आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dharmendra Pratap Singh Article About Glamorous Designer Gauri Khan

ग्लॅमरस डिझायनर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वसामान्यांसाठी अंतर्गत सजावट अर्थात इंटिरियर डिझाइनिंग ही अतिशय खर्चिक बाब आणि चंगळवादी बाब; परंतु गर्भश्रीमंतांसाठी तेच त्यांचे स्टाइल स्टेटमेंट असते. म्हणजे, या मंडळींच्या घराचे बाह्यरूप जितके भव्यदिव्य तितकेच अंतरंगही डोळे दिपवणारे असते. अनेकदा जितका खर्च ते घर खरेदीवर करतात, त्याच पटीत अंतर्गत सजावटीवर खर्च करण्याकडे बहुतेकांचा कल असतो. त्यामुळेच या क्षेत्रात मागणी खूप असते; परंतु उच्च अभिरुची, प्रसिद्धी आणि लोकप्रियता या तीन गोष्टी इंटिरियर डिझायनर्सचा भाव वधारणार्‍या ठरत असतात. सध्या एलिट क्लासमध्ये अंतर्गत सजावटकार म्हणून गौरी खान हे नाव चांगलेच वलय राखून आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खानची बायको असलेल्या गौरी खानने आपल्या फ्लॅट वा बंगल्याची सजावट करावी, यासाठी गर्भश्रीमंत मोठी किंमत मोजायला तयार आहेत. लौकिकार्थाने गौरी खानचा दर्जा पॉल मॅसी, रोझाना हु किंवा हॅरि बेट्ससारख्या ‘हॉल ऑफ फेम’ मिळवणार्‍या आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त सजावटकारांइतका नसला तरीही, दुबई-दिल्ली-मुंबई-पुण्यातल्या विशिष्ट वर्तुळात तिच्या नावाला मागणी वाढत आहे.

दुबईतल्या रिअल इस्टेट व्यवसायात भागीदारी असलेल्या गौरी खानने ‘द फर्स्ट फेरी’ नामक आर्किटेक्चर फर्म सुरू केली आहे. दोन वर्षांपूर्वी तिने मुंबईत सुझान खानसोबत ‘चारकोल’ नावाचे फर्निचर स्टोअरही सुरू केले होते. त्या स्टोअरची तारीफ करताना शाहरुखने ट्विट करताना म्हटले होते, तुम्ही मुलींनी लाकडामध्येही प्राण ओतलेत. जणू काही फर्निचरच्या रूपातले लाकूड बोलायला लागलेय… साक्षात शाहरुख खान कौतुक करतोय म्हटल्यावर गौरीच्या नावालाही ग्लॅमर येणे स्वाभाविक होते. आधी मला मॉडेलिंग आणि क्लॉथ डिझाइनिंगमध्ये करिअर करण्याची खूप इच्छा होती. परंतु लग्न, मुलं आणि एकूणच कौटुंबिक जबाबदार्‍या पेलताना त्याकडे लक्ष देता आले नाही. आता मात्र इंटिरियर डिझाइनिंगकडे मला पूर्ण लक्ष द्यायचे आहे, असे जरी या क्षणी गौरी खानचे म्हणणे असले तरीही, शाहरुख खानच्या प्रसिद्ध सहा मजली उंचीच्या ‘मन्नत’ बंगल्यातली सजावटकार गौरी खानच होती, हे एव्हाना ठाऊक झाले आहे. ‘मन्नत’मधली बाग, स्विमिंग पूल, मुघलकालीन राजवाड्यांची आठवण करून देणारे रेखीव खांब, परीकथेत शोभावी अशी डायनिंग रूम, अल्ट्रा मॉडर्न बाथरूम आणि त्यातला संगमरवरी बाथटब, लाल मखमली बेडरूम…हे सगळे बंगल्याच्या नावाला शोभणारे आहेच; पण हे सगळे मुख्यत: गौरी खानच्या कल्पनेतून साकारण्यात आलेले आहे.

असे म्हणतात की, गौरी खानचे सौंदर्यभान इतरांपेक्षा आगळे आहे. २०१०मध्ये तिने बडोद्यातल्या जवळपास सहा हजार स्क्वेअर फूट आकाराच्या घराची अंतर्गत सजावट केली होती. तिचे ‘मन्नत’मधले आणि बडोद्याचे ते काम बघूनच पुण्याच्या कोलते-पाटील डेव्हलपर्सने सजावटकार म्हणून कंपनीच्या संचालक मंडळावर तिची नियुक्ती केली होती. पहिल्याच प्रयत्नात गौरी खानला पाच टॉवरमधल्या दोन ते सहा हजार स्क्वेअर फूट जागा असलेल्या फ्लॅटच्या सजावटीचे आव्हान पेलायचे होते. त्यातले सगळ्यात आव्हानात्मक काम होते, पेंटहाऊसमध्ये बाग-बगीचा आकारास आणण्याचे. आज त्याच सुखावणार्‍या बागा प्रोजेक्टची खासियत मानल्या जाताहेत. या संदर्भात गौरी म्हणते, या अनुभवाने तिला व्यावसायिक सजावटकार होण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास दिला.

अनेकांनी माझ्या खासगी पसंतीला स्वत:ची पसंती म्हणून मान्यता दिली. त्या अर्थाने कोलते-पाटील डेव्हलपर्समुळे मिळालेल्या अनुभवाने सजावटकार म्हणून गौरी खानला या क्षेत्रात नाव मिळवून दिले. ती म्हणते, कुणा परिचित मित्र-मैत्रिणीच्या घराची सजावट करण्याचा विचार मला फारसा उत्साह मिळवून देत नाही. कारण, तो सगळा मैत्रीतला मामला होऊन बसतो. दोघांमध्येही एक प्रकारचा भिडस्तपणा असतो. माझ्या कल्पनांना कुणी सहसा नाही म्हणत नाही वा पटत नसूनही त्यांची एखादी कल्पना उचलून धरण्यावाचून मला पर्याय नसतो; परंतु जेव्हा मी व्यावसायिक स्तरावर अनोळखी व्यक्तींची घरं सजवते, तेव्हा मला माझी व्यावसायिकता पणाला लावावी लागते, तेव्हा दोन्ही बाजूंनी पर्याय खुले असतात. जे उत्तम आहे, तेच स्वीकारले जाते. पुण्याच्या कोलते-पाटील डेव्हलपर्समुळे मिळालेल्या अनुभवाचे मोल म्हणूनच मोठे आहे.

असे म्हणतात की, पुण्यात ज्या घरांची सजावट गौरी खानने केली आहे, त्या एका घराची किंमत सात ते आठ कोटी इतकी आहे. ज्या प्रोजेक्टसाठी तिने काम केले, त्या जागेत स्वत:चेही एक घर असावे, अशी इच्छा गौरीने व्यक्त केली होती, असेही म्हणतात. पण गौरी खान या नावाला असलेल्या ब्रँड व्हॅल्यूमुळे इतरांनी तिथे जागा घेण्यात जी तत्परता दाखवली, त्यामुळे खुद्द तिच्यासाठी बिल्डरला एकही जागा शिल्लक ठेवता आली नाही…
dpsingh@dbcorp.in