आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हास्य मावळू देऊ नका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारसी धर्माचे संस्थापक अषो झरत्रुष्ट नवजात शिशू म्हणून जन्माला आले नाहीत. पारसी धर्मग्रंथाप्रमाणे ते जन्मले, तेव्हा त्यांचं वय ऐंशी वर्षांचं होतं. म्हणजेच ते वृद्धावस्थेत होते. अषो जन्मले तेच ऐंशी वर्षांचे, एवढंच नव्हे तर जन्मल्यावर प्रत्येक मूल रडतं त्याऐवजी अषो खळखळून हसले होते असा उल्लेख आहे. ऐंशीव्या वर्षी असं खळखळून हसणं हे फार सूचक आहे. खळखळून हसण्यासाठी जे मुक्त वातावरण हवं, मनाची जी ताणरहित, सहज अवस्था हवी त्याचं हे निर्देशक आहे. ऐंशीचं वय ही मृत्यूच्या सन्मुख असण्याची अवस्था मानली जाते. आठ दशकांच्या अनुभवांच्या ओझ्याखाली माणूस दबलेला असतो. इतकंच नव्हे तर आपण सगळे आयुष्यभर बहुतेक वेळा कृत्रिमपणेच हसत असतो. मुक्त हास्याचे क्षण आले तरी ते मोजके आणि अल्पजीवी असतात, याचंही भान या वेळपर्यंत आलेलं असतं. पण अषो जन्मल्याबरोबर असा संदेश देतात, विशेषत: आयुष्याच्या पैलतीराकडे डोळे लावून बसलेल्या वृद्धांना, की तुमचं हास्य मावळू देऊ नका.
हे हास्य म्हणजे केवळ ओठाच्या स्नायूंचा व्यायाम नव्हे तर चित्ताची प्रसन्नता. मन दडपणाखाली नसावं, मोकळं असावं, शिवाय तिथे प्रसन्न अशी शांती वास करत असावी ही आवश्यक आणि आदर्श अवस्था आहे, मात्र ती आपोआप अस्तित्वात येत नाही. त्यासाठी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने स्वत:ला तयार करायला लागतं.
आवडो वा न आवडो, आपल्याला हे मान्य करायला हवं की या भन्नाट वेगानं निघालेल्या आपणा सगळ्यांचं गंतव्यस्थान कोणतं आहे हे कदाचित आपल्यापैकी कुणालाच ठाऊक नाही. नवीन पिढी या शर्यतीत पहिला नंबर मिळवण्याच्या ईर्ष्येने वेड्यासारखी धावते आहे. जुनी पिढी धावत नसून त्यांना फरफटावं लागत आहे. काही वृद्ध याला अपवाद असतील, स्वत:च्या ध्येयाकडे निश्चित अशा दिशेने आणि स्वेच्छेने धावत असतील. पण हा नियम नसून अपवाद आहे. बहुतेक वृद्धांच्या नशिबी फरफटणंच असतं.
‘फरफटणे’ या शब्दातच अनिच्छा-इच्छेचा अभाव-अभिप्रेत आहे. जे काम अनिच्छेने म्हणजेच नाइलाजाने, विवशतेने, दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे केलं जातं ते करताना मन ताणरहित आणि प्रसन्न कसं असेल? हे एक अवघड कोडं आहे आणि कदाचित अषोचं ते हास्य आपल्याला हे कोडं उकलण्याचा मार्ग दाखवतं.
आध्यात्मिक क्षेत्रात ज्यांनी निश्चित अशी सिद्धी प्राप्त केली आहे, अशा एका संतांच्या भेटीचं सद््भाग्य काही वर्षांपूर्वी मला प्राप्त झालं. माझं नाव आणि माझ्या साहित्यातील योगदानाबद्दल माहीत असल्याचं त्यांनी सांगितलं. तेव्हा ती मला माझ्या भाग्याची परिसीमा वाटली. बोलण्याच्या ओघात काही मुद्दे निघाले तेव्हा पुढे बोलण्यापूर्वी त्यांनी मला एक अट घातली. इथून पुढे आपल्यात जे बोलणं होईल त्याबद्दल कुणालाही सांगायचं नाही किंवा त्याविषयी लिहायचंही नाही. अर्थातच मी ही अट स्वीकारली. त्यानंतर अर्धा तास अतिशय गहन पण तितक्याच रसप्रद विषयावर ते बोलले. त्या काळात त्यांची प्रकृती काहीशी नाजूक होती. निरोप घेताना मी आदराने नमस्कार केला तेव्हा त्यांनी हसून म्हटलं, ‘आणखी काही विचारायचं आहे?’ मी प्रसन्नपणे अगदी सहज म्हटलं, फक्त आशीर्वाद द्या.
उत्तरादाखल त्यांनी प्रतिप्रश्न केला. ‘माझ्यात आशीर्वाद देण्याची क्षमता आहे असं तुम्हाला खरंच वाटतं?’
मी म्हटलं, ‘हो, म्हणून तर मागतो आहे.’
म्हणाले, ‘बोला, काय आशीर्वाद हवा आहे?’
‘बस, एकच. मन सदैव प्रसन्न आणि शांत राहावं.’
‘अशी इच्छा आहे?’ त्यांनी विचारलं.
‘हो’, मी म्हटलं, ‘तशी इच्छा नक्कीच आहे.’
‘तर मग शांती आणि प्रसन्नता कशी मिळणार?’ अगदी बालसुलभ निरागसतेनं ते म्हणाले, ‘इच्छा संपल्याशिवाय चित्तात शांती आणि प्रसन्नता कशी वास करेल?’
जणू समस्त मानवजातीचं समग्र तत्त्वज्ञान त्या शेवटच्या वाक्यात सामावलं होतं! भगवान बुद्धांनी इच्छा संपवण्यासाठी अष्टांगमार्ग सांगितला होता. इथे आपल्याला या अष्टांगमार्गाची चर्चा करायची नाहीये. इतकंच सुचवायचं आहे की इच्छांचा अग्नी कमी केला नाही तर आता या वयात शांती आणि प्रसन्नता लाभणार नाही.
ओशो रजनीशांनी त्यांच्या व्याख्यानात एक सुरेख कथा सांगितली आहे. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात जे पोहू शकतात ते सहज समोरच्या काठावर पोहोचतात. पण ज्यांना पोहता येत नाही ते हातपाय हलवून प्रयत्न करतात. शेवटच्या श्वासापर्यंत डुबक्या घेतात आणि शेवटी बुडतात. एकदा बुडाले, हातपाय मारायचं थांबलं की लगेच त्यांचा देह पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगायला लागतो. जिवंत असताना त्याला पाण्यावर राहायचं होतं तेव्हा हातपाय मारूनही ते जमत नव्हतं. आता कोणत्याही प्रयत्नावाचून त्याचा देह पाण्यावर तरंगतो आणि शेवटी कुठेतरी काठाशीसुद्धा पोहोचतो.
यातला मुख्य मुद्दा प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करण्याचा आहे. ज्येष्ठ नागरिक वैचारिक प्रवाहाच्या ओघात, समाजजीवनाच्या परिवर्तनात, कौटुंबिक जीवनात अशा प्रत्येक क्षेत्रात प्रवाहाच्या विरुद्ध नव्हे तर ओघाबरोबर जात राहिले तर अषोंइतकी शांती आणि प्रसन्नता हाती लागली नाही तरी किमान बुडून जाण्याच्या भयापासून सुटका मिळवू शकतील.
परिवर्तनाचा झपाटा इतका अकल्प आहे की सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकाला त्याच्याशी जुळवून घेणं अवघड होत चाललं आहे. त्यामुळे अगदी नकळत त्याच्या मनात एक हताशा वाढत जाते आहे. एक पंचाहत्तरीचे गृहस्थ या परिवर्तनाच्या वेगाबद्दल बोलताना अगदी सुटकेच्या स्वरात म्हणाले होते, ‘आता मी आयुष्याच्या शेवटापायी आलो आहे हे मी माझं भाग्य समजतो. पंचाहत्तरऐवजी चाळीस -पंचेचाळीस वर्षांपूर्वी जन्मलो असतो म्हणजेच आता चाळिशीत असतो तर या वेगाशी जुळवून घेता आलं नसतं. शाळेतल्या अ‍ॅडमिशनपासून बँकेत खातं उघडण्यापर्यंत आमच्या वेळी सगळं इतकं सोपं होतं की आज यातही एकही गोष्ट मला जमणार नाही. सगळीकडे क्लिष्टता वाढली आहे, अविश्वास वाढला आहे, भौतिक गोष्टींचं महत्त्व वाढलं आहे. सुखसोयी नक्कीच वाढल्या आहेत. पण सगळ्यातला साधेपणा, सोपेपणा, नाहीसा झाला आहे.’
शांती आणि प्रसन्नतेसाठी एखादा रेडिमेड फॉर्म्युला बाजारात उपलब्ध नाही. स्वत:ला मानसिक चिकित्सक किंवा मनोवैज्ञानिक म्हणवणारे तज्ज्ञ जी सूत्रं आणि उपचार सांगतात ते केवळ बाह्योपचार आहेत. चेह-याला सुगंधित पावडर लावल्याने त्वचेचा मूळ रंग बदलत नाही. त्यासाठी माणसाला स्वत:चा आहार, विहार इ.पासून संपूर्ण जीवनशैलीत आमूलाग्र बदल करावा लागतो. ज्याप्रमाणे पक्वान्नाची गोडी दुस-याच्या जिभेनं चाखता येत नाही त्याप्रमाणे शांतीसाठी, प्रसन्नतेसाठी माणसानं स्वत:लाच बदलायला हवं.
अनुवाद-प्रतिभा काटीकर, सोलापूर