मी सुश्मिता सेनबद्दल जो विचार करत होतो, त्यापेक्षा ती खूपच निराळी आहे. ग्लॅमरच्या दुनियेतील गरजेनुसार सुश्मिता भले कितीही मॉडर्न रूप धारण करेल,
मात्र वास्तवात ती मनाने परंपराप्रिय व अस्सल भारतीय आहे. खासगी आयुष्यामध्ये दिखाऊपणा व मोठेपणा करण्यात तिला अजिबात स्वारस्य नाही.
सुश्मिता सेन...भारताची पहिली विश्वसुंदरी. वीस वर्षांपूर्वी मिळालेल्या या किताबाने सुश्मिता तर चकित झालीच होती, त्याचबरोबर समस्त भारतीयही या घटनेने मंत्रमुग्ध झाले होते. ज्या सौंदर्य स्पर्धेमध्ये ऐश्वर्या राय हिला मागे टाकून सुश्मिता अव्वल स्थानावर पोहोचली होती, त्याच ऐश्वर्याने बॉलीवूडमध्ये मात्र सुश्मिताला पिछाडीला टाकले. अभिनयाच्या संदर्भात ऐश्वर्याची ‘प्लास्टिकची बाहुली’ अशा शब्दांत हेटाळणी केली गेली, त्याच वेळेला सुश्मिताने काही वेगळ्या धर्तीच्या चित्रपटांत अभिनय करून
आपला खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता.
सुश्मिता उर्फ सुशच्या आयुष्यात प्रेमप्रकरणे खूप झाली. आपल्या आयुष्यात आलेल्या पुरुषाच्या आकंठ प्रेमात बुडत असल्याने ती कायम चर्चेत राहिली, पण तिची प्रेमप्रकरणे अल्पजीवी ठरली. मग तो विक्रम भट्ट असो वा संजय नारंग, सबीर भाटिया, रणदीप हुड्डा, इम्तियाज खत्री, मानव मेनन, बंटी सचदेवा किंवा मुदस्सर अजीज. तिचा सध्याचा प्रियकर रिितक भसीन हादेखील सुशच्या आयुष्यात तिला कायम साथसोबत देईल की नाही, याबद्दल ठोसपणे काहीच सांगता येत नाही. असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सुश्मिताचा स्वभाव. ती फटकळ वा उथळ नाहीये, पण संवेदनशील व दृढनिश्चयी आहे. आपल्या प्रियकराच्या प्रेमामध्ये तिला जरा जरी स्वार्थ आढळला की ती त्याच्याशी संबंध कायमचे तोडते. मला आठवते, मी सुश्मिताला तिच्या ‘सद््गुरू सुंदरी’ या घरी दुसऱ्यांदा भेटलो होतो. त्याच्या आधी ‘पैसा वसूल’ या चित्रपटाच्या निमित्ताने आमची भेट झाली होती. दुसऱ्यांदा मी तिला भेटलो तेव्हा निमित्त होते ‘जिंदगी रॉक्स’ या चित्रपटाचे. मी तिला भेटलो त्या वेळी या चित्रपटाची दिग्दर्शिका तनुजा चंद्रासमवेत लेखक मुदस्सर अजीजही तेथे हजर होते. नेमकी याच काळात तिची व मुदस्सर अजीज यांची प्रेमकहाणी बहरात आलेली होती. या भेटीत जिंदगी रॉक्स या चित्रपटासंदर्भात चर्चा केल्यानंतर आमची गाडी सुश्मिताच्या भविष्यातील योजनांकडे वळली. सुश्मिता लग्न कधी करणार, याबद्दल मी तिला काही प्रश्न विचारले. त्यावर ती भावनावश होऊन म्हणाली, ‘लग्न जुळणे ही गोष्ट माणसाच्या हाती आहे असे मला वाटत नाही...लग्न होणे ही घटना केवळ एका माणसाच्या मर्जीवर अवलंबून नसते. आपला जोडीदार होण्यासाठी आणखी एका व्यक्तीची सहमती असणे आवश्यक असते. जोडीदाराशिवाय लग्न कसे काय होऊ शकेल?’ सुश्मिता हे बोलताना मुदस्सरकडेही पाहत होती, कळत-नकळत त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती की, तो खरंच तिला कुठवर आणि किती काळापर्यंत साथ देणार आहे. सुश्मिताच्या या साऱ्या भावमुद्रांचे निरीक्षण मी करीत होतो. बोलता बोलता सुश्मिताने अचानक एक नवीन सिगारेट शिलगावली...आता ती अधिक आत्मविश्वासाने बोलू लागली, ‘मला सहानुभूती दाखविणाऱ्या लोकांना वाटते की माझ्या समकालीन अभिनेत्रींइतकी मी नशिबवान नाहीये. पण मी याबद्दल फार विचार का करू? रिनीसारख्या गोंडस मुलीची आई बनण्याचे भाग्य मला लाभले आहे.’
सुश्मिताने वयाच्या पंचविसाव्या वर्षी रिनीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. मुदस्सर व सुश्मिता यांचे प्रेम सुफळ झाले नाही, पण दीर्घ न्यायालयीन कज्जेदलालीनंतर तिच्यावर न्यायालयाने विश्वास दाखवून तिला २०१०मध्ये अजून एक मुलगी (अलिशा) दत्तक घेण्याची परवानगी दिली.
पुढील स्लाइडमध्ये, जाणून घ्या सुश्मिताच्या देवघराविषयी