आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhridhar Tilave About Alternative Timeline, Raisk, Divya Marathi

'अल्टर्नेटिव्ह टाइमलाइन'चा उदय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाइमलाइनच्या इतिहासातील सध्या उदयाला आलेली एक विलक्षण टाइमलाइन म्हणजे अल्टर्नेटिव्ह टाइमलाइन होय.

या अल्टर्नेटिव्ह टाइमलाइनमध्ये एकमेकांशी काडीचाही संबंध नाही, असे वाटणार्‍या घटनांना एकत्र जोडून एक वेगळीच टाइमफ्रेम आकलनाच्या अंगाने सादर केली जाते...'
मागील लेखात एडिटॉलॉजीचा विचार आपण केला. आता आपण टायमालॉजीतल्या टाइमलाइन या गोष्टीचा विचार करायचा आहे. सध्या भाषा आणि डाटा प्रचंड झाल्यामुळे जे काही मुद्दे उपस्थित झालेत, त्यातून टाइमलाइनचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. फेसबुक वापरणार्‍या सर्वांनाच टाइमलाइन ही संकल्पना तशी परिचित आहे. तुम्ही फेसबुकवर जे जे काही करता, ते तपशीलवारपणे काळाच्या अंगाने क्रमिक पद्धतीने केलेली मांडणी फेसबुकच्या टाइमलाइनमध्ये आपणाला दिसते. हा टाइमलाइनचा प्रश्न डाटा आणि भाषा प्रचंड झाल्याने कसा घोळ निर्माण होतो, त्याचे एक उदाहरण मी येथे देतो.

गोवा, कोकण आणि कर्नाटक येथे गेली कित्येक वर्षे हत्ती मानवी वस्तीत येत आहेत. त्यातून काही वेगळेच प्रश्न निर्माण झाले आहेत. या अंगाने ‘हत्ती’ नावाची एक प्रचंड दीर्घकविता मी लिहिली होती. आणि ती प्रथम ‘परिवर्तनाचा वाटसरू’च्या 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2007च्या अंकात आली होती. पुढे ही कविता ‘चॅनल डिस्ट्रॉयरी’ या ग्रंथाली प्रकाशनाने 2009मध्ये प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहात आली. त्यानंतर अजय कांडर यांचा ‘हत्ती इलो’ हा कवितासंग्रह आला. त्याचा विषय समानच होता. लोकमतने पुरस्कार जाहीर करताना हा संग्रह गाजवला आणि पुढेही वाजतगाजत राहिला. अनेकांनी हा विषय प्रथमच हाताळल्याबद्दल अजय कांडर यांचे अभिनंदनही केले. मला स्वत:ला हे घडत असताना प्रॉब्लेम वाटत नव्हता; पण कोल्हापुरात असताना एका वाचकाने माझीच कविता ही अजय कांडरच्या संग्रहावरून आली असावी, असा आरोप माझा कवितासंग्रह किंवा परिवर्तनाचा वाटसरूचा अंक न वाचताच माझ्यावर केला. त्यामुळे नाइलाजाने मला हे सांगावे लागले की, माझी कविता प्रथम लिहिण्यात आली. इथे प्रश्न असा निर्माण होतो की, मराठीतील तथाकथित अनेक दिग्गज समीक्षकांना वस्तुस्थिती पूर्ण माहीत असूनही याबाबतीत मौन का पाळावे लागले? या प्रश्नाचे उत्तर दुहेरी आहे. पहिले म्हणजे, हे मुद्दाम केले आहे. आणि दुसरे उत्तर, या विषयाची टाइमलाइनच त्यांना माहीत नसावी. प्रश्न असा येतो की, ही टाइमलाइन त्यांना का माहीत नसावी. तर त्याचे उत्तर असे की, सध्या भाषा-डाटा प्रचंड झाला आहे. त्यामुळे टाइमलाइनमध्ये नेमकी कोणती गोष्ट प्रथम झाली, तेच नेमके अनेक समीक्षकांना माहीत नसते. आणि इथेच टाइमलाइन स्पेशालिस्टची गरज भासते. हा टाइमलाइन स्पेशालिस्ट काय करतो?

तो कुठल्या गोष्टीचा आरंभ कधी झाला? कुणी केला? आणि का केला? हे नीट शोधून काढतो. दुसरी गोष्ट, तो आरंभ झालेल्या गोष्टीची कशी कशी वाढ झाली, कशी कशी प्रगती आणि विकास झाला, आणि ती गोष्ट कशी कशी आणि केव्हा अपडेट झाली, त्याचा साकल्याने अभ्यास करून त्याची कालिक मांडणी करतो. आणि यदाकदाचित त्या गोष्टीचा मृत्यू झाला तर तो मृत्यू केव्हा, कधी, कसा झाला, त्याचीही नोंद करतो. पूर्वी ही गोष्ट इतिहासकार करत होता, पण डाटा प्रचंड झाल्यानंतर इंटरनेटवर टाइमलाइन स्पेशालिस्टची प्रचंड गरज निर्माण होते आहे. दुर्दैवाने मराठीत तरी टाइमलाइन स्पेशालिस्ट जवळजवळ नाहीतच. त्यामुळे कुठलाही माणूस कुठल्याही गोष्टीचे क्रेडिट उपटू शकतो. इंटरनेटवर गेली काही वर्षे अनेक सृजनात्मक गोष्टींची सर्रास चोरी होत आहे. दुसर्‍याने निर्माण केलेल्या गोष्टी ढापायच्या आणि त्या आपल्या नावावर खपवायच्या, ही गोष्ट फोटो आणि कवितेबाबत तर सातत्याने घडताना दिसते. तिला आळा घालायचा असेल तर टाइमलाइनर स्पेशालिस्टची गरज भविष्यकाळात अधिकाधिक वाढत जाणार, हे निश्चित आहे.

पर्सनल टाइमलाइन ही एक नव्याने उदयाला आलेली साहित्यिक गोष्ट आहे. माझ्या ‘चौथी नवता... नवअनियतकालिके’ या ग्रंथात ‘नवता आणि हत्ती, स्टेप बाय स्टेप’ या निबंधात मी मराठी साहित्यातील हत्ती आणि माझ्या कवितेतील हत्ती यांची पर्सनल टाइमलाइन मांडली होती. जिज्ञासूंनी ती जरूर वाचावी. अशा टाइमलाइन्स मराठी साहित्यात जितक्या वाढत जातील, तितके मराठी साहित्याचे टाइमलाइनात्मक महत्त्व अधोरेखित होत जाईल. आणि त्यामुळे काही नवी आकलने आपल्या दृष्टिपथात येऊ शकतील.

टाइमलाइनच्या इतिहासातील सध्या उदयाला आलेली एक विलक्षण टाइमलाइन म्हणजे अर्ल्टर्नेटिव्ह टाइमलाइन होय. या अल्टर्नेटिव्ह टाइमलाइनमध्ये एकमेकांशी काडीचाही संबंध नाही, असे वाटणार्‍या घटनांना एकत्र जोडून एक वेगळीच टाइमफ्रेम आकलनाच्या अंगाने सादर केली जाते.

उदाहरणार्थ, इंग्लंडमध्ये 11व्या शतकात उदयाला आलेल्या वजनदार नांगरामुळे आत्ताचा पर्सनल कॉम्प्युटर तयार झाला, हे सिद्ध करणारी टाइमलाइन. या टाइमलाइनच्या मध्ये इंग्लंडमध्ये वजनदार नांगर तयार झाला, त्यामुळे शेतीचे प्रचंड उत्पादन वाढले. त्यामुळे शेतकर्‍याकडे अतिरिक्त शेतीमाल निर्माण झाला. हा अतिरिक्त माल विकण्यासाठी म्हणून तो आपल्या खेडेगावाच्या बाहेर पडला आणि आपल्या मालाच्या विक्रीतून त्याने वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करायला सुरुवात केली. त्यातून मोठ्या बाजारपेठा तयार झाल्या. बाजारपेठांमुळे शहरे निर्माण झाली. या शहरांच्यात प्रचंड लोकसंख्या निर्माण झाली. या लोकसंख्येने प्रचंड घाण निर्माण केली. या प्रचंड घाणीमुळे प्रचंड उंदीर निर्माण झाले. या उंदरांमुळे प्लेग निर्माण झाला. या प्लेगमुळे शहरांतील 90 ते 95 टक्के लोक मेले. यामुळे शहरांत अचानक मजुरांची टंचाई निर्माण झाली. या टंचाईमुळे श्रमिक कामे करण्यासाठी नवीन यंत्रे निर्माण झाली. या यंत्रांमुळे चाके निर्माण झाली. या चाकांमुळे वेगाने धावणारी जहाजे तयार झाली. या जहाजांमुळे अमेरिका आणि इतरत्र प्रचंड प्रमाणात युरोपकडून लोक स्थलांतरित झाले. या स्थलांतरामुळे जनगणना आवश्यक बनली. या जनगणनेसाठी प्रोग्रामिंग सिस्टिम तयार झाली. या प्रोग्रामिंग सिस्टिममुळे दुसर्‍या महायुद्धात हिटलरचे संदेश डीकोड करण्याची विशिष्ट पद्धत, त्यातून क्रिप्टोलॉजी निर्माण झाली. या क्रिप्टोलॉजी व प्रोग्रामिंगमुळे जगातला पहिला संगणक तयार झाला आणि या जगामध्ये या प्रोग्राममुळे आयबीएम तयार झाली. या आयबीएममुळेच हा लेख दिव्य मराठीतून तद्वत तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे.

थोडक्यात, इंग्लंडमध्ये तयार झालेल्या 11व्या शतकातील त्या वजनदार नांगरामुळे मी आणि तुम्ही एकमेकांशी संवाद साधतो आहोत. टाइमलाइनच्या भाषेत ही अल्टर्नेटिव्ह टाइमलाइन आहे ती चुकीची आहे, हे सिद्ध करणे अत्यंत अवघड आहे. मराठी संस्कृतीत अशा अल्टर्नेटिव्ह व नॅरेटिव्ह टाइमलाइन्स जितक्या वाढत जातील, तितके आपले संस्कृतीचे आकलन वाढत जाईल आणि म्हणूनच टायमालॉजीचे महत्त्व मराठी संस्कृतीत अनिवार्य ठरणार आहे.
(shridhar.tilve1@gmail.com)