आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dharmendra Pratap Singh Article About Human Story

बेरकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पं. कन्हैयालाल चतुर्वेदी म्हणजेच, सिनेअभिनेते कन्हैयालाल, यांना अभिनयाची आवड बालपणापासूनच होती. त्यांना नाटकाचा छंद होता. त्यामुळे त्यांचे अभ्यासात अजिबात मन रमत नसे. त्यांच्या या नाटकवेडाला कंटाळून घरच्या मंडळींनी त्यांना किराणा दुकानात बसवले, पण तिथूनही ते नाटक बघण्यासाठी पळ काढत. त्यांना जखडून ठेवणे अशक्य आहे, हे ओळखून घरच्या मंडळींनी त्यांना अखेर नाटकासाठी मुक्त केले. मायानगरी मुंबईतही ते नाटकात काम करण्यासाठीच आले. ‘१५ अगस्त’ नाटकात त्यांनी कामही केले; पण सेन्सॉरने आक्षेप घेतल्यामुळे त्यांना खूप नुकसान सोसावे लागले, त्यांचे नाटकाचे स्वप्न भंग पावले.

सुदैवाने, ‘एक ही रास्ता’(१९३९)मध्ये त्यांना भूमिका मिळाली आणि त्या संधीचे त्यांनी सोने केले. सुप्रसिद्ध निर्माता महबूब खान कन्हैयालालच्या अभिनयाने प्रभावित झाले. म्हणूनच खान यांनी ‘औरत’(१९४०) सिनेमा जेव्हा नव्याने ‘मदर इंडिया’(१९५७) नावाने प्रदर्शित करण्याचे ठरविले, तेव्हा इतर कलाकार नवीन होते; मात्र ‘सुखी लाला’च्या भूमिकेत कन्हैयालाल कायम होते. ‘मदर इंडिया’साठी कन्हैयालालपेक्षा उत्तम खलनायक दुसरा कोणी असूच शकत नाही, हा महबूब खान यांनी दाखवलेला विश्वास हे जणू कन्हैयालाल यांच्या योग्यतेचे प्रमाणपत्र होते. यानंतर गंगा जमुना, उपकार, धरती कहे पुकार के, होली आई रे, अपना देश, हम पांच या एकाहून एक सरस चित्रपटांमधून कन्हैयालालनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ‘राम बचाए...’, ‘भगवान झूठ न बुलाए...’, ‘कल्लू को अंधा कर दे लल्लू...’ हे त्याचे संवाद लोकांमध्ये ‘तकिया कलाम’ बनून लोकप्रिय होत.

बनारसी छापाची कन्हैयालाल यांची छबी साधारणपणे सगळ्या सिनेमांमध्ये सारखीच दिसायची. तरीही बनारसी पानाप्रमाणेच त्यांचा हा बनारसी बाबूही चाहत्यांमध्ये लोकप्रिय होता. तब्बल तीन दशके कंजूष शेठ, कडक सावकार, बदमाश मुनीम, लालची बनिया, चलाख पुजारी, लबाड साक्षीदार, खोटारडा नोकर, गावात फूट पाडणारा नारद अशा साळसूद चेहऱ्यामागे लपलेल्या खलनायकाच्या भूमिका त्यांनी अफलातून रंगवल्या. आपल्या बोलण्याच्या, हसण्याच्या, खोकण्याच्या विशिष्ट लकबीने ते भूमिकेत जिवंतपणा आणत. कोणीतरी त्यांच्याबद्दल मार्मिक टिप्पणी केली आहे, ‘कन्हैयालाल तो असली बनारसी ठग है, जो हर-एक भूमिका में अपना रूप-रंग और हाव-भाव बदल कर दर्शकों के दिलों में उतर जाते है!’ मात्र काही लोकांना त्यांच्या अभिनयातला नाटकीपणा खटकत असे. कन्हैयालाल यांनी त्या टीकेलाही उत्तर दिले होते, ‘मेरे रोल ही हाईपिच वाले होते है। मैने असल जिंदगी में कुछ साहूकारों को ऐसे ही देखा है, जो दिन-रात बक-बक करते रहते है। वैसे भी, गांव के लोगों को अपना दबदबा बनाए रखने की खातिर अपनी आवाज को बुलंद किए रखना शायद जरूरी लगता है!’ मुंबईतल्या फिल्मी माहोलमध्ये राहूनही पान आणि भांग त्यांना तितकीच प्रिय होती. गुडघ्यापर्यंत धोतर आणि पंडित स्टाइलची बनियान हा त्यांचा घरातला वेष असे. त्यांना कविता करण्याचाही शौक होता. पण त्यांनी आपल्या कविता कधीच ‘कलमबंद’ केल्या नाहीत. ते कथाकारही होते. मोफत औषधांप्रमाणे आपल्या मनातल्या नवनव्या कल्पना कोणालाही सहजगत्या सांगून जाणाऱ्या कन्हैयालालनी त्याचा धंदा कधीच केला नाही...
(dpsingh@dbcorp.in)