आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dinkar Joshi Article About Senior Citizens, Divya Marathi

स्वर्गाच्या दारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्याच्या अखेरच्या काळात माझ्या वडिलांनी एकदा स्वत:चा फोटो काढून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. घरातल्या अल्बममध्ये त्यांचे पुष्कळ फोटो होते. इतकंच नव्हे, तर वीसेक वर्षांपूर्वी काढलेला त्यांचा एक फोटो फ्रेम करून भिंतीवरदेखील आहे. मी एका फोटोग्राफर मित्राला बोलावून त्यांचे वेगवेगळे तीन-चार फोटो काढून घेतले, तेव्हा ते म्हणाले होते- आता अखेरच्या काळातला एखादा फोटो घरात असायला हवा, कारण माझ्या हयातीनंतर असाच फोटो भिंतीवर असायला हवा.

काही वर्षांपूर्वी भावनगरला आमच्या जुन्या घरी जाणं झालं. आता वावर नसलेल्या त्या घरातल्या एका कपाटात जुने फ्रेम केलेले दोन-तीन फोटो सापडले. या फोटोत कुठले तरी काका होते, मामा होते, आजी होत्या. माझ्या मुलांना आणि नातवंडांना मी हे फोटो दाखवले तेव्हा त्यातला एकही चेहरा त्यांना ओळखता आला नाही. या स्वर्गवासी झालेल्या सगळ्यांच्या मांडीवर मी बसलो होतो, अंगाखांद्यावर खेळलो होतो; पण त्यांची तिसरी किंवा चौथी पिढी त्यांचे चेहेरे ओळखू शकत नव्हती.

आपल्यापैकी बरीच मंडळी पितृश्राद्ध किंवा मातृश्राद्धाच्या निमित्ताने सिद्धपूरला गेली असतील. श्राद्धक्रियेत तर्पणविधी करताना स्वर्गस्थ आई किंवा वडिलांच्या नावाबरोबरच पितामह, पितामही, मातामह, मातामही आणि त्याच्याही आधीच्या एका पिढीच्या नावाचा उच्चार केला जातो. अशा वेळी बर्‍याचदा आपल्याला आधीच्या तिसर्‍या-चौथ्या पिढीतली नावं आठवत नसतात. मग नावाचूनच आपण तर्पणविधीचा संकल्प करतो.

या गोष्टी काय सुचवतात?
प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने आता ही गोष्ट सतत लक्षात ठेवावी की, आणखी काही काळाने आज ज्या घरात आपण राहत आहोत त्या घराच्या भिंतीवर आपण एक फोटो बनून जाणार आहोत. काही काळ या फोटोंची काळजी घेतली जाईल. विशिष्ट दिवशी त्या फोटोला फुलांचे हारही घातले जातील. मात्र, त्यानंतर जेव्हा केव्हा घराच्या दुरुस्तीचं काम निघेल, किंवा भिंतींचे रंग बदलतील, जेव्हा मुलांची आणि त्यांच्या मुलांची अभिरुची बदलेल तेव्हा हे फोटो नव्या भिंतीवर बरे दिसणार नाहीत, म्हणून ते तिथून काढले जातील. कुटुंबातील एखादी वृद्ध व्यक्ती हयात असेल तर तो फोटो देवघरात ठेवला जाईल. कालांतराने तिथूनही तो अदृश्य होईल आणि त्याची रवानगी माळ्यावर होईल. तिथे तो काही काळ राहिला तरी एक दिवस त्याच घरातील नवी पिढी विचारेल, हा कुणाचा फोटो इथे उगाच जागा अडवून बसला आहे?
हे सगळं ऐकायला, वाचायला थोडं अवघड वाटतंय, मनाला काहीसं क्षोभकारकही आहे, पण असलं तरी ते निखळ व्यावहारिक वास्तव आहे आणि ते स्वीकारल्यावाचून चालणार नाही.

जन्माला आलेला प्रत्येक जीव आयुष्याच्या शेवटच्या कल्पनेनं भयभीत होतोच. याचं कारण असं की आयुष्याच्या समाप्तीनंतर देहाचं काय होतं हे आपणा सर्वांना ठाऊक आहे; पण ज्याला आपण जीव असे संबोधतो त्याचं काय होतं हे आपल्याला मुळीच माहीत नाही. या अज्ञानापोटीच हे मृत्यूचं भय असतं. ही भीती कमी करण्यासाठी मृत्यूनंतर जीवाचं काय होतं याबद्दल विविध धर्मांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं आहे. सत्कृत्ये करणारा स्वर्गात जातो आणि तिथे कोणकोणती सुखं असतात याबद्दल लिहिलं गेलं आहे, तर दुष्कृत्ये करणारा नरकात जातो आणि तिथे कोणत्या यातना सहन कराव्या लागतात याचीही चर्चा केली आहे. याबद्दलचा अधिकृत पुरावा आपल्यापाशी नसला तरी यामागे माणसाने आयुष्यात अधिकाधिक सत्कार्ये करत राहावे हाच उद्देश आहे.

माणसाला जगायला आवडतं, मृत्यूनंतरही आपण जिवंत असावं, स्थूलरूपात नसलो तरी सूक्ष्म स्वरूपात अशी एक इच्छा त्याच्या सुप्त मनात सदैव वास करत असते. वाढत्या वयाबरोबर ही इच्छा तीव्र होत जाते, असं न होता जगण्यापासून कायमची मुक्ती मिळण्याची इच्छा असावी ही अतिशय आदर्श परिस्थिती आहे. पण तिची प्राप्ती मोजक्याच लोकांना होते. आपल्या धर्मशास्त्रात असंही सांगितलं आहे की, अंतकाळी पित्याच्या देहापासून आत्मा अलग होतो तेव्हा तो अंशरूपाने पुत्रात प्रवेश करतो. याचा अर्थ असा की पिता आता पुत्राच्या देहात राहून जगतो. एक वेदोक्ती असंही सांगते की, जिवात्म्याचा अंश एकापाठोपाठ एक अशा सात पिढ्यांपर्यंत सतत खाली उतरतो आणि सातव्या पिढीच्या अंताबरोबर तो पूर्णपणे मुक्त होतो. या कल्पनेला अनुसरूनच कदाचित आपण सात पिढ्यांच्या संबंधाचा उल्लेख करतो आणि म्हणूनच भाऊ-बहिणींचं नातं असलेल्या स्त्री-पुरुषांचा विवाह चार पिढ्यांपर्यंत निषिद्ध मानला गेला असावा.

माणसाचं एकूण आयुष्य शंभर वर्षांचं मानलं जातं. हे संपूर्ण आयुष्य जगण्याची माणसानं इच्छाही धरावी. अट एकच की, यातली शेवटची वर्षं एखाद्या समाजकार्यासाठी वेचली जावीत. आध्यात्मिक चिंतन, मनन आणि त्याचा प्रसार हेही एक समाजोपयोगी कार्यच आहे, असं काही घडलं नाही तर मात्र दीर्घायुष्य हा आशीर्वाद नव्हे, तर शाप बनण्याची शक्यता अधिक आहे. चित्तवृत्तींचा विरोध करून त्यांना ताब्यात ठेवून ज्येष्ठ नागरिकांना स्वस्थपणे जगता आलं नाही तर शारीरिक स्वास्थ्य चांगले असूनही हे दीर्घायुष्य तापदायक ठरेल. याचं महत्त्वाचं कारण हे की, प्रत्येक माणसाला दीर्घायुष्याचं वरदान मिळालेलं नसतं. त्यामुळे घडतं असं की, कुटुंबातील आप्तजन- मुलगा-सून, मुली-जावई, धाकटा भाऊ-बहीण यांच्यापैकी काहींची जीवनयात्रा समाप्त होते आणि या दीर्घायुषी ज्येष्ठाला ते पाहावं लागतं, सहन करावं लागतं. ऋग्वेदातील एक ऋचेत यज्ञदेवतेकडून ऋषी असं वरदान मागतात. हे देव, माझ्यानंतर आलेले माझ्याआधी जाणार नाहीत, असे वरदान मला द्या. दुर्दैवानं काही ज्येष्ठांच्या बाबतीत असे आशीर्वाद फळाला येत नाहीत. त्यांच्यामागून आलेले त्यांच्या आधी निघून जायला लागतात तेव्हा कुणाही संवेदनशील व्यक्तीला वाटेल अशी अपराधीपणाची भावना त्यांच्या मनात व्यापून राहते.

काही ज्येष्ठ भूतकाळाबद्दल अधिकच विचार करताना दिसतात. सुरुवातीच्या काळात आपण काय काय कष्ट भोगले याच्या त्याच त्याच कथा पुन्हा पुन्हा सांगत बसतात. या उलट काही ज्येष्ठ मंडळी अशीही असतात जी सद्य:परिस्थितीबद्दल नाखुश असतात, सतत भूतकाळातील ऐश्वर्याबद्दल सांगत असतात. भूतकाळातील एकच विशेष काळ एखाद्याला दु:खमय वाटला असेल तर दुसर्‍याला तोच काळ सुखाचा गेला असण्याची शक्यता असते. जगणं सुखाचं आहे किंवा दु:खाचं याबद्दल गणिती पद्धतीच्या अचूकतेनं सांगणं अवघड आहे. भूतकाळातील ज्या घटना तुम्हाला आज सुखद वाटत असतील, कुणी सांगावं, आज या वयात त्या घटना पुन्हा घडल्या तर दु:खद वाटू शकतील. याच्या उलटही घडू शकतं. सुखाची वा दु:खाची अनुभूती स्थलकालसापेक्ष असते. जीवनात सर्वत्र आनंदच आहे. तुम्हाला तो घेता यायला हवा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी धर्मग्रंथातून, उपदेशकांनी आणि मोठमोठ्या कवींनीही सांगितल्या आहेत.
अनुवाद : प्रतिभा काटीकर,सोलापूर
(क्रमश:)
dinkarmjoshi.@rediffmail.com