आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dharmendra Pratap Singh About Sonu Waliya, Rasik, Divya Marathi

सोनू वालिया: काळाच्या पडद्याआड लपलेलं नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटजगतात काम करण्याचे आकर्षण भल्याभल्यांना सुटत नाही. पण या चंचल दुनियेत टिकणे मात्र अवघड असते. खून भरी मांगसारख्या चित्रपटात रेखासारख्या अभिनेत्रीसमोर उत्तम अभिनय करणारी सोनू वालिया दीर्घ काळ पडद्यावर टिकेल, असे वाटत होते; पण काही दिवसांपूर्वी तिला अत्यंत दयनीय अवस्थेत भेटण्याचा मला अनुभव आला होता. एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मित्राला मी मदत करावी, असे माझ्या ऑफिसच्या सहकार्‍याने मला सांगितले. मी त्या इंजिनिअरबरोबर संवाद साधला असता मला भलताच किस्सा ऐकायला मिळाला. एके काळी मिस इंडियाचा किताब पटकावून चित्रपटात उत्तम अभिनय करणार्‍या सोनू वालियाने या इंजिनिअरने तिचा संगणक ठीक करूनही त्याचे पैसे दिले नव्हते. त्याने स्वत: 12 हजार रुपये खर्च करुन संगणकासाठी आवश्यक भाग बसवले होते. त्याच्यासोबत मी हा प्रश्न सोडवण्यासाठी सोनूच्या घरी जाण्याचे ठरवले. मालाड स्टेशनवरून त्याच्यासोबत अत्यंत कच्च्या रस्त्यावरून रिक्षाने सोनूच्या घरी गेलो. एका वयस्क व्यक्तीने सोनूच्या घराचे दार उघडले. ते सोनूचे पती प्रताप सिंह होते. अत्यंत अरुंद खोली असलेल्या वन रुम किचनमध्ये सोनू आपल्या पतीसमवेत राहते आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. प्रताप सिंह सोनूचे दुसरे पती. मिस इंडियाचा सुडौल बांधा जाऊन सोनू एक जाड, पंजाबी महिला दिसत होती. डोक्यापासून तिने ओढणी ओढली होती. तिची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शिक्षणानिमित्त बाहेरगावी होती. साधं पाणी पीत थेट मुद्द्यावर येत तिला त्या इंजिनिअरचे पैसे परत करण्याविषयी विचारले.
इतका वेळ बळे बळे हसण्याचा प्रयत्न करणार्‍या सोनूने व तिच्या पतीने वास्तव कथन केले. चित्रपटाची निर्मिती करण्याच्या नादात दोघे कंगाल झाले होते. आम्ही त्याचे पैसे नक्की परत करू, विश्वास नसेल तर संगणकात लावलेला पार्ट तो परत घेऊन जाऊ शकतो, असे सोनूने सांगितले. सोनूने त्या वन रुम किचनमध्येच त्या संगणकासह ऑफिस थाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे दिसत होते. वरवर हसणारी सोनू आतून पूर्णपणे कोलमडली होती, हे स्पष्ट दिसत होते. तरीदेखील आता नवी फिल्म बनवून लवकरच आम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊ, अशी आशा सोनू व तिच्या पतीच्या बोलण्यात होती. मीसुद्धा पत्रकारितेची विद्यार्थिनी आहे, असे सांगत सोनू पुन्हा हसली. या वेळी मात्र तिच्या हसण्यात सरावलेला मोकळेपणा होता. तिचे आश्वासन मी ऐकले खरे; पण मी मात्र तिच्या घरून परतताना निदान तिची मुलगी तरी तिची स्वप्ने पूर्ण करेल, अशीच मनोमन प्रार्थना करत होतो.