली पृष्ठीभागी पाणी असल्यामुळे तो भाग निसरडा होतो. जेव्हा हवा वाहू लागते, तेव्हा हवेचा थोडासा धक्काही दगड पुढे सरकायला पुरेसा होतो. अशीच क्रिया रात्रंदिवस होत असते, त्यामुळे हे दगड भटकतात. पावसाळ्यात अथवा उन्हाळ्यात दगडांची वाटचाल न होण्यामागे हेच कारण आहे.
सर्व तज्ज्ञांनी त्यांचा निष्कर्ष मान्य केला आहे. अशा प्रकारे दोनशे वर्षे गूढ राहिलेल्या या प्रकरणाचा शोध लावण्यात हे दोघे बंधू यशस्वी झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...