आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्गभेदाची विषवल्ली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई शहर हे त्याच्या जन्मापासून बहुरंगी, बहुढंगी म्हणूनच ओळखले जाते. काही जण तिला ‘मिनी भारत’ म्हणतात. तिचं बहुभाषिकत्व (त्यामुळे पर्यायाने येणारे प्रांत, जात, धर्म) हे देशातले एकमेवाद्वितीय उदाहरण आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईच्या लावणीतून मुंबईचा उभा-आडवा छेद घेतलाय, तर पुलंच्या बटाट्याच्या चाळीतून मध्यमवर्गीय पापभीरू वर्गाचे रंजनवादी आणि कारुण्याची झालर लावलेले चित्रण येते. याशिवाय अधोविश्वाची वेदना मांडणारे नामदेव ढसाळ ‘मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे’ असा वेगळाच एक्स-रे दाखवतात.
मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा यशवंतरावांनी हे राज्य ‘मराठ्यांचे’ नाही तर ‘मराठी भाषकांचे, लोकांचे असेल’ अशी ग्वाही दिली, तरी 1966 मध्ये बाळ केशव ठाकरे या व्यंगचित्रकाराला मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी ‘शिवसेना’ नामक संघटना स्थापन करावी लागली, ज्याचा आज एक प्रमुख विरोधी पक्ष झालाय. नव्वदच्या दशकात ‘मराठी सरसेनापती’ देशातील नवे वातावरण पाहता ‘हिंदुहृदयसम्राट’ झाले आणि मराठीचा मुद्दा पातळ झाला. लोकांच्या या नाराजीचा फायदा उठवत, स्वत:च्या नाराजीला ‘मराठी अस्मितेची’ जोड देत बाळासाहेबांचेच पुतणे राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करून मराठीचा मुद्दा उजागर करत, महाराष्ट्राच्या राजकारणात वाजतगाजत दखलपात्र प्रवेश केला.


ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता, गेली जवळपास पंचवीस वर्षे मुंबई पालिकेची सत्ता शिवसेना या पक्षाकडे भाजपच्या युतीसह आहे. सत्तेचे हे सातत्य शिवसेनेची स्व-कमाई आहे की काँग्रेस-सेना फिक्सिंगचे गणित आहे, हे सामान्य जनतेच्या आकलनापलीकडचे आहे.


सेना-भाजपची सत्ता पालिकेत आल्यापासून प्रथम मराठी अस्मिता, नंतर हिंदू अस्मिता ही राजकीय अजेंडा म्हणून पृष्ठभागी राहिली असली तरी मूलत: ‘सत्तेची’ फळं कायम चाखत राहण्यासाठी एक सर्वपक्षीय टेंडर अस्मिता हा कारभाराचा मुख्य भाग असतो. या टेंडर, कंत्राटदाराच्या वर्चस्वामुळे स्थानिक नगरसेवक हा मोठ्या साखळीचा एक भाग बनतो आणि ‘अजस्र प्रशासन’ हे मुख्य कार्यकारी म्हणून काम करतं. आपापले हितसंबंध (मुख्यत: आर्थिक) सांभाळले गेले की प्रशासन काय गोंधळ घालतेय यावर लोकसेवक, लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक, प्रभाग प्रमुख, समिती सदस्य, अध्यक्ष ते अगदी महापौर यांचा कसलाही अंकुश नसतो.


याचं एक ढळढळीत उदाहरण म्हणजे मुंबईच्या खार भागात घडलेली घटना. इथे एक अमन नावाची जुनी इमारत आहे, ज्यात गेली अनेक वर्षे विविध जाती/धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदताहेत. अगदी वर्गवारी करून सांगायची तर मुस्लिम मालक असलेल्या या इमारतीत मुस्लिम, ख्रिश्चन आणि एक जैन कुटुंबही राहतेय.
मुंबईत नव्या-जुन्या इमारतीत ‘पाणी’ ही समस्या असतेच. अमनमध्येही ती होती. त्यासाठीचे टाकी, पंप हे सोपस्कारही पार पाडले गेले. अलीकडेच इमारतीच्या मालकांना वेगळ्या पाइपलाइनचा शोध लागला, जी इमारतीच्या तळमजल्यावर राहणा-या जैन कुटुंबाने आपल्या घराला जोडली होती. प्राथमिक तपासात त्यांनी पाण्याचा दाब वगैरे कारणं दिली. त्यानंतर मालकांनी पालिकेकडून माहिती अधिकारात या स्वतंत्र पाइपलाइनची गरज, मागणी आणि मंजुरी याबाबत माहिती मागवली असता त्यांना जबर सांस्कृतिक धक्का बसला.


याचे कारण संबंधित पालिका अधिकारी/अभियंता यांनी जैन कुटुंबाला दिलेली स्वतंत्र जोडणी ही ‘धार्मिक’ कारणावरून दिली आहे, असे मंजुरी पत्रात नमूद केलेय!भारतीय लोकशाही आणि घटनात्मक तत्त्वांनाच हरताळ फासणारी ही कृती मुंबई महापालिकेकडून घडते आणि प्रमुख इंग्रजी वर्तमानपत्रात (मुंबई मिरर-13 जून 2013) याची बातमी येऊनही त्यावर कसलीही प्रतिक्रिया उमटत नाही, हे आमच्या राजकीय पक्षांचे अपयश तर आहेच; पण सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि चोवीस तास कार्यरत वृत्तवाहिन्या ‘सनसनाटी’साठीही तिकडे वळल्या नाहीत, याचे आश्चर्य वाटते.


जैन कुटुंबप्रमुखाने केलेल्या खुलाशात ‘आपण फक्त योग्य दाबाने पाणी मिळण्यासाठी अर्ज केला होता,
पालिकेने तो का धार्मिक कारणावर मंजूर केला माहीत नाही!’ असे सांगितले.
यातली आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे, एखादा भाडेकरू नागरी सोयीसुविधांसाठी थेट पालिकेत अर्ज करतो आणि पालिका इमारतीच्या मालकाला (कारण ही खासगी प्रॉपर्टी आहे) न विचारता- सांगता, थेट नळ जोडणी पालिकेच्या मुख्य पाइपलाइनमधून देऊन टाकते, तेही धार्मिक कारण देऊन! इतके ‘गतिमान’ प्रशासन मुंबईकरांनी प्रथमच अनुभवले असणार!
या घटनेच्या निमित्ताने, स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतरही आमचे जातीय/धार्मिक पीळ कसे अजून तसेच आहेत, हे दिसून येते. हुंड्याला जशी भेटवस्तूची संज्ञा देऊन ती प्रथा बिनबोभाट चालू ठेवलीय, तशीच ‘व्यक्तिस्वातंत्र्याच्या’ नावाखाली, कधी सोसायटी ठरावाचे कारण देऊन ‘कॉस्मो’ मुंबईत जाती/धर्माची बेटे तयार केली जाताहेत. आज असंख्य तरुण/तरुणी महाराष्ट्राच्या उर्वरित भागातून तसेच संपूर्ण देशातून शिक्षण, रोजगारानिमित्त मुंबईत येतात. पण आजही मुस्लिम तरुण/तरुणींना जागा भाड्याने घेताना अडचण येते त्यांच्या धर्माची! आणि नाइलाजाने त्यांना मुस्लिमबहुल भागात राहावे लागते. ‘धंदा’ करणा-या इस्टेट एजंटनाही ‘मुस्लिम’ ग्राहकाला घर विकत अथवा भाड्याने मिळवून देणे जिकिरीचे होते.
‘पैसा असेल तर मुंबईत घर मिळेल’, या वाक्याला कंसात ‘तुम्ही अमुक तमुक नसाल तर...’ अशी जोड असते.
अनेक गुजराती, जैनबहुल भागात, इमारतीत मांसाहारी लोकांना विविध कारणे पुढे करून जागा नाकारली जाते. एकट्या राहणा-या स्त्री/मुलीकडे तर संशयानेच पाहिले जाते.
थोडक्यात, या कॉस्मोपॉलिटिन मेट्रोत आजही जाती/धर्माचे गंड तसेच आहेत, प्रसंगी पैशाच्या आणि एकगठ्ठा मतांच्या किंवा विशिष्ट पक्षाच्या विचारसरणीचे म्हणून त्यांना आता आक्रमक सांस्कृतिक दहशतवादाचे स्वरूप आलेय.
एरवी भरपूर मद्यपान व मांसाहार करणा-या हिंदू आणि जैन धर्मातील अनेकांना ठरावीक दिवशी धार्मिक अस्मितेसाठी ‘कत्तलखाने’ बंद ठेवावेसे वाटतात, यापेक्षा दुसरा दांभिकपणा कोणता? येता जाता हिरवे, पाकडे म्हणून हिणवल्या जाणा-या मुसलमानांना टार्गेट करणे सोपे असते; यूपी, बिहारी कष्टक-यांना चोप देणे मर्दुमकीचे ठरते; पण रस्ते अडवून कंठाळी गरबे, लोकलचे पत्रे बडवत म्हटली जाणारी भजने अथवा पत्त्यांचे डाव यातली गुजराती- जैनांची दादागिरी मात्र नजरेआड केली जाते!
या गुजराती/जैन समाजाने परस्पर अनेक गृहसंस्था शाकाहारी घोषित करून टाकल्यात. ही सरळसरळ घटनेच्या मूलभूत तत्त्वांची पायमल्ली आहे. काल-परवापर्यंत पुण्यातल्या वर्तमानपत्रात ‘ब्राह्मण कुटुंबास जागा भाड्याने देणे आहे’ अशा जाहिराती बिनदिक्कत येत! साहित्य किंवा नाटक ‘दलित’ असते का, अशी अनुनासिक विचारणा करणा-या लोकांना राहती जागा, भिंती या ‘ब्राह्मण’ असतात का, असे विचारावेसे वाटत नाही!
विवाह मंडळांच्या जाहिराती तर उघडउघड जात प्रचार व प्रसार करणा-या असतात. आणि आश्चर्य म्हणजे, या जातीविरोधात बंड करून धर्मांतर केलेल्या बौद्धांचीही आता स्वतंत्र विवाह मंडळे आहेत!
हा पंक्तिप्रपंच पाहून फुले-शाहू आंबेडकर रडत असतील का हसत असतील?
सामाजिक अभिसरणासाठी या थोर मंडळींनी हयात घालवली, लढे उभारले, कायदे केले, सर्व ‘धर्म’ बाजूला सारून एकच ‘घटना’ दिली, सार्वभौम संसद दिली, मताधिकार दिले, आदर्श लोकशाहीची चौकट दिली आणि आम्ही जागतिकीकरणाच्या पर्वात नवी वर्णाश्रम व्यवस्था जन्माला घालतोय? तीही याच लोकशाहीच्या चौकटीचा गैरवापर करून?
एका बाजूला अण्णा हजारेंसारखे स्वयंघोषित गांधी घटनेलाच आव्हान देतायत. त्यांच्यामागे राहून पुनरुज्जीवनवादी धर्मांधांना विकासपुरुषाचा मुखवटा लावून नवी आक्रमकता रुजवतायत.
अशा वेळी मुंबई महापालिकेने धार्मिक कारणास्तव वेगळी ‘पाण्याची’ लाइन देऊन, या देशातील अस्पृश्यताविरोधी लढा आणि कायदा यांचाच अपमान केलाय.
मूठभरांची धार्मिक अस्मिता जपण्यासाठी घटनेच्या मूलतत्त्वांना दिगंबर पंथात बसवण्याचा निलाजरेपणा करणारी मुंबई महापालिका आता यानंतर खुलाशांची रंगसफेदी करताना श्वेतांबर अवतार धारण करून आपली गेलेली अब्रू झाकायचा प्रयत्न करेल.
पण जो बूंद से गयी वो हौद से वापस आएगी?


writingwala@gmail.com