आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मुंबई ना दिल्ली वालों की, पिंकी है पैसे वालो की...’ मीही असल्या गाण्यांवर कधी न कधी नाचले आहे, हे मी मान्य करते; पण म्हणून मला ही किंवा असली गाणी मनापासून आवडतात हे खरं नाही.
मुळातच संगीत आणि विशेषकरून हिंदी चित्रपटांमधली गाणी खूप प्रभावी असतात. लहान मुलांना गाणी कविता किंवा पाढ्यांपेक्षा लवकर पाठ होतात. मोबाइल फोन्समुळे आता कुठलीही गाणी कधीही ऐकताही येतात. हे सगळं आपल्याला माहीत असूनही आपण अशी काळजी का नाही घेत की, मुलांच्या कानावर चांगल्या दर्जाचीच गाणी पडली पाहिजेत? 10 वर्षांचा माझा भाऊ आणि त्याचे मित्र, हनी सिंगचीच गाणी का गातात?
मला ‘संगीत’ फारसं कळत नाही. मी लिहिते. त्यामुळे माझ्यासाठी ‘चांगलं’ गाणं म्हणजे चांगले शब्द, काव्य, गीत. ‘आयटम साँग’ लागलं की माझं डोकं फिरतं. या गाण्यांमध्ये स्त्रीला इतकं वाईट प्रकारे चित्रित केलेलं असतं. चिकनी चमेली पावशेर मारायला जाते, मुन्नी दुस-यासाठी बदनाम होते, अनारकली तिच्या सलीमला सोडून ‘डिस्को’ला जाते... आम्ही काय फक्त हेच करतो?
ही फक्त गाणी आहेत, याबद्दल इतकं गंभीर होण्याचं काहीच कारण नाही, असं वाटतंय तुम्हाला? नाही. जर प्राथमिक शाळेत शिकणारी मुलं हीच गाणी गाणार असतील, हनी सिंगला दाद देणार असतील, तर हा विषय फार गंभीर आहे.
याहूनही जास्त मला या गोष्टीचं वाईट वाटतं की ती मुन्नी काय किंवा चमेली काय, सगळं स्वत:च्या इच्छेने करताहेत. यामुळे पुरुषांना असं वाटू लागलं की ते काहीही बोलू, करू शकतात. प्रत्येक गाण्यामागे ब-याच लोकांचा हात असतो ना. सुशिक्षित, यशस्वी गायक, ज्यांनी अशी गाणी गायला सरळ नाही म्हटलं पाहिजे. तितक्याच शिकलेल्या अभिनेत्री, ज्या याच गाण्यांवर नाचतात. लहान मुलींना ज्यांसारखं व्हायचं असतं, त्यांनीच जर मोठ्या पडद्यावर छोटे कपडे घालून नाच केला तर कसं चालेल? हे सगळं या लोकांना माहीत असून ‘आयटम साँग’ बनतातच कशी? पैसे मिळतात म्हणून? मला काही त्यांच्या पगाराबाबत डिटेल्स माहीत नाहीत; पण जर त्या सब्यसाचीच्या साड्या नेसू शकतात तर एका गाण्यावर कमी नाचून फारसं नुकसान नाही होणार, असं मला तरी वाटतं.
असल्या गाण्यांवर बंदी आणणं शक्य नाही, कारण ‘पब्लिक डिमांड’ फार आहे. पण चित्रपटामध्ये ही गाणी असलीच पाहिजेत का? ‘छोटी ड्रेस में बाँब लगती मैनु’, हे हनी सिंगच्या नवीन गाण्यातले शब्द. साडी नेसलेली बाई हीसुद्धा सुंदर दिसते की नाही? ‘घागरा’ घालून माधुरी दीक्षित दिसते ना, की नाही? मग तरीही हनी सिंग का? देव त्या सगळ्यांना सुबुद्धी देवो ज्यांना ‘असली गाणी’ म्हणजे ‘संगीत’ वाटतं.
पण एक आहे, लोकप्रिय गाणी म्हणजे स्त्रीला कमी लेखणारीच आहेत, असं नाही. ‘मुझे क्या बेचेगा रुपैया’ हे स्वानंद किरकिरेने लिहिलेलं नि सोना मोहापात्राने गायलेलं सत्यमेव जयते मालिकेत वापरलेलं गाणं घ्या. बाईची किंमत रुपयांमध्ये नाही होऊ शकत, हुंड्याला नकार देण्यासाठी मुहूर्त शोधण्याची गरज नसते, वगैरे या गाण्यातनं किती प्रभावीरीत्या सांगितलंय. कौसर मुनीर यांनी लिहिलेलं, अमित त्रिवेदीने लयबद्ध केलेलं आणि शाल्मलीने गायलेलं नारीयाँ गाणंही असंच. जो हँस दू जरा मैं, मुझे समझ न इझी, न मैं तेरी आयटेम न मैं तेरी बीवी...
नुकत्याच रिलीज झालेल्या ‘हायवे’मधलं ‘पटाखा गुड्डी’ कसलं भारी आहे. ‘मौला तेरा माली, ओ हरियाली जंगलवाली, तू दे हर गाली पे ताली, उसकी कदम कदम रखवाली’ किंवा ‘तू तो पाक रब दा बाँका बच्चा, राजदुलारा तूही...’ नूराँ भगिनींनी गायलेले इर्शाद कमील यांनी लिहिलेले हे शब्द किती सोप्या भाषेत सांगतात नायिकेला की तू देवाची लाडकी आहेस. आम्हाला आमच्याबद्दल सकारात्मक वाटेल, गोंधळात टाकणा-या वास्तवातून बाहेर पडायला मार्ग मिळेल, अशी गाणी (अशा कविता खूप असतील, आहेत; पण गाणी, जी सतत ऐकली जातील) आम्हाला हवी आहेत. चिकनी, मुन्नी, हनी, अनारकली नकोत आता...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.