आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘धूळमाती’ यासह माध्य. शिक्षकांवर लवकरच कादंबरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


साहित्यिक कृष्णात खोत यांची मुलाखत

ग्रामीण जीवन हा ज्यांच्या कादंब-याचा मुख्य विषय असतो असे कृष्णात खोत हे मराठी साहित्यातील एक आश्वासक नाव. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील निकमवाडीचे खोत हे सध्या कळे ता. पन्हाळा येथील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापन करतात. गावठाण या पहिल्याच कादंबरीने प्रकाशात आलेले खोत यांच्या कादंब-याचे विषयही थोडे हटके असतात. त्यामुळेच त्यांच्या आगामी कादंबरीची वाचकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
ग्रामीण जीवन जगत असणा-या खोत यांची 2001 मध्ये गावठाण कादंबरी आली आणि ती चर्चेतही राहिली. अनेक पुरस्कारांचा मान या कादंबरीला मिळाला. सोलापूर, मुंबई आणि उत्तर महाराष्‍ट्र जळगाव या विद्यापीठांतही ही कादंबरी अभ्यासक्रमासाठी लावण्यात आली आहे. यानंतर 7 वर्षांनी खोत यांची कादंबरी आली ती रौंदाळ. ग्रामीण जीवन आणि राजकारण याचा तर घनिष्ठ संबंध. या सगळ्याचं चित्रण खोत यांनी आपल्या या कादंबरीत केलं. आपल्या आजूबाजूला असणा-या वातावरणाचं यथार्थ चित्रण वाचकांनाही भावलं आणि त्यांची रौंदाळ ही कादंबरीही लोकप्रिय ठरली. पाऊस म्हणजे जीवन असे म्हणत असताना हाच पाऊस काही वेळा अक्राळविक्राळ रूप कसं धारण करतो आणि शेतक-चं आयुष्य उद्ध्वस्त करतो असा वेगळा विषय घेऊन 2012 मध्ये खोत यांची झडझिंबाड ही कादंबरी आली. पावसाचं दुसरं रूप ज्या पद्धतीने खोतांनी चितारलं त्याला अनेक मान्यवरांनी दाद दिली. आता कोरडवाहू शेतक-याची व्यथा मांडणारी धूळमाती ही खोत यांची कादंबरी लवकरच प्रकाशित होणार आहे. तसेच नांगरल्याविन भुई हा आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या व्यक्तिचित्रांचा संग्रहही मौजतर्फे लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.

अशातच आता ते काम करत आहेत ते एका वेगळ्या विषयावर. विनाअनुदानित माध्यमिक शाळा आणि तेथील शिक्षक यांची दूरवस्था हा या कादंबरीचा विषय आहे. दहा दहा वर्षे एकही पैसा न घेता काम करणारा शिक्षक, उद्या पगार सुरू होईल या आशेवर लग्न ठरवणारा शिक्षक, नोकरीची गरज म्हणून शिक्षण संस्थेच्या चेअरमनच्या शेतात राबणारा शिपाई आणि त्याच्याच मुलीच्या लग्नात मांडव घालण्यापासून ते पत्रावळी उचलण्यापर्यंत कामे करणारा शिक्षक अशी या शिक्षक शिक्षिकांची अवस्था खोत यांच्या आगामी कादंबरीत मांडण्यात येणार आहे. ज्याला शिक्षणातलं फारसं काही कळत नाही अशा दूध संस्था आणि सेवा सोसायट्या चालवणा-च्या हातात शिक्षण संस्था असल्याने काय परिस्थिती उद्भवते हे या कादंबरीतून मांडण्यात येणार आहे. सध्या खोत या विषयावर काम करत आहेत. राज्यभर हजारोंच्या संख्येने असणा-या अशा शिक्षकांच्या वेदना सध्या ते समजून घेत आहेत.
महाराष्‍ट्र शासनाचा राज्य वाङ्मय पुरस्कार, दमाणी पुरस्कार, वि. स. खांडेकर पुरस्कार, राजर्षी शाहू पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी खोत यांना आधीच गौरवण्यात आलं आहे. त्यांची विनाअनुदानित माध्यमिक शाळेतील शिक्षकांविषयीची आगामी कादंबरी निश्चितच वाचकप्रिय होईल यात शंका नाही.