आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक सुरक्षितता हवीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तात्पर्य हे की, पैशाच्या गुंतवणुकीबाबत ज्येष्ठ नागरिकांनी सावध असायला हवं. इतकेच नव्हे, तर कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक गुंतवणुकीचा व्यवहार करू नये. याचा अर्थ असा नव्हे की, कुणा नातेवाइकाशी व्यवहार करू नये वा कुणा नातेवाइकाला अडचणीच्या वेळी मदत करू नये. शेवटी पैसा हा योग्य वापरासाठीच आहे. एखाद्या जवळच्या नातेवाइकावर गरजेच्या वेळी हात पसरण्याची वेळ येऊ शकते. अशा वेळी त्याच्या नजरेला नजरसुद्धा न भिडवता त्याला काही रक्कम देऊन विषय संपवावा. यात स्वत:चं समाधान आहे, प्रतिष्ठाही आहे, दिलेले पैसे कधी काळी परत मिळाले तर आनंदच; पण जर त्याला परत करता आले नाहीत तर मरेपर्यंत ते लक्षात ठेवून कष्टी होऊ नये.
कोणतीही वृद्ध व्यक्ती किती काळ जगणार आहे याची कुणालाच कल्पना नसते. उतारवयात माणूस दुर्दैवाच्या भयाने पछाडलेला असतो. पैशाच्या अभावामुळे वाईट अवस्थेत काळ कंठणा-या काही समवयस्कांची उदाहरणं डोळ्यासमोर आली की त्यांची स्वत:बद्दलची काळजी वाढते. या वयात एक तर निश्चयाचं बळ कमी झालेलं असतं आणि मनाचा दुबळेपणा वाढलेला असतो. याला अपवाद असतील; पण सामान्यत: वृद्धांची परिस्थिती अशीच असते. महागाई वाढतेय, व्याजदर घटताहेत आणि आपल्यापाशी मिळकतीचं दुसरं साधन नाही; अशा वेळी दुर्दैवानं आजारीपण, अपघात, असं काही झालं तर या विचारानं ही वृद्ध माणसं त्यांना अकारण वाटणारा खर्च करायला तयार नसतील तर त्यांना कंजूष म्हणता येणार नाही; ते त्यांचं व्यक्तिगत धोरण आणि निश्चित अशी योजना आहे.
वृद्धांची ही मानसिकता पुढच्या पिढीला कळत नाही. याला असलेला एक सुखद अपवाद माझ्या पाहण्यात आहे. पंचाहत्तरीच्या एका जोडप्याचे दोन्ही मुलगे आपापल्या व्यवसायात चांगला पैसा मिळवतात. वडिलांची बचत आणि पेन्शन ठरावीक असणार हे त्यांना कळत होतं. आईवडील स्वत:चे खर्च पेन्शनमधून करत असत; पण आपली बचत कमी होऊ नये याबद्दलची दक्षता बाळगत. मुलांच्या लक्षात आलं की आपण जितक्या मोकळेपणाने पैसा खर्च करतो तसा आईवडील करत नाहीत. आपला पैसा कमी होण्याच्या काळजीबरोबरच भविष्याबद्दलही ते काहीसे साशंक असतात. आपल्या स्वाभिमानी स्वभावामुळे वडील मुलांकडे काही मागण्याची शक्यताच नव्हती. यावर दोन्ही मुलांनी मिळून तोडगा काढला. दर पाच-सहा महिन्यांनी दोघांपैकी एक मुलगा फिक्स्ड डिपॉझिट किंवा अशाच प्रकारची गुंतवणूक आईवडिलांच्या नावाने करून त्याची रिसीट त्यांना आणून देत असे. दोघेही प्रत्येक वेळी एकच कारण पुढे करायचे. तुमचं नाव धंद्यात भागीदार म्हणून घातलं आहे. हा तुमच्या वाट्याचा नफा आहे. असं केलं नाही तर आमचा नफा जास्त होऊन अकारण जास्त इन्कम टॅक्स भरावा लागेल. आम्ही तुम्हाला वेगळं काही देत नाही, ही फक्त टॅक्स वाचवण्याची एक क्लृप्ती आहे. याचा परिणाम असा झाला की, आईवडिलांपाशी स्वत:ची म्हणता येईल अशी ब-यापैकी रक्कम आली. हा पैसा वापरायची त्यांना मुळीच गरज नव्हती; पण आता आपल्यापाशी पुरेसा पैसा आहे, असं समाधान त्यांना प्राप्त झालं आणि आता ते स्वत:चा पैसा जरा मोकळ्या हाताने खर्च करायला लागले.
अनुवाद-प्रतिभा काटीकर, सोलापूर