आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dharmendra Pratap Singh Article On Divyam Bharati

चटका लावणारा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॉड गिफ्टेड’ हे विशेषण आपण खूप जपून वापरतो. आज जशी कंगना राणावत झेप घेतेय, नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी अभिनय क्षितिजावर चमकलेली दिव्या भारती अशीच "गॉड गिफ्टेड' प्रकारात मोडणारी अभिनेत्री होती. तिच्या सहज अभिनयाने त्या काळच्या टॉपच्या गणल्या जाणाऱ्या श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित या नट्यांनाही आव्हान दिलं होतं. परंतु बहुतेक "गॉड गिफ्टेड' माणसांमध्ये असणारा स्वभावदोष तिच्यामध्येही होता.
म्हणजे, ती कमालीची अधीर होती, कोपिष्ट होती, हट्टी होती आणि महत्त्वाचं म्हणजे, अतिसंवेदनशील होती. वेळप्रसंगी स्वत:ला इजा करून घेण्यासही ती मागेपुढे पाहत नसे. तिला तिच्या ठायी असलेल्या अभिनयगुणांची पुरती जाण होती की नाही, हे ठाऊक नाही. मात्र तिचा कल आपल्या एक्सेेन्स्ट्रिक वर्तनाने या क्षमतांना आव्हान देण्याकडेच अधिक होता.

याबाबत मात्र त्या वेळी कुणाचेही दुमत नव्हते की, ती मनाने कमालीची निर्मळ मुलगी होती, ओठात एक पोटात एक असा कावेबाजपणा तिच्यात नव्हता. जे काही करायचं ते थेट सगळ्यांना साक्षी ठेवून करायचं, असा तिचा स्वभाव होता. तिचा पारा कधी चढेल आणि कधी उतरेल, याचा नेम नसायचा. निर्माता-दिग्दर्शकांनी विनंती करूनही अंगात १०४ ताप असताना काम थांबवायला नकार द्यायची. म्हणजे, दिव्या भारतीचं रागावणं आणि खुश होणं हा अनेकांसाठी अनप्रेडिक्टेबल खेळ असायचा.
तिचा आणि गोविंदाचा "शोला और शबनम' नावाचा सिनेमा त्या काळी सुपरहिट ठरला होता. आताचे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी या सिनेमाचे निर्माते होते. सिनेमा होता भडक; पण त्यातही दिव्याच्या सहज नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. याच सिनेमाच्या निर्मितीदरम्यानचा एक किस्सा अभिनेता राजा बुंदेला यांना आठवला. ते म्हणाले, उटीला शूटिंग होतं. एक दिवस तिने स्वत:ला सहा-सात तास रूममध्ये कोंडून ठेवलं. अनेकांनी अनेक प्रयत्न केले, पण ती बधली नाही. चौकशी केल्यावर कळलं, सेटवर पोहोचण्याची चुकीची वेळ सांगितल्याने ती प्रचंड संतापली होती आणि त्या संतापाच्या भरात तिने स्वत:ला इतरांपासून तोडलं होतं.

दिव्याचं वय लहान होतं, त्यामुळे हा तिचा बालिशपणा म्हणून अनेकांनी तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण बुंदेला म्हणतात, दिव्याचं वय त्या वेळी जेमतेम १९ होतं, पण ती इतर समजतात तशी बालिश नक्कीच नव्हती. प्रदीर्घ संवाद पाठ करण्याची ट्रिक सांगितली होती, त्यावर तिची प्रतिक्रिया होती, "यह जिंदगी भी तो कॉमा और फुलस्टॉप में बंटी हुई है…' आता कोण बालिश मुलगी असा तात्त्विक अंगाने विचार करेल? सांगायचा मतलब असा, पडद्यावर भल्याभल्यांची बोबडी वळवणारी दिव्या भारती विचारांनी प्रगल्भ होती. बुंदेलांशी तिने एक-दोनदा मरणाबाबत चर्चाही केली होती. बुंदेला म्हणतात, एकदा ती म्हणाली होती, "यह कितनी अजीब बात है कि, हम अचानक कब मर जाएं, किसीको पता नहीं…', पण यातून तिची जगण्याची तीव्र इच्छाच प्रकट होत होती. त्यामुळे जेव्हा तिच्या मरणाची बातमी आली, आणि तिने खिडकीतून उडी मारण्याआधी दारू प्यायली होती, असे सांगितले गेले, तेव्हा बुंदेलांना भयानक आश्चर्य वाटले. ते म्हणतात, ही शक्यता असेलही; पण उटीतल्या कडाक्याच्या थंडीत आम्ही महिनाभर शूटिंग करत होतो, पण त्या कालावधीत मी दिव्याला एकदाही दारू पिताना बघितले नव्हते. किंवा तसे इतर कुणी अनुभवल्याचे कानावरही आले नव्हते.शेवटी कारण काहीही असो, एका गुणवान अभिनेत्रीचा ५ एप्रिल १९९३ रोजी झालेला गूढ शेवट तिच्या चाहत्यांना चटका लावणारा ठरला होता.
dpsingh@dbcorp.in