आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dharmendra Pratap Singh's Artical On Pandit Pradeep

जेव्हा मजरूहची टिंगल त्यांच्यावरच उलटली....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा भारतात इंटरनेट क्रांती सोडाच; इलेक्ट्रॉनिक मीडियाची सद्दी अद्याप सुरू व्हायची होती. त्या वेळी (1997-98) तर मोबाइलचं युगदेखील सुरूच व्हायचं होतं. एखादी घटना-दुर्घटना घडली तर त्या वेळी त्याच्यावर फिल्मी मंडळींची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही त्यांना लँडलाइनवर फोन करायचो. एकदा अशीच बातमी मिळाली, की भारत सरकारने कवी-गीतकार पं. प्रदीप यांना चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. पंडितजींना हा पुरस्कार मिळावा यासाठी ब-याच वर्षांपासून मागणी होत असल्याने सर्वांनाच या बातमीने आनंद झाला. मलाही विशेष आनंद झाला. कारण गेली काही वर्षे माझं पंडितजींकडे नियमित येणं-जाणं होतं. पंडितजींची लहान मुलगी मितुल प्रदीप जेव्हा म्हणायची - बापू को हींग बहुत पसंद है- तेव्हा त्याचा अर्थ असायचा, की पंडितजींनी माझी आठवण केली आहे. कारण मला माहीत होतं की पंडितजींना रोजच्या जेवणात वरणातच नाही तर भाजीतही हिंग लागायचा. आणि योगायोगानं मी जिथं राहायचो तिथं घराशेजारीच शुद्ध आणि सुगंधी हिंग मिळायचा. त्यामुळे मी दोन-तीन तोळे हिंग घेऊन दुस-या दिवशी लगेच पंडितजींच्या विलेपार्ले येथील पंचामृत बंगल्यावर जायचो.
असो. पंडितजी हे दुसरे गीतकार होते, ज्यांना हा सन्मान लाभणार होता. त्याआधी चार वर्षांपूर्वी हा सन्मान गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना मिळाला होता. त्यामुळे मी साहजिकच त्यांना फोन लावून त्यांची प्रतिक्रिया विचारली. माझा परिचय दिल्यावर त्यांना जेव्हा याबाबत विचारलं; तेव्हा ते निर्विकारपणे म्हणाले- ‘मिळाला असेल, मी काय करू?’
मी तरीही नेटाने विचारलं, की असा पुरस्कार मिळणारे आपण पहिले गीतकार आहात. मग आता आणखी एका गीतकाराला हा पुरस्कार मिळतोय, त्याबद्दल तुम्हाला काहीच म्हणायचं नाही का? ‘आणखी काय म्हणू?’, असं म्हणत मजरूहसाहेब त्यांच्या मनातली मळमळ शेवटी बाहेर काढायला लागले... ‘पंडित नेहरू जर त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगों या गाण्यावर रडले असतील तर त्याचा अर्थ असा होत नाही, की ते मोठे गीतकार आहेत.’ मला खरंच आश्चर्य वाटलं, की हा तोच महान शायर आहे का, ज्याने लिहिलेल्या शायरीचा अर्थ उर्दू न येणा-या माणसालादेखील कळायचा. मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया...त्यामुळे मी स्वत:लाच सांभाळत म्हटलं, की पंडितजींना केवळ त्याच एका गाण्यासाठी हा पुरस्कार मिळालेला नाही... त्यांनी देशप्रेमावर आधारित इतरही अनेक गाणी लिहिली आहेत. पण ऐ मेरे वतन... हे गाणं तर राष्ट्रगीताच्या बरोबरीनं मानलं जातं. त्यावर ते चांगलेच भडकले, म्हणाले- ‘हूं..आंख कोई कटोरा नहीं है, कि उसमें पानी भर लेने की अपील की जाए... जरा आंख में भर लो पानी...’ आता माझी वेळ होती; मी त्यांना त्यांच्याच- चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे... या गाण्याची आठवण करून दिली. यावर ते चांगलेच खुश झाले.
‘हां हां, मला सर्वश्रेष्ठ गीतकाराचा एकमेव फिल्मफेअर अवॉर्ड याच गाण्यासाठी (फिल्म - दोस्ती) तर मिळाला होता.’ मी लगेच म्हटलं, ‘मग काय तुम्ही दुपारी प्रेम नाही करणार.. रात्री पण नाही करणार का...’ यावर ते चांगलेच भडकले. ‘तुम्ही काही पत्रकार वाटत नाही...’ मी पण माझा मुद्दा धरून राहिलो, ‘तुम्ही काहीही म्हणा सर, पण अर्थाचा अनर्थ तुम्हीच करत आहात...’ त्यानंतर मजरूह साहेबांनी फोन ठेवून दिला, हे सांगायलाच नको. तरीही मला हे सांगायला मुळीच संकोच वाटत नाही, की ते एक उद्धट व्यक्ती होते; ज्यांनी पंडितजींची टर उडवायच्या नादात स्वत:चेच हसे करून घेतले...
dpsingh@dainikbhaskargroup.com