आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि कविमनाचे शैलेंद्र खचले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९६० च्या सुमाराची घटना. ‘विमल राय प्रॉडक्शन’पासून विभक्त झाल्यानंतर बासू भट्टाचार्य एका छोट्याशा खोलीमध्ये राहात होते आणि १०० फुटाची ही खोली शैलेंद्र यांचे दुसरे आश्रयस्थान होते. इथे राहात असताना बासू यांनी जे स्वप्न पाहिले होते, शैलेंद्रदेखील तशीच स्वप्नं रंगवत होते. योगायोगाने, फणीश्वर नाथ ‘रेणु’ यांची ‘तिसरी कसम’ ही कथा वाचून दोघांनाही एकाच वेळी असे वाटले की, या कथानकावर आर्ट फिल्म केल्यास ती प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल. जेव्हा राज कपूरना ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांना सुरुवातीला थोडी धास्ती वाटली, पण जेव्हा त्यांना कथानकात काही दम नसल्याचे जाणवले, तेव्हा ते निर्धास्त झाले. त्यांनी बेरकीपणाने मी या सिनेमात विनामोबदला काम करीन, असा प्रस्ताव शैलेंद्र यांच्यासमोर ठेवला. मित्राच्या या प्रस्तावाने शैलेंद्र हुरळून गेले; पण ती खूप मोठी चूक ठरली, ज्याची किंमत त्यांना आयुष्यभर मोजावी लागली. हीरामन या ग्रामीण युवकाच्या भूमिकेसाठी राज शोभणारे नाहीत, हे माहीत असूनही त्यांच्या सिनेसृष्टीतील नावाचा दबदबा लक्षात घेता बासू यांनी या प्रस्तावाला संमती दर्शविली. आता नायक इतका मातब्बर म्हणजे, नायिकाही त्याच तोडीची हवी, म्हणून हीराबाईच्या भूमिकेसाठी वहिदा रहमानची निवड करण्यात आली. सगळी जमवाजमव झाली, पण राज यांच्या तारखाच मिळेनात. शैलेंद्र जेव्हा जेव्हा राज यांच्याकडे तारखा मागण्यासाठी जात, तेव्हा त्यांना एकच उत्तर मिळे, “मी तर काय घरचाच माणूस आहे, जेव्हा सांगाल तेव्हा येईन. जरा “संगम’ पूर्ण होऊ दे...’ या घरच्या माणसामुळे ‘...कसम’ पुढे सरकतच नव्हता. ‘संगम’ पूर्ण होऊन प्रदर्शितही झाला. त्यानंतर राज ‘मेरा नाम जोकर’च्या कामात गुंतले... त्यांच्या टाळाटाळीचा निर्माता म्हणून पदार्पण करू पाहणाऱ्या शैलेंद्र यांना चांगलाच आर्थिक फटका बसत होता. ते कर्जबाजारी झाले. पण तरीही ते ‘घरच्या माणसापुढे’ तोंड उघडू शकत नव्हते, कारण आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त राज कपूर विनामोबदला काम करणार होते! अखेर कसाबसा सिनेमा पूर्ण झाला. आता प्रदर्शनात अडचणी येऊ लागल्या. वितरक नाक मुरडू लागले...
राज कपूर नायक असूनही ‘...कसम’ला वितरक मिळत नव्हता आणि वितरकांच्या मागणीनुसार ‘रेणु’यांच्या कथानकाची हत्या करणे शैलेंद्र यांना प्रशस्त वाटत नव्हते. ‘संगम’साठी दोन्ही हातांनी पैसे वाटणाऱ्या राज यांनी मनावर घेतले असते तर ‘...कसम’ प्रदर्शित करून शैलेंद्र यांना कर्जातून बाहेर काढू शकले असते. पण असे केल्याने शैलेंद्र यांना सिनेमा बनवण्याची शिक्षा कशी मिळाली असती! शेवटी शैलेंद्र यांनी वितरकांकडून विना गॅरंटी रक्कम घेऊन स्वत: ‘...कसम’ प्रदर्शित केला. पण दुर्दैवाने त्याने चांगलीच आपटी खाल्ली आणि शैलेंद्र खूप दुखावले. कालपर्यंत जे लोक मित्र म्हणवत होते, ते आज जखमेवर मीठ चाेळू लागले, ही गोष्ट कवीमनाच्या शैलेंद्र यांना जिव्हारी लागली. त्यातच १४ डिसेंबर १९६६ रोजी त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यानंतर ‘...कसम’ला सर्वश्रेष्ठ सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण हे यश शैलेंद्र यांना बघता आले नाही. त्यांच्या मनात ही खंत कायमची राहिली की, ‘काश, मुझे इस सम्मान का एक अंश भी जीते-जी मिल जाता तो मैं अभी दुनिया को अलविदा ही नहीं करता!’
(dpsingh@dbcorp.in)