आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धी आणि भावनांचा संघर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुधापेक्षा साय जास्त प्रिय असते, असं ज्येष्ठ व्यक्तींच्या बाबतीत नेहमी म्हटलं जातं.
त्यामुळेच नातवंडांनी त्यांच्यासाठी केलेली छोटीशी कृतीदेखील ज्येष्ठांना अत्यानंद देऊन जाते.
माझे वडील त्यांच्या वृद्धावस्थेत अशा खूप गोष्टी सांगायचे. काही वेळा तर तीच तीच गोष्ट पुन:पुन्हा सांगायचे. त्यांचं उपदेशात्मक बोलणं, तेही पाल्हाळिक शैलीतलं-ऐकणार्‍याला कंटाळवाणं वाटायचं, एखाद्या वेळी कुणाचा असा कंटाळा प्रकट झाला तर नाराज होऊन म्हणायचे, काय सांगतो ते नीट समजून घ्या. असं ऐकण्याची संधी आता फार काळ मिळणार नाही. पुन्हा असं ऐकायला मिळणार नाही, तेव्हा कंटाळा आला तरी सहन करून ऐकून ठेवा. नाही तर मग पश्चात्ताप होईल.
त्यांच्या बोलण्यात तथ्यांश होता हे कदाचित तेव्हा कळत नव्हतं, पण आज नीटच कळलं आहे. मागच्या लेखात ज्या घटनेबद्दल सविस्तर लिहिलं आहे, त्याच संदर्भातली आणखी एक घटनाही सांगण्यासारखी आहे.
वेळ मिळाला की जवळच्या एका सार्वजनिक बागेत मी चक्कर मारायला जातो. ही बाग अतिशय आखीवरेखीव आहे. तिची देखभालही चांगली केली जाते. तिथे शांतपणे चालण्यासाठी वॉक-वे आहे. तिथे फिरणार्‍या काही ज्येष्ठ नागरिकांशी माझी भेट होते. आवश्यक तेवढं फिरून झाल्यावर ही मंडळी तिथे असलेल्या बाकांवरून बसतात. कधीमधी माझ्याबरोबर फिरणारे एक ओळखीचे गृहस्थ त्या दिवशी माझ्या शेजारी बाकावर बसले. नेहमी हे गृहस्थ चपला काढून, मांडी घालून बाकावर बसत. त्या दिवशी मात्र ते पाय खाली सोडून बसले होते. मग लक्षात आलं की त्यांनी रोजच्या चपलांऐवजी आज नव्या पिढीचे ‘जॉगिंग शूज’ घातले होते. धोतर आणि जॉगिंग शूज हे कॉम्बिनेशन कसंतरीच दिसत होतं. मी गमतीनं म्हटलं, ‘काय राव, आता या वयात धोतरावर जॉगिंग शूज म्हणजे ‘बुढ्ढी घोडी लाल लगाम’ छाप दिसतंय!’
माझं बोलणं ऐकून तेही हसले आणि म्हणाले, ‘हे असलेतसले जॉगिंग शूज नव्हेत, महाराज! घातल्यावर लिटरभर रक्त वाढल्यासारखं वाटतंय. ऐकून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.’ त्यानंतर त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी :
त्यांचा एकोणीस वर्षांचा नातू कॉलेजच्या तिसर्‍या वर्षात शिकत होता. शिक्षणात तर हुशार होताच; पण इतर गोष्टींतही त्याला रस होता. या तीन वर्षांत त्याला कॉलेजकडून तीन-चार रोख बक्षिसं मिळाली होती. शिवाय या काळात वाढदिवस, दसरा, दिवाळी अशा शुभप्रसंगी त्याला घरातल्या मंडळींनी शकुनाचे म्हणून जे पैसे दिले ते सगळे त्यानं साठवले होते. तीन वर्षांत त्याच्याजवळ सहा हजार रुपये जमले होते. गेल्या आठवड्यात त्याचा वाढदिवस होता. त्या दिवशी कुणाला काहीही न सांगता या मुलानं आई-वडील, आजी-आजोबा, एक लग्नाची आत्या आणि धाकटी बहीण सर्वांसाठी काही ना काही भेटी आणल्या होत्या. आजोबांच्या पायाचं माप घेऊन हे शूज घेऊन आला होता. आजोबा रोज फिरायला जाताना चपला घालतात, त्याऐवजी त्यांनी जॉगिंग शूज घातले तर त्यांना चालायला छान वाटेल या हिशेबानं तो हे बूट घेऊन आला होता. वाढदिवशी सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यावर त्यानं आपली जादूची पोतडी उघडली आणि सगळ्यांना अशा भेटी देऊन आश्चर्यचकित केलं!
एवढं सांगेपर्यंत गृहस्थांचा गळा दाटून आला होता. डोळे पाणावले होते. शेवटी म्हणाले, ‘असले बूट मी आयुष्यात कधी घातले नाहीत. चपला घालून चालण्यात मला काही अडचणी वाटत नाही. उलट बुटात पाय बांधून ठेवायची सवय नसल्यामुळे हे घालून चालताना जरा अवघडच वाटतं, पण नातवानं हौसेने आणले आहेत ना, म्हणून रोज घालून येतो.’
पाहायला गेलं तर अगदी क्षुल्लक घटना आहे. तरीही मानवी मनाला प्रभावित करण्याचं प्रचंड सामर्थ्य तिच्यात आहे. समजूतदार मुलगा-सून आणि नातवंडं, आजी-आजोबांच्या भावनांना कशी हात घालू शकतात, स्पर्श करू शकतात याचं हे छानसं उदाहरण आहे. मागचं उदाहरण आणि हे उदाहरण, दोन्ही किती बोलकी आहेत!
एक सत्तरी ओलांडलेले परिचित एक वाक्य पुन्हापुन्हा उच्चारत असतात. आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या घरात वडिलांचा खूप धाक होता. सगळं घर त्यांचे शब्द वरच्यावर झेलायचं!
यात मुळीच अतिशयोक्ती नाही. साठ-सत्तर वर्षांपूर्वी कर्त्या पुरुषाचा, मग ते वडील असोत वा आजोबा, संपूर्ण घराला धाक असायचा. तुमची स्वत:ची बाल्यावस्था, किशोरावस्था किंवा तारुण्यसुद्धा आठवून पाहा. तुमच्या अनेक आवडी-निवडींवर आणि एकूणच जडणघडणीवर त्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या कडक धोरणाचा प्रभाव असेल. त्यांना जे आणि जसं आवडेल ते आणि तसंच घरातल्या सगळ्यांना करावं लागत असे. त्यांच्यासमोर काही बोलायची कुणाची प्राज्ञा नसे. घरातल्या सुनांना सासवांचा धाक असे हे आपण पाहिलं आहे, या धाकामुळे जरबेमुळे कुटुंबात एक प्रकारची शिस्त निर्माण होत असे, हे मान्य, पण नव्या पिढीच्या काही आशाआकांक्षाही त्या धाकाखाली चिरडल्या जात हेही तितकंच खरं!
आमच्या तरुणपणी आमच्या कपड्यांची निवडही वडीलच करत असत, रंगीत पट्ट्यापट्ट्यांची लुंगी नेसण्याचं वेड त्या काळी नव्यानं आलं होतं. एकदा मी अशी लुंगी घ्यायला विषय काढताच वडील कडाडले होते. खबरदार, ती तसली लुंगी घातलीत तर! तसल्या लुंग्या आपण वापरत नाही. त्यांच्यासमोर आम्ही कधीही लुंगी नेसू शकलो नाही. जी गोष्ट लुंगीची तीच ब्रेड किंवा पावाची. आम्हा मुलांना ब्रेड खावासा वाटला तरी असले पदार्थ घरी आणायला वडिलांची परवानगी नव्हती. संघर्षाची वेळ आली तर निर्णय बुद्धीच्या मदतीनं घ्यायला हवा. आपल्या भावना निर्दयपणे चिरडून टाकाव्या किंवा विसरून जाव्यात असा याचा अर्थ नाही. इतकंच म्हणायचं आहे की बुद्धी आणि भावनांच्या संघर्षाच्या प्रसंगी बुद्धीला 51% महत्त्व द्यावं आणि भावनांना 49%च्या पुढे वाढू देऊ नये.
संपूर्ण गाव स्वच्छ नीटनेटकं असावं हा एक आदर्श, पण वास्तवात तसे कुठेच दिसत नाही. असं असलं तरी स्वच्छता आपला सगळ्यांनाच आवडते. आता या वयात संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियान चालवणं शक्य नाही. तेव्हा हे अभियान आपल्या घरापुरतं, आपल्या अंगणापुरतं मर्यादित ठेवूया. अशी पाच-पंचवीस अंगणं जरी स्वच्छ, सडासंमार्जन केलेली असतील तर आपले डोळे तर निवतीलच, पाहणार्‍यांच्या डोळ्यांनाही गारवा लाभेल.
अनुवाद : प्रतिभा काटीकर, सोलापूर

dinkarmjoshi@rediffmail.com