Home | Magazine | Madhurima | Dharmaraj Mahuwalkar short story

सौ. वामनराव

धर्मराज माहूलकर | Update - Oct 10, 2017, 12:06 AM IST

अचानक वामनरावांच्या बंगल्यात एक वीस-पंचवीस वर्षांची तरुणी दिसू लागली. ती दिसायला सुंदर होती. तिची देहयष्टी भरदार होती. त

 • Dharmaraj Mahuwalkar short story
  अचानक वामनरावांच्या बंगल्यात एक वीस-पंचवीस वर्षांची तरुणी दिसू लागली. ती दिसायला सुंदर होती. तिची देहयष्टी भरदार होती. तिच्या अंगी चपळपणा होता. तिच्या हालचाली तारुण्यसुलभ होत्या. ती कधीकधी काही खरेदी करण्यासाठी बाहेर पडायची. कधी ती झाडावेलींना पाणी देताना दिसायची. त्या तरुणीला पािहल्यानंतर कॉलनीतल्या तरुण मुलांच्या चकरा वामनरावांच्या बंगल्यावरून सुरू झाल्या.
  सरस्वती कॉलनीत एकूण चाळीस बंगले होते. सर्वच बंगले सुंदर होते. मोठा प्लॉट, त्यात मध्यभागी इमारत आणि सभोवती मोकळी जागा. या मोकळ्या जागेत सर्व प्लॉटधारकांनी िनरिनराळ्या प्रकारची झाडे लावली होती. संुदर फुलांचे ताटवे होते. यातील एका बंगल्यात वामनराव राहात असत. सहा महिन्यांपूर्वी सरस्वतीबाई, वामनरावांच्या पत्नी वारल्या, तेव्हापासून एकाकी जीवन वामनरावांच्या वाट्याला आले.

  सरस्वतीबाई होत्या तेव्हा सुखात िदवस चालले होते त्यांचे. एकमेकांना साथ होती. दुखल्या-खुपल्यात ते दोघे एकमेकांना मदत करीत. मन मोकळं करण्यासाठी बोलणं होई. कॉलनीतल्या चारदोन बायका घरी येत. वामनरावांना ते पाहून खूप बरं वाटे. पण अचानक सरस्वतीबाई गेल्या अन् वामनरावांवर दु:खाचा डोंगर कोसळला. कसं तरी त्यांनी स्वतःला सावरलं. वामनराव निवृत्त होऊन सहासात वर्षं झाली होती. सरस्वतीबाई होत्या जेमतेम ६०-६१ वर्षांच्या. हे काही जाण्याचं नव्हतं. कॉलनीतल्या इतर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बायका अजून धडधाकट होत्या. वामनरावांचा मुलगा आिदत्य, एकुलता एक, लग्न होऊन अमेरिकेत स्थिरावला होता. त्याने बायकोही तिकडचीच केली होती. सरस्वतीबाई असताना ते दोघेही वर्षातून एकदा अमेरिकेत जाऊन यायचे. बाकी फोनवरच बोलणे व्हायचे. सरस्वतीबाई गेल्यानंतर त्याच्याकडेच येऊन राहा आणि उर्वरित जीवन मजेत घालवा, असे मुलगा आणि सूनबाई म्हणाल्या. पण वामनरावांनी त्याला स्पष्ट नकार दिला.
  “आदि, अमेरिकेत येऊन मी काय करू? कोणी बोलायला चालायला नाही. तिथली थंडी मला बाधते. चोवीस तास घरात बसणे मला आवडत नाही. इथे कॉलनीत माझ्याच वयाची बरीच निवृत्त मंडळी आहेत. त्यांच्याबरोबर गप्पाटप्पांत, देवाला जाण्यायेण्यात वेळ निघून जातो. इथे एकाकीपण आहे, पण अमेरिकेतील जीवन मला सहन होणार नाही. जास्तच थकलो म्हणजे पाहता येईल,” असे बोलून त्यांनी आिदत्यचे बोलणे निकालात काढले.
  वामनरावांचा दिवस कसाही निघून जात असे, पण रात्र त्यांना खायला उठत असे. वयोमानाप्रमाणे झोपेने असहकार पुकारला होता. गुडघ्यांची कुरकूर वाढली होती. मधूनमधून अंगही दुखत होतं. बीपी आणि शुगर कायमचे वास्तव्याला आले होते. सकाळ संध्याकाळ कॉलनीतले वृद्ध कॉलनीच्या मध्यभागी असलेल्या बागेत येऊन बसत. अर्थात वामनरावही त्यांच्या येण्याची वाट पाहत. पोटभरून गप्पा होत. थोडं हसणं होई. इकडच्या तिकडच्या बातम्या समजत. असेच एकेदिवशी सर्व मंडळी संध्याकाळी हिरवळीवर बसली होती. आज चघळायला कोणताही विषय नव्हता. अशा वेळी वसंतराव वामनरावांचा अदमास घेत म्हणाले, “वामनराव, वहिनींना जाऊन सहा महिने झाले असतील. खूपच एकाकी वाटत असेल तुम्हाला!”
  “जीवन आहे, चालायचंच. त्याला आपण काही करू शकत नाही.”
  “पण मी म्हणतो तुम्ही आता लग्न करायला हरकत नाही.”
  “काही तरीच काय बोलताय वसंतराव! लग्नाचं काय वय आहे माझं? अर्ध्या गोवऱ्या मसणात गेल्यात माझ्या!” वामनराव म्हणाले.

  “अहो वामनराव, लग्न तरुणपणीच करावं, म्हातारपणी करू नये असं थोडंच आहे. उलट उतारवयात जोडीदाराची अत्यंत आवश्यकता असते. सुखदु:खात एकमेकांना एकमेकांची साथ होते. दिवस बऱ्यापैकी निघून जातात!” वसंतराव म्हणाले.

  “वामनराव, मीही याबाबत तुम्हाला म्हणणार होतो. वसंतराव म्हणतात ते अगदी बरोबर आहे. सुदैवाने आमच्या बायका िजवंत आहेत. काही कुरबुरी सोडल्या तर अगदी मजेत काळ चालला आहे आमचा,” सदाभाऊ म्हणाले.

  वामनरावांनी काहीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे विषय तिथेच संपला. मधे बरेच दिवस निघून गेले आणि अचानक वामनरावांच्या बंगल्यात एक वीस-पंचवीस वर्षांची तरुणी दिसू लागली. ती दिसायला सुंदर होती. तिची देहयष्टी भरदार होती. तिच्या अंगी चपळपणा होता. तिच्या हालचाली तारुण्यसुलभ होत्या. ती कधीकधी काही खरेदी करण्यासाठी बाहेर पडायची. कधी ती झाडावेलींना पाणी देताना दिसायची. त्या तरुणीला पाहिल्यानंतर कॉलनीतल्या तरुण मुलांच्या चकरा वामनरावांच्या बंगल्यावरून सुरू झाल्या. निवृत्त मंडळी आपसात कुजबुज करू लागली. ती तरुणी बोलायला मोकळी असल्यामुळे कोणी तिच्याशी बोलल्याचा प्रयत्न केला तर ती हसून प्रतिसाद देई. कोणाशीही बोलणे तिला वर्ज्य नव्हतं. कॉलनीतल्या प्रत्येक घरातून मात्र कुजबूज वाढली.

  “एवढ्या लहान वयाच्या मुलीशी लग्न करणे शोभते का वामनरावांना!”
  “अगं, कसलं लग्नबिग्न. लग्न झालं असतं तर आपल्याला समजलं असतंच ना! एखादी अशीच.. पोरगी दिसते ती!”
  “वामनरावांच्या गडगंज संपत्तीवर डोळा दिसतो तिचा! अगदी पैजेवर सांगते, अगदी नागवं करून सोडील ती वामनरावांना!”
  “वामनरावांची पोरगी शोभते ती!”
  “वामनरावाकडे जास्त दिवस टिकणार नाही ती! काही दिवसांतच निघून गेलेली ऐकायला मिळेल तुम्हाला!”
  प्रत्येक कुटुंबाला चघळायला एक विषय मिळाला. कॉलनीतली मुले वामनरावाकडे जायला कारणे शोधू लागली. आणि या गोष्टींमुळे कॉलनीतली मरगळ निघून गेली, वातावरणात चैतन्य सरसरलं.
  बागेत जमलेल्या निवृत्तांनाही चघळायला नवा विषय मिळाला. वामनरावांना बैठकीला यायला कधी कधी उशीर व्हायचा. त्या वेळेत त्या तरुणीबाबत नाही नाही ते बोलणे होई. कोणीही अचकट विचकट बोलत राही; पण वामनराव येताच सर्व जण गप्प बसत. बऱ्याच सहकाऱ्यांनी वामनरावांना त्यांच्या लग्नाबाबत विचारले. ती तरुणी कुठली, तुमचा आणि तिचा संबंध कसा आला, मध्यस्थ कोण होते, तुम्हाला ती कशी घावली वगैरे प्रश्न विचारले. वामनरावांना माहीत होतं की, असे प्रश्न विचारले जाणारच. त्यांची उत्तरे तयारच होती. काही उडवाउडवीची उत्तरे देऊन ते बोलणाऱ्याचा आवाज बंद करीत. वामनराव काही दाद लागू देत नाहीत हे पाहून या लग्नाबाबत सर्वांनी विचारणे सोडून दिले. वामनरावांना तेच पाहिजे होतं.

  मध्ये बरेच दिवस निघून गेले आणि अचानक एकेदिवशी ती तरुणी वामनरावांच्या घरात वा कंपाउंडमध्ये दिसेना. तरुणांच्या वामनरावांच्या घरावरून होणाऱ्या चकरा थांबल्या.
  “अहो, पंचवीस वर्षांची तरुणी एका म्हाताऱ्याजवळ कशी राहील!”
  “वामनरावांना चांगलं लुटलं असेल तिनं! माल घेऊन पसार झाली वाटतं!”
  “अशा पोरी एकाजवळ कशा राहतील बरं! दहा घरं पाहायची सवय त्यांना!”
  “पण मी म्हणते, वामनरावांसारख्या माणसानं कशाला अशा गोष्टीत पडावं!”
  अशा प्रतिक्रिया कॉलनीतून उठत राहिल्या. पण वामनरावांच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही. नेहमीसारखीच त्यांची वर्तणूक होती. ते नेहमीप्रमाणे देवदर्शनाला जात-येत होते. बागेत सोबत्यांच्या घोळक्यात जात-येत होते. संध्याकाळची वेळ होती. असेच त्या दिवशी वामनराव मंडळीत जाऊन बसले.
  भाकररावांनी न राहवून विचारले, “काय वामनराव, आजकाल वहिनी दिसत नाहीत! माहेरी गेल्या काय?”
  “बरं झालं विचारलंत ते,” वामनराव म्हणाले. आता बाजूला बसलेल्या तरुण टोळक्याने कान टवकारले. वामनराव काय म्हणतात ते लक्षपूर्वक ऐकू लागले.

  “मित्रांनो, माझा मुलगा अमेरिकेत असतो हे तुम्हाला माहीत आहेच. त्याने मला अमेरिकेत राहायला बोलावले. पण माझा जीव तिकडे लागत नाही हेही तुम्हाला ठाऊक आहे. त्याची आई गेल्यामुळे माझे खूप हाल होतात हे त्याला समजले. तो एका अँड्राॅइड निर्मिती कारखान्यात मोठ्या पदावर आहे. आता अँड्राॅइड म्हणजे काय हे तुम्हाला सांगितले पािहजे. अँड्राॅइड म्हणजे मनुष्यसदृश रोबो. त्याला पाॅझिट्राॅनचा मेंदू बसवलेला असतो. त्यामुळे तो स्वत: विचार करू शकतो. विचार करून निर्णय घेतो. असाच एक स्त्री अँड्राॅइड माझ्या मुलानं माझ्याकडे पाठवला. ती खरी स्त्री आहे असं तुम्हाला वाटलं!” सर्व जण अवाक् होऊन वामनरावांचं बोलणं ऐकत होते.

  “माझ्या घरातील काही तरी काम करताना वा त्याला चार्ज करताना त्याच्या सर्किटमध्ये काही तरी दोष निर्माण झाला. म्हणनू अँड्राॅइड निश्चल होऊन पडला होता. चारपाच दिवसांपूर्वी मी त्याला मुलाकडे अमेिरकेला पाठवून दिला. आता मी नवीन अँड्राॅइडच्या प्रतीक्षेत आहे!”

  वामनरावांनी बोलणं संपवलं. त्यांनी सर्व वृद्धांच्या तोंडावरून नजर फिरवली. त्यांचे चेहरे कमालीचे पडले होते. पाहण्यासारखे झाले होते. बाजूलाच बसलेल्या तरुणांना वामनरावांच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही आणि एकेकाने तेथून काढता पाय घेतला!
  - धर्मराज माहूलकर, औरंगाबाद, dharmraj_mahulkar@yahoo.in

Trending