आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारीपण छुपे वरदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुपारच्या जेवणानंतरची वामकुक्षी ही निदान ज्येष्ठांच्या बाबतीत अगदी नैसर्गिक गोष्ट असते. तेव्हा विचारपूस करायला जाणा-यांनी ही वेळ टाळावी. एका नातेवाइकांचा हा अनुभव. हे गृहस्थ जवळजवळ महिनाभर आजारी होते. दुसरे एक गृहस्थ या आजारी गृहस्थांच्या घराजवळ काही कामासाठी आले होते. त्यांना ही बातमी नुकतीच कळली होती. इथवर आलोच आहे तर यांनाही भेटून जावं अशा विचारानं ते त्यांच्याकडे पोहोचले. आजारी गृहस्थ झोपले नव्हते. या गृहस्थांच्या अनपेक्षित आगमनामुळे सगळेच उठून उभे राहिले. आलेल्या गृहस्थांनी तक्रारीच्या सुरात आजा-यांशीच बोलायला सुरुवात केली. ‘महिनाभर अंथरुणावर पडून आहात आणि आम्हाला साधं कळवलंसुद्धा नाही? आधी कळलं असतं तर मी केव्हाच येऊन गेलो असतो.’
हे सांगितल्यानंतर या नातेवाइकांनी आपलं मन माझ्यासमोर उघड करत म्हटलं होतं, ‘आपण होऊन आजारीपणाबद्दल कळवलं तर रोज कुणी ना कुणीतरी येऊन दुपारच्या झोपेचं खोबरं करून टाकतं. शिवाय दिवसभर केवळ व्यवहार म्हणून येणा-या अशा मंडळींचं आतिथ्य करण्यात घरातलं एक माणूस गुंतून पडतं.’
दुसरी गोष्ट म्हणजे एका व्यक्तीला जे लागू पडतं ते दुस-या व्यक्तीलाही तसंच आणि तितकंच लागू पडेल असं मानणं चुकीचं ठरेल. माझे एक ज्येष्ठ मित्र या वयातही रोज पंधरा ते वीस किलोमीटर चालतात. या नियमित चालण्यानेच त्यांचे आरोग्य चांगले राहते, असे ते मानतात. त्यामुळे आपल्या समवयस्कांना ते रोज किमान तीन-चार तास चालण्याचा सल्ला देतात. वास्तविक रोज पंधरा-वीस किमी चालणे हा अपवाद आहे. दमा किंवा हृद्रोगाचा त्रास असणा-या एखाद्या व्यक्तीनं हा सल्ला मानला तर त्याचा दुष्परिणामच होईल. एखादा नव्वदी ओलांडलेला माणूस शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर सक्षम असतो. अशी उदाहरणं क्वचित दिसतात. त्यामुळे अशा व्यक्तींना एक प्रश्न वारंवार विचारला जातो, तुमच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय? उत्तरादाखल ही माणसं वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. त्र्याण्णव वर्षांचे एक डॉक्टर सांगत असत की, पस्तीस वर्षांपासून ते दोन्ही वेळा बाजरीची भाकरीच खातात. त्यामुळेच या वयातही त्यांचं मन आणि शरीर दोन्ही स्वास्थ्यपूर्ण आहेत. बाजरीची भाकरी हे स्वाथ्याचं एकमेव कारण असेल तर ज्यांचा रोजचा आहार बाजरी हाच असतो, अशा खेड्यातील कुटुंबांतील काही तरुण मंडळींचं अकाली निधन का झालं असावं? बाजरी स्वास्थ्यवर्धक असेल, पण म्हणून बाजरीची भाकरी खाणं हे आरोग्याचं एकमेव कारण असू शकत नाही. काही वृद्ध मंडळी पाणी पिण्याला अतिशय महत्त्व देतात. रोज चार ते पाच लिटर पाणी प्यायल्यामुळेच आरोग्य चांगलं राहतं, असं त्यांचं प्रामाणिक मत असतं. हे मतही बाजरीच्या भाकरीप्रमाणे मर्यादित स्वरूपातच स्वीकारायला हवं.
माझ्या तरुणपणीची एक घटना आठवते. माझ्या वडिलांचं साधंसंच ऑपरेशन होतं. ते पार पडल्यावर काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. तिथे माझे एक लांबचे काका त्यांना भेटायला आले. वडील आणि काका या दोघांत आधी एक-दोन वेळा काही कारणानं वादावादी झाली होती. त्यानंतर कुठेही एखाद्या कार्यात किंवा कार्यक्रमात भेट झाली तरी जुजबी बोलण्यापलीकडे दोघांचे संबंध नव्हते. त्या दिवशी आमच्या खोलीत येऊन त्यांनी वडिलांची विचारपूस केली, त्यांनीही योग्य ती उत्तरं दिली. नंतर कशी कुणास ठाऊक, बोलण्याची गाडी जुन्या प्रसंगाकडे वळली आणि दोघांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. मुळात काकांचा आवाज मोठा होता तो आणखीच वाढला. त्याचा परिणाम म्हणून वडिलांचा रागाचा पारा चढला. इतका की हॉस्पिटलच्या नर्सला खोलीत येऊन पेशंटला शांत करावं लागलं आणि त्या काकांना बाहेर काढावं लागलं. नंतरचा संपूर्ण दिवस वडील क्षुब्ध अशा अवस्थेत होते. त्यांच्या प्रकृतीतला सकारात्मक प्रतिसाद दुस-या दिवशी कमी झाला होता.
असं चुकूनसुद्धा घडू नये याची काळजी घ्यायला हवी. भेटायला येणा-यांनी फारशी जवळीक नसेल,
केवळ औपचारिकता असेल तर मोजकेच क्षण थांबून थोडंच बोलावं.
काही ज्येष्ठ नागरिकांना आपल्या दुखण्याबद्दलची प्रत्येक गोष्ट भेटायला येणा-या प्रत्येकाला पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते. एखाद्या रोगावरचे तज्ज्ञ डॉक्टर कोण कोण आहेत, त्यातले सर्वात सुप्रसिद्ध कोण, त्यांची अपॉइंटमेंट मिळायलाच किती वेळ लागतो हे सांगण्यात त्यांना विशेष समाधान वाटतं. या डॉक्टरांची फी किती जबर आहे, त्यांनी सांगितलेल्या चाचण्या, त्याचे रिपोटर््स हे सगळं किती खर्चिक आहे हे सांगायचीही त्यांना हौस असते. ऐकणा-याला त्यात फारसा रस नसतो. त्यामुळे हे सगळं ब-याच अंशी अकारण ठरतं.
कधी कधी आजारीपण blessing in disguise असू शकतं. पडून राहण्याचा हा काळ वाचन आणि विचार करण्याची क्षमता असेल तर उत्तम प्रकारे कारणी लावता येतो. एखादी कॅसेट, सीडी किंवा तत्सम काही शांतपणे ऐकण्याची ही संधी आहे. आप्तजन आणि स्नेही यांच्या वर्तनाचं, आपल्या त्यांच्याबद्दल कल्पनांचं अवलोकन करण्याचे हे क्षण आहेत. कुणी सांगावं, आपल्या काही धारणा त्यानंतर बदलून जातील.
पेशंटला भेटायला जाताना त्याच्या आवडीचं एखादं फूल किंवा लहानसं पुस्तक नेणं अतिशय प्रतीकात्मक आहे. काही वेळा आपण शहाळं, मोसंबी किंवा अशा प्रकारची इतर फळं घेऊन जातो. यातून आजा-याला दिलासा मिळतो. सद््भावनांच्या अशा प्रतीकांनी रुग्णाच्या चेह-यावर प्रसन्नता येते. काही वेळा अशा लहानशा कृतीतून मोठा परिणाम साधला जातो.
अनुवाद - प्रतिभा काटीकर, सोलापूर