आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dharmendra Pratap Singh's Artical On Udit Narayan

थप्पड की गुंज!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकारितेतले ते माझे सुरुवातीचे दिवस होते, जेव्हा मला एका संध्याकाळी बातमी मिळाली की महालक्ष्मीच्या रेसकोर्समधील एका कार्यक्रमात संगीतकार लक्ष्मीकांत यांनी उदित नारायणला थप्पड मारली. उदित त्या कार्यक्रमात उशिरा पोहोचला म्हणून लक्ष्मीकांतजींना राग आला होता. ही बातमी लिहून मी जुहू हॉटेलातील इला अरूण यांच्या ‘वोट फॉर घाघरा’ या अल्बमच्या रिलीज पार्टीला गेलो. ‘खलनायक’ चित्रपटातील ‘चोली के पिछे क्या है’ या गाण्यामुळे इला अरूण प्रसिद्धीस आली होती. त्यामुळे या पार्टीला बरेच संगीतकार-गायक यांच्या येण्याची अपेक्षा होती. उदितपण या पार्टीत होते. ते काही पत्रकारांसोबत बोलतच होते; तितक्यात मी अति-उत्साहाच्या भरात त्यांच्याजवळ जाऊन विचारलं की, लक्ष्मीजींनी तुम्हाला थप्पड का मारली? उदित या प्रश्नाने हबकलेच. आपल्या रागावर नियंत्रण ठेवत त्यांनी खोटं खोटं हसत विचारलं, तुम्ही कोणत्या पेपरला काम करता? त्यांना माझ्या संपादकांना माझी तक्रार करायची होती, हे तर दिसतच होतं; पण अडचण ही होती, की संपादकांशी बोलणं झालं, तर थप्पड मारण्याची गोष्टही उघड होईल. त्या वेळी पत्रकारितेच्या मूळ धर्मासोबतच मला आमच्या संपादकांचा स्वभावही आठवला. ते नेहमी आम्हाला सांगायचे, की अशा बातम्या प्रकाशित होईस्तोवर ऑफिस सोडायचं नाही. म्हणून मी उदितजींना सांगितलं, की सर हे तर मी तुम्हाला उद्याच सांगू शकेन. माझ्या प्रश्नाने त्रासलेले उदित नारायण लवकरच पार्टी सोडून गेले.
त्यानंतर काही काळानंतरची गोष्ट. एकदा वरिष्ठ पत्रकार ब्रजेश दुबे यांची फिल्मिस्तानमध्ये भेट झाली. आम्ही गप्पा मारत असतानाच त्यांनी म्हटलं, की वेळ असेल तर सहारा स्टुडिओमध्ये उदितजींना भेटून येऊ. मला काही अडचण नव्हती. दुबेजी त्या वेळी उदितजींचा पीआर बघत होते; म्हणून मला वाटलं की त्यांचं काही काम असेल उदितजींकडे. तिथे रेकॉर्डिंग रुममध्ये उदितजींना कळलं, की दुबेजी आले आहेत तसे ते बाहेर आले. माझी दुबेजींनी ओळख करून देताच उदितजी म्हणाले, ‘आपण या आधीही कुठे तरी भेटलो आहोत.’ ‘भेटलो असू. मी पत्रकार आहे’, अशा आविर्भावात मी खांदे उडवले. ‘नाही नाही आपण जुहू हॉटेलला भेटलो होतो.’ उदितला आठवलं. आणि मी अडचणीत आलो. दुबेजींना त्या वेळचा किस्सा माहीत नव्हता, त्यामुळे मी लवकरच तिथून निघून आलो. त्यानंतर काही वर्षांनी मुलाखतींच्या निमित्ताने माझं उदितजींच्या घरी येणंजाणं सुरू झालं. त्याच दरम्यान उदितजींच्या पत्नी दीपाशीही माझं बोलणं व्हायचं. पण एकदा मी उदितजींनाच फोनवर भोजपुरीत बोलताना ऐकलं आणि चकित झालो. ते कोणा पत्रकाराला सांगत होते, ‘साहब तो अबही रेकाडींग पे गइल बाडन!’ स्वाभाविकपणे या घटनेनंतर उदितजींकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. मला कळलं होतं, की सार्वजनिक आयुष्यात सभ्य आणि मृदुभाषी व्यक्ती म्हणून वावरणारे उदित नारायण प्रत्यक्षात किती ढोंगी आहेत.
त्यानंतर दोन-तीन वर्षे उदितशी बोलायची संधी मिळाली नव्हती. तेव्हा अचानक कळलं, की दीपा तर त्यांची दुसरी बायको आहे. रंजना या आपल्या पहिल्या बायकोला त्यांनी त्यांच्या गावातच दयनीय अवस्थेत सोडून दिलं होतं. मी उदितशी फोनवर बोलायचा प्रयत्न केला तर स्वत:ला ड्रायव्हर म्हणविणा-या माणसानं म्हटलं, ‘साहेब रेकॉर्डिंग करत आहेत. तुमचा मेसेज मी त्यांना देईन.’ त्यांच्याशी संपर्क साधण्याचे माझे प्रयत्न यशस्वी ठरले नाही. मला समजत नव्हतं, की उदितची बाजू जाणून घेतल्याशिवाय बातमी कशी द्यायची. तेव्हाच ऑफिसात पत्रकार श्याम शर्मा आले. मला माहीत होतं, की शर्मा उदितचा पीआरही सांभाळत असतात. म्हणून मी त्यांना म्हटलं, ‘उदितचा इंटरव्हू घ्यायचा आहे; पण तो बोलायला तयार नाही.’ शर्माजीने हे ऐकताच लगेच उदितला फोन लावला. उदितने फोन उचलला तसा शर्माजींनी त्यांना ‘यांच्याशी बोला’ म्हणत फोन माझ्या हातात दिला. मी थेट विचारलं, ‘ही दोन बायकांची काय भानगड आहे?’ उदितचं तोंडच बंद झालं. शर्माजींनी त्यांना चांगलंच अडकवलं होतं. आता शर्माजी माझ्या हातातून फोन घ्यायच्या मागे लागले तर मी त्यांना तसंच थोपवत त्यांना सांगत होतो, की त्यांचं काम झालंय आणि दुसरीकडे उदितलाही सांगत होतो, की आमच्या बातमीसाठी त्यांची प्रतिक्रिया किती गरजेची आहे ते. उदितने अर्थातच त्या दिवशी रंजनाचा आरोप नाकारला; पण काही दिवसांतच उदितला माघार घ्यावी लागली. असं म्हटलं जातं, की समझोता करून त्यांनी आपली बाजू सावरून घेतली. पण जेव्हा केव्हा उदितशी भेट व्हायची तेव्हा हेच वाटायचं, की त्यांना कधीकाळी बसलेली थप्पड ते अजूनही विसरलेले नाहीत...