आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिमलदांना भीती उर्दूची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रारंभीच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीवर उर्दू भाषेचा खासा प्रभाव होता. त्याला कारणही तसंच होतं. मायानगरीत नशीब आजमावण्यासाठी येणाऱ्यांमध्ये आणि स्थिरावणाऱ्यांमध्ये पेशावर- पंजाब प्रांतातून येणाऱ्या कलावंतांचा भरणा अधिक होता. तसं पाहता उत्तर-दक्षिण भारत, बंगाल प्रांतातूनही प्रतिभाशाली कलावंत चित्रपटसृष्टीत दाखल होत होते, पण त्यांनाही उर्दूचा प्रभाव टाळता येत नव्हता.

तब्बल सहा चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले बिमल रॉय उर्फ बिमलदा हे पक्के बंगाली गृहस्थ होते. हिंदीबाबत त्यांची फारशी अडचण नव्हती; मात्र दिलीपकुमार, बलराज साहनीसारखे दिग्गज सोबत असूनही उर्दूशी त्यांचं वैर होतं. पण, अस्सल उर्दू भाषेचा गंध असलेला चित्रपट निर्माण करण्याची खुमखुमीसुद्धा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्यांनी आधी येऊन गेलेल्या ‘भाईजान’ चित्रपटाचा ‘बेनजीर’ नावाने रिमेक करण्याचा निर्णय घेतला. एस. खलील यांना दिग्दर्शक म्हणून करारबद्ध करण्यात आलं. मध्यवर्ती भूमिका मीनाकुमारी आणि अशोककुमार या त्या काळच्या टॉपच्या कलावंतांना देण्यात आली. चित्रपटाची पार्श्वभूमी उर्दू भाषेशी नातं सांगणारी असल्यामुळे खलील यांनी संवादलेखनसुद्धा उर्दूत असावं, असा तर्कसंगत विचार मांडला. त्यावर निर्माता-दिग्दर्शक-संवादलेखक कमाल अमरोही यांचं नाव निश्चित झालं.
पुढची पायरी म्हणून खलील यांच्या म्हणण्यानुसार, बिमलदांनी अमरोहींच्या घरी जाणं अपेक्षित होतं. पण बिमलदा त्याला नकार देत होते. त्यांचं म्हणणं, तू अमरोहीसाहेबांना माझ्याकडे घेऊन ये, आपण इथे बसू, छानपैकी गप्पा मारू… पण खलीलना ते काही पटत नव्हतं. ते म्हणत होते, यह अच्छा नहीं है। क्यों की इंडस्ट्री में आप की तरह वे भी निर्माता की हैसियत रखते है…पण तरीही बिमलदा काचकुच करत राहिले. अखेर त्यांनी खलील यांना खरं कारण बोलून दाखवलं, म्हणाले, ‘कमाल बडी गाढ़ी उर्दू बोलते है, मैं वहां नही जा सकता।’ शेवटी, या झमेल्यात अमरोहींच्या नावापुढे फुली मारली गेली. खलील हेच चित्रपटाचे संवाद लिहिणार, हे ठरलं. पुढे रीतसर शूटिंग सुरू झालं. पण बिमलदांनी मनाशी ठरवून टाकलं की, काही झालं तरी सेटवर जायचं नाही म्हणजे नाही. एरवी बिमलदा सेटवर हजर म्हणजे इतरांची अग्निपरीक्षा असे. कारण, प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीत लक्ष घालणे, ऐन वेळी बदल सुचवणे असे प्रकार ते करीत. त्यामुळे अनेकांसाठी ते सेटवर येणार नाहीत, ही समाधानाचीच बाब होती. पण एक दिवस बिमलदांना राहावलं नाही. ते तडक सेटवर गेले. मीनाकुमारी आणि अशोककुमार यांच्यामधल्या एका दृश्याचं चित्रण होत होतं. त्यात मीनाकुमारी ‘तौबा, तौबा, आप तो खुदाई का दावा करने लगे’, असा संवाद म्हणते; त्यावर अशोककुमार ‘नडाजो बिल्लाह’(प्रेषिताला शरण जाणे) एवढंच उत्तरतो. बिमलदांनी ते ऐकलं आणि ते सरळ सेटच्या बाहेर पडले. घरी जाता जाता त्यांनी आपल्या साहाय्यकाला एकाच प्रश्नाने भंडावून सोडलं, ‘वो नोजो बिल्ला, नोजो बिल्ला क्या था?’

dpsingh@dbcorp.in