आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित, संदूक आणि लॉकअप...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले स्वप्न साकार करण्यासाठी हामीद दिवसभर स्टुडियोत चकरा मारायचा आणि रात्री येऊन धर्मशाळेतल्या त्या संदूकवर ढाराढूर झोपायचा. त्याच्या खोलीच्या बाहेर काही गुंड रात्री जुगार खेळत बसायचे आणि शेजार-पाजार्‍यांची झोपमोड करायचे. परंतु हामीद कधीच त्या गुंडांच्या वाटेला गेले नाहीत. एका रात्री हामीद असेच थकून झोपी गेले होते, तेवढ्यात अचानक गलका ऐकू आला. त्यांची झोप चाळवली. मात्र, काही कळायच्या आतच लपण्यासाठी सर्व गुंड त्यांच्या खोलीत घुसले. त्यांच्यापाठोपाठ काही पोलिसही आले होते. पोलिसांनी त्या गुंडांसोबत हामीद यांनाही गुंड समजून जवळच्या प्रिन्सेस स्ट्रीट पोलिस स्टेशनला नेले आणि तुरुंगात डांबले.

ही घटना शनिवारी घडली. दुसर्‍या दिवशी रविवार असल्याने सोमवारीच आरोपींना कोर्टासमोर हजर केले जाणार, हे ऐकताच हामीद एखाद्या लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडू लागले. पोलिस इन्स्पेक्टरने त्यांना हटकले, तेव्हा त्यांनी आर्जव केले, ‘मी निर्दोष आहे... मला मुक्त करा.’ हामीदच्या डोळ्यांमधला सच्चेपणा पोलिस अधिकार्‍यांनी ओळखला. त्यांनी हामीदला ऑफर दिली, ‘जर तू यातल्या अपराधी व्यक्तींची ओळख पटवून दिलीस तर इतर निरपराध व्यक्तींसोबत आम्ही तुझीही सुटका करू.’

साहजिकच हामीद यांनी समुद्रात राहून मगरीशी वैर करण्याचा धोका पत्करला; परंतु पोलिस ठाण्यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी दाखवलेली इमानदारी त्यांना चांगलीच महागात पडली. सोमवारी जेव्हा ते धर्मशाळेच्या जवळ पोहोचले, तेव्हा त्या गुंडांमधील एक दादा रामपुरी चाकू घेऊन त्यांना आडवा आला. एव्हाना ते सगळे जण सुटून आले होते. ‘त्या दिवशी निर्दोष म्हणून तू माझे नाव का घेतले नाहीस? आज त्याची किंमत तुला जीव देऊन चुकवावी लागेल.’ हामीद यांची पाचावर धारण बसली. पण त्यांच्यात कुठून बळ संचारले माहीत नाही, ते उलटपावली धावत सुटले व थेट पोलिस स्टेशन गाठले. ड्यूटी ऑफिसरला त्यांनी घडला प्रकार सांगितला. पोलिस अधिकार्‍यांनीही कर्तव्यतत्परता दाखवत त्या गुंडाला पकडण्यासाठी पोलिसांची फौज पाठवली आणि त्याचा चांगला पोलिसी पाहुणचार केला. त्यानंतर तो दादा सुधारला आणि हामीद यांची मोहल्ल्यात पत वाढली...

कालांतराने हामीद यांना सिनेमात संधी मिळू लागली. ‘अजित’ या नावाने त्यांची हिंदी सिनेसृष्टीत वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला हीरो म्हणून, मात्र परिस्थितीवश खलनायकाच्या भूमिका करत हामीद यांनी स्वत:ला सिद्ध केले. स्ट्रगलर असताना संदूकवर झाेपून रात्र काढलेल्या अजित यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठत आपल्या कमाईने किती तरी संदूक भरल्या...

धर्मेंद्र प्रताप सिंग
dpsingh@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...