आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोलाचे मायबाप प्रेक्षक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाटकाचा प्रत्येक प्रयोग निर्विघ्नपणे पार पडेल, अशी कोणीच खात्री देऊ शकत नाही. म्हणूनच आयत्या वेळी काय संकट येईल, त्यातून मार्ग काढून प्रयोग कसा सादर करता येईल, याचा निर्णय घेणे हा निर्माते आणि कलाकार यांच्यासाठी फारच कठीण प्रसंग असतो. यात प्रेक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. प्रेक्षकांनी साथ दिली तरच आयत्या वेळच्या संकटांवर मात करता येते, ही गोष्ट प्रत्येक निर्माता शंभर टक्के मान्य करेल.

नुकताच २ सप्टेंबर रोजी ‘लव्हबर्ड‌्स’चा एक प्रयोग औरंगाबादच्या संत एकनाथ नाट्यगृहात रात्री ९.३० वाजता एका संस्थेने आयोजित केला होता. आदल्या दिवशी पुण्यात प्रयोग करून दुपारी एकला बस निघाली, ती बरोब्बर सव्वासातला औरंगाबादला पोहोचली. प्रयोग ९.३०चा असल्यामुळे सेट वेळेत लागला, प्रोजेक्टरही चेक करून झाला. (काही दृश्ये शूट करून ती प्रोजेक्टर वापरून नाटकात दाखवली आहेत.) तिसरी घंटा झाली, पडदा उघडला, पहिल्या सीनमधील मुक्ता बर्वेच्या फोन कट नंतरच्या एक्झिटनंतर ऑपरेटरने पहिला व्हिडिओ ऑन केला, पण काही तांत्रिक अडचणीमुळे पडद्यावरील दृश्यं दिसेचनात. या आयत्या वेळच्या अडचणीवर काय करावे, याचा निर्णय दोन मिनिटांत घ्यायचा असल्यामुळे आम्ही प्रयोग सुरू ठेवून मध्यंतरात प्रेक्षकांना विश्वासात घेऊन याबद्दल सांगण्याचा निर्णय घेऊन प्रयोग तसाच पुढे सुरू ठेवला. मध्यंतरात सुदैवाने हा प्रॉब्लेम सुटला. प्रयोग संपल्यावर आयोजक संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सत्कार समारंभात मुक्ताने प्रोजेक्टरचा झालेला हा प्रॉब्लेम सांगितला. जे प्रेक्षक नाटक पुन्हा पाहात होते त्यांना हा प्रॉब्लेम कळला, तरी स्क्रिनवरची दृश्यं आठवत होती. पण जे प्रथमच नाटक पाहात होते, त्यांनी मुक्ताला भेटल्यानंतर आम्हाला संवाद ऐकू येत होते, त्यामुळे संदर्भ लागत होता, असं सांगितलं.

असाच एक किस्सा मला आठवतोय, तो लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ‘उचलबांगडी’ या नाटकाच्या बाबतीत घडलेला. राजा गावडे लिखित या नाटकाचं दिग्दर्शन दिलीप कोल्हटकर यांनी केलं होतं. स्वत: राजा गावडे या नाटकात भूमिका करत होते. एका प्रयोगाला राजा गावडे यांचा घसा बसल्यामुळे आयत्या वेळी प्रयोग रद्द करावा असा निर्णय घेणार, इतक्यात तिथे हजर असलेले दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांनी एक सूचना केली, ‘आपण पडदा उघडून प्रेक्षकांना विश्वासात घेऊन ही अडचण सांगून एक पर्याय देऊ. मी नाटकाचं स्क्रिप्ट हातात घेऊन राजा गावडेची भूमिका तुम्हाला मान्य असेल तर करतो किंवा प्रयोग रद्द करून तिकिटाचे पैसे परत घ्यावेत, असं जाहीर करू या.’ नाटकातील सर्वांना ही कल्पना आवडली आणि तसं जाहीर केल्यावर प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे मान्य केल्यावर दिलीप कोल्हटकर यांनी पूर्ण नाटक हातात स्क्रिप्ट घेऊन संवाद म्हटले. नाटक संपल्यावर प्रेक्षकांनी कडाडून टाळ्या दिल्या!

‘काटकोन त्रिकोण’ या नाटकातील प्रमुख कलाकार डॉ. मोहन आगाशे यांच्या बाबतीत एका प्रयोगाच्या वेळी घडलेली एक घटना. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात प्रयोग सुरू होतानाच, डॉ. आगाशेंना उलट्यांचा त्रास होऊ लागला. प्रयोग करायचा की नाही, असा विचार होऊ लागला. पण डॉ. आगाशेंनी प्रयोग रद्द करण्यास विरोध केला. प्रयोग सुरू झाला आणि मध्यंतरानंतर प्रयोग सुरू झाल्यानंतर डॉ. आगाशे यांना अस्वस्थपणा जाणवू लागल्यामुळे प्रयोग मध्येच थांबवण्यात आला. थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयोग सुरू करता येईल का, याचा विचार करत असता डॉ.आगाशे यांना जास्त त्रास होऊ नये, म्हणून उर्वरित प्रयोग त्यांनी करू नये, असा निर्णय घेण्यात आला. निर्मात्यांनी तिकिटाचे पैसे परत करण्याची तयारी केली, पण प्रेक्षकांनी नाटक रद्द न करता उर्वरित भाग संदेश कुलकर्णी, केतकी थत्ते यांनी हातात स्क्रिप्ट घेऊन वाचन करावे, असं सुचवलं. प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन प्रयोग पुढे सुरू करण्यात आला. संदेश कुलकर्णी आणि डॉक्टरांचा सीन असेल, तेव्हा केतकी थत्तेने डॉक्टरांची भूमिका, केतकी थत्ते आणि डॉक्टरांच्या सीनमध्ये संदेश कुलकर्णीने डॉक्टरांची भूमिका अशी हातात स्क्रिप्ट घेऊन सादर केली.

अलीकडच्या काळात ‘नांदी’ या नाटकाचा एक प्रयोग रात्री साडेआठला डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. नाटकातल्या दोन कलाकारांनी ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो आहोत, असे फोन करून निर्मात्यांना कळवलं. सव्वा नऊ झाले तरी ते ट्रॅफिक जॅममध्येच, शेवटी त्यांची भूमिका नाटकातील दुसर्‍या दोन कलाकारांनी करावी, असं ठरवून प्रेक्षागृहात तसं जाहीर करून प्रयोग सुरू करण्यात आला.या सर्व घटनांमध्ये नाटकवाल्यांना सांभाळून घेणार्‍या मायबाप प्रेक्षकांची मोलाची साथ लाभल्यामुळेच, सर्व प्रयोग व्यवस्थित पार पडले.

dinupednekar1963@gmail.com