आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदाज आमिरचा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटसृष्टीत ‘मि.परफेक्शनिस्ट’ या नावाने प्रख्यात असलेल्या आमिर खानचा अंदाज खरोखरच न्यारा आहे. दुस-याने आखलेली रेषा छोटी कशी आहे, हे दाखवून आपण त्याच्यापेक्षा किती श्रेष्ठ आहोत, हे दाखविण्याचा उद्योग तो कधी करत नाही. उलट दुस-याने आखलेल्या रेषेला समांतर अशी स्वत:ची मोठी रेषा आमिर आखतो. आमिर खानच्या ‘गजनी’च्या विक्रमी उत्पन्नाचाच परिपाक म्हणजे ‘100 कोटी क्लब’ ही संकल्पना इंडस्ट्रीत रुजली. आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ हा बॉलीवूडचा आजवरचा सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून गणला गेला. पण हा विक्रम ‘धूम-3’ने तोडला. पुन्हा आमिर खान 100 कोटी क्लबमध्ये प्रथम क्रमांकावर विराजमान झाला. आमिर खान ज्या जाहिरातीत काम करतो, त्यातही नक्कीच आगळेपणा असतो. देशातून कुपोषणाचे उच्चाटन करण्यासाठी केलेले आवाहन असो किंवा भारताच्या गौरवशाली परंपरेचे गुणगान गाणारी ‘अतिथी देवो भव:’ ही जाहिरात! इतकेच नाही तर टेलिव्हिजनवरही ‘सत्यमेव जयते’च्या माध्यमातून आमिर खानने केलेल्या एन्ट्रीची अदा सा-यांपेक्षा न्यारी असते... चित्रपटविषयक लिखाण करणा-या देशातील पत्रकारांपैकी काही निवडक पत्रकारांची यादी आमिर खान याने तयार केली आहे, असे म्हटले जाते. या पत्रकारांशी आमिर खान केव्हाही मोकळेपणाने संवाद साधतो. आझाद खान राव याचा जन्म झाल्यानंतर या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी पिता आमिर खानने या निवडक पत्रकारांना मिठाई पाठविली, तेव्हा मला या गोष्टीचा प्रत्यय आला. आमिर खानची भेट मिळणे हे आम्हा पत्रकारांसाठी आजही तितकेच दुष्कर आहे. पण जर त्याची भेट झाली तर पत्रकाराने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला आमिर खान अर्धेमुर्धे उत्तर देत नाही; समाधानकारक उत्तरे देऊनच तो त्या पत्रकाराची पाठवण करतो. थोडक्यात, आमिर खानची चित्रपटसृष्टीमध्ये जी शान आहे, त्याचे श्रेय त्याच्या ‘एक्स्क्लुझिव्ह’ वागण्या-बोलण्यात आहे.
आमिर खानशी माझी पहिली भेट मुंबईतील फिल्मसिटीमध्ये झाली होती. तिथे तो ‘इश्क’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. मी माझे वरिष्ठ सहकारी अनिल राही व छायाचित्रकार रावसाहेब दाभाडे यांच्या समवेत ‘इश्क’च्या चित्रीकरणस्थळी पोहोचलो होतो. ‘दैनिक भास्कर’साठी आम्ही आमिर खानची घेतलेली ती पहिली विस्तृत मुलाखत होती. त्यासाठी अनिल राही यांनी आमिर खानचा तत्कालीन सेक्रेटरी आशिषला फोन करून भेटीची वेळ निश्चित केली होती. स्टुडिओच्या कार्यालयात तयार केलेल्या सेटवर आम्ही पोहोचलो. आमिर खानवर चित्रित होत होते. त्यामुळे तो मोकळा होण्याची वाट पाहात आम्ही तिथे थांबून राहिलो. थोड्या वेळाने लंच ब्रेक झाला. त्यावेळी आमिर खान स्टुडिओ इमारतीच्या दुस-या मजल्यावर असलेल्या त्याच्या मेकअप रुममध्ये त्यावेळी चित्रपट अभिनेता-अभिनेत्रींसाठी व्हॅनिटी व्हॅन सज्ज असण्याचे युग अजून अवतरलेले नव्हते. आम्हाला घेऊन गेला. आमच्यासाठी चहा व नाष्टा आणायला सांगून फ्रेश होण्यासाठी बाथरुममध्ये गेला. 15 मिनिटांनी मुलाखतीस प्रारंभ झाला. मुलाखती दरम्यान आमिर खानला कधी अनिल राही प्रश्न विचारायचे तर कधी मी... विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे तो आढेवेढे न घेता सुस्पष्ट उत्तर द्यायचा. दुस-या बाजूस रावसाहेब दाभाडे आमिर खानची छायाचित्रे काढण्यात गर्क होता. सतत फ्लॅशचा चकचकाट होत होता, मात्र आमिरने त्याबद्दल जराही नाराजी व्यक्त केली नाही. सुमारे एक ते दीड तास आम्ही त्याची मुलाखत घेत होतो, त्या दरम्यान आमिर खानला दिग्दर्शक इंद्रकुमार यांच्याकडून शॉट रेडी असल्याबद्दल दोनदा तरी बोलावणे आले होते. मात्र अजून थोडा वेळ थांबा... असे निरोप त्यांना पाठवत आमिर खानने आमचे समाधान होईस्तोवर प्रश्न विचारू दिले. त्यांची समाधानकारक उत्तरेही दिली.
गेल्या एक-दोन वर्षांत काही ना काही निमित्ताने आमिर खानशी भेटीगाठी होत राहिल्या. या भेटींपैकी विशेष आठवणीत राहिली ती हॉटेल सन अँड सँडमधली भेट. दैनिक भास्कर समूहाने आपल्या वाचकांसाठी स्क्रॅप बुकशी संबंधित एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना आमिर खानच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार होते. आम्ही आमिरला भेटायला गेलो, त्या वेळी तुम्हाला तो फक्त पाच मिनिटे भेटू शकेल, असे ‘स्पाईस’ पीआर कंपनीच्या रुकेशकुमारने आम्हाला बजावले होते. पण, केवळ पाचच मिनिटांसाठीच येणार, अशी पूर्वसूचना देणारा आमिर खान या पुरस्कार वितरण सोहळ्याला आला आणि तिथेच रमला. आपल्याला या समारंभाला काही वेळ उपस्थित राहून दुसरीकडे तडक जायचे आहे, ही गोष्ट विसरला. दैनिक भास्कर आयोजित स्पर्धेचे व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या संकल्पनेचे केवळ कोडकौतुक करूनच आमिर खान थांबला नाही, तर त्याने समारंभाला उपस्थित असलेली मुले व श्रोत्यांना त्याच्याबरोबर मनसोक्त छायाचित्रे काढून घेण्याची मुभा दिली. सुमारे एक तास तो या समारंभात सहभागी झाला. त्याने आपल्या सहज वागण्याने तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या हृदयात स्थान पटकावले होते. कधी जाहीर न झालेली गोष्ट, म्हणजे आमिर खानने या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याआधी एक सिगरेट शिलगावली होती. ती ओढून झाल्यावर समारंभासाठी हॉटेलच्या वरच्या मजल्यावर जाण्याकरिता लिफ्टमध्ये प्रवेश करण्याआधी आपल्यासोबत असलेल्यांना तो म्हणाला, ‘धूम्रपान हे आरोग्यासाठी खरंच अपायकारक आहे.’ शाहरुख खान व अजय देवगणही धूम्रपान करतात, असा मी उल्लेख करताच आमिर खान त्यावर म्हणाला, ‘माझ्या तुलनेत ते दोघे जण अधिक सिगरेट्स ओढतात, हे खरे आहे... मी कधीतरी अधूनमधून सिगरेट ओढतो. पण माझ्याप्रमाणे शेवटच्या झुरक्यापर्यंत हे दोघे जण कधीच सिगरेट पित नाहीत.’ (हे बोलल्यानंतर आमिर छानसा हसला.) तो पुढे म्हणाला, ‘मी संपूर्ण परफेक्शनने सिगरेट ओढली, हे तुला लक्षात आले असेलच. कदाचित त्यामुळेच लोक मला ‘परफेक्शनिस्ट’ म्हणत असावेत!’ वाचकहो, आता तुमच्या लक्षात आलेच असेल की, बॉलीवूडमध्ये आमिर खानला पर्याय का नाहीये ते!
dpsingh@dainikbhaskargroup.com