आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dharmendra Pratap Singh Article About Rajesh Khanna

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूतकाळातच जगलेला सुपरस्टार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडचे पहिलेवहिले सुपरस्टार राजेश खन्ना ऊर्फ काका यांना त्या काळात मिळालेली लोकप्रियता मी दुर्दैवाने त्यांच्या पिढीतील नसल्याने अनुभवू शकलो नाही. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याप्रति चाहत्यांमध्ये असलेली आत्मीयता मात्र पुरेपूर अनुभवायला मिळाली. ती बघून ते प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांच्यात अहंकार का जागा झाला असावा, याचा मला अंदाज आला. आपल्या आयुष्याच्या शेवटी शेवटी काका खूप एकाकी पडले होते. आपल्या सुरामध्ये सूर मिळवणारी माणसेच ते आपल्या अवतीभवती असणे पसंत करीत. एक तर दत्तक मुलगा असल्याकारणाने त्यांचे लहानपण खूप लाडाकोडात गेले होते. शिवाय त्यांना चित्रपटसृष्टीत अपार यशही मिळाले होते. हेदेखील एक कारण त्यांच्या अशा स्वभावामागे दडले होते. एकाहून एक सरस चित्रपट यशस्वी होत गेल्यानंतर काकांचा अहंकार अधिकच वाढत गेला. कालांतराने तर पत्रकारांच्या टीकात्मक प्रश्नांना टाळण्यासाठी त्यांनी प्रसारमाध्यमांपासून दूर राहणे पसंत केले. त्यामुळे उगवत्या सूर्याला नमस्कार करणार्‍या चित्रपटसृष्टीनेही त्यांना एकाकीपणात ढकलले.

माझी एकदा तरी काकांची मुलाखत घेण्याची इच्छा होती. सगळी औपचारिकता पूर्ण करून काका एका सोफ्यावर बसले. आजूबाजूला पत्रकारांनाही त्यांनी बसवून घेतले. भूतकाळाबद्दल छेडले असता, त्यांच्यानंतर आलेल्या अनेक कलाकारांबद्दल त्यांनी वाटेल तशी टीका करायला सुरुवात केली. ‘स्वघोषित स्टारसुद्धा चित्रपट मिळविण्यासाठी निर्माता-दिग्दर्शकांकडे याचना करताना दिसतात, पण ‘आनंद’ची कथा ऐकवण्यासाठी ऋषिदांना माझ्या ‘आशीर्वाद’वर यावे लागले होते.’ असे गर्वाने सांगत काकांनी तोरा मिरवला.

काका वर्तमानात परतायला तयार नव्हते, हे मला जाणवत होते. काका खरे तर सुपरस्टार म्हणून काही काळच लोकप्रिय होते. बच्चनयुग सुरू झाल्यानंतर त्यांची जादू ओसरली होती. पण काका मात्र अजूनही स्वत:ला ‘दिग्गज’ म्हणूनच सिद्ध करू बघत होते. आजकाल बच्चन, खान सगळेच तर शो करतात, असे काकांनी पत्रकारांना आपल्या सीरियलमध्ये काम करण्याच्या मुद्द्यावर येत म्हटले. मी त्यांच्याशी बोलताना म्हणालो, ‘शो व मालिका यात फरक आहे. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कलाकार मालिकांकडे वळतात.’ माझे बोलणे पूर्ण होत नाही तोच काकांनी आपल्या सहकलाकाराला पेग भरायला सांगत, माझ्यापासून सुटका मिळविण्याची संधी शोधली, ‘बस्स मुझे पीने के लिए अकेला छोड दो... जय हिंद’. आता याला मी काकांचा अहंकार म्हणू शकत नाही; पण काका भूतकाळातून बाहेर यायला तयारच नव्हते.
dpsingh@dainikbhaskargroup.com