आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहनशेठ तोंडवळकरांची नाट्यमोहिनी !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहनशेठ तोंडवळकर यांनी "पुरुष' नाटकाचे बुकिंग आमच्याकडून काढून घेतले. या घटनेनंतर एखादा माणूस कायमचा रागावू शकतो; पण मी नाही मोहनशेठ तोंडवळकरांवर राग धरला कधी. कारण असा अनवट वाटेवरचा निर्माता होणार नाही.
मुंबईतील नाट्यव्यवसायात मोहन वाघ यांच्या बरोबरीच्या काळात दुसरे प्रख्यात निर्माते होते, ‘कलावैभव’चे मोहन तोंडवळकर. मोहन वाघांप्रमाणे यांचेही बुकिंग कॉण्ट्रॅक्ट आमच्याकडेच होतं. मोहन तोंडवळकरांची नाटकं होती ‘एक हट्टी मुलगी’, ‘हिमालयाची सावली’, ‘पप्पा सांग कुणाचे’, ‘नल दमयंती’, ‘माणसाला डंख मातीचा’, ‘जास्वंदी’, ‘काचेचा चंद्र’, ‘महासागर’, ‘सावित्री’, ‘छुमंतर’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘पुरुष’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘शंभुराजे’ आणि इतर अनेक. व्यवसायातले बाकीचे निर्माते आपल्या नाटकांची संख्या मोजत असतात, पण मोहन तोंडवळकरांनी असा हिशेब कधीच ठेवला नाही. म्हणूनच
माझ्या तेहतीस वर्षांच्या कारकिर्दीतील माझे आवडते निर्माते मोहन तोंडवळकर. वेगळ्या वाटेवरच्या नाटकांचा निर्माता, अशी यांची ओळख होती. नाट्य व्यवसायात मोहन वाघ व मोहन तोंडवळकर या दोघांना सारेच जण मोहनशेठ म्हणत. त्याप्रमाणे मीही लेखात तोंडवळकरांचा उल्लेख ‘मोहनशेठ’ असाच करणार आहे.
मोहनशेठ तोंडवळकर शासनाच्या हौशी नाट्यस्पर्धेला आवर्जून हजेरी लावून स्पर्धेची नाटकं बघत. त्यांचं वाचनही तेवढंच दांडगं होतं. कोणतंही नाटक करण्यापूर्वी स्वत:चं समाधान होईपर्यंत, ते नाटकाच्या तालमींना सुरुवात करतच नसत. त्यांची ‘पल्लवी ॲडव्हटायझर्स’ नावाची जाहिरात एजन्सीही होती. ऑफीस शिवाजी मंदिरच्या मागच्याच बाजूला दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे बुकिंग सुरू होण्यापूर्वी तिकिटांचं बंडल घेण्याकरता मी बऱ्याचदा गेलो असता, मोहनशेठना हातात पुस्तक घेऊन वाचन करताना अनेक वेळा पाहिलेलं आहे. मोहनशेठ यांची जाहिरात एजन्सी जरी असली, तरी वर्तमानपत्राच्या मालकांनी जाहिरातीचे दर वाढवले की पहिला विरोध ते स्वत:च करत. कारण वैयक्तिक फायद्यापेक्षा व्यवसायातील लोकांचं हित ते जास्त बघत. निर्माता संघाच्या मिटिंगमध्ये या विषयावर ते खूप वाद घालत. आपलं म्हणणं सर्व निर्मात्यांना पटवून देत. नाटकाची पहिल्या काही प्रयोगाला मोठी जाहिरात करून झाली की, मोहनशेठ तोंडवळकर लगेच सिंगल कॉलम जाहिरातीवर येत असत. खरं तर स्वत:ची एजन्सी असताना वर्तमानपत्राकडून जाहिरातीवरील कमिशन स्वत:लाच मिळणार असल्यामुळे जाहिरातीचा खर्च कमी होत असतानासुद्धा सिंगल कॉलम जाहिरात करत. मोहनशेठ नवीन नट नक्की करण्यापूर्वी दिग्दर्शकाला त्या नटाची ‘U रो टेस्ट’ घ्यायला सांगत. (U रो टेस्ट म्हणजे शिवाजी मंदिर नाट्यगृहातील स्टॉलमधील सर्वात शेवटची रांग). स्टेजवरून या नटाचा आवाज ‘U रो’मध्ये ऐकू आला की, नटाची निवड फायनल होत असे.
मोहनशेठ तोंडवळकर यांची एक फार जुनी सवय होती, ते संध्याकाळी पाचच्या सुमारास ऑफिसमधून बाहेर पडत आणि बुकिंग काऊंटरवर येऊन प्रत्येक प्लॅनवर नजर टाकून जात. व्यवसायाचा अंदाज येण्यासाठी हे निरीक्षण असे, हे सर्वांना माहीत होतं. ‘पुरुष’ नाटकाच्या वेळी एक किस्सा घडला आणि मोहनशेठनी आमच्याकडून बुकिंग कॉण्ट्रॅक्ट काढून घेतलं. त्यावेळी ‘पुरुष’ नाटक हाऊसफुल्ल चाललं होतं. एका संस्थेने या नाटकाचा एक प्रयोग कॉण्ट्रॅक्टने घेतला होता. संस्थेच्या सभासदांना तिकीट विकून पाठीमागच्या रांगांमधली शिल्लक राहिलेली तिकिटं बुकिंग काऊंटरला विक्रीकरता ठेवण्यात आली होती. नेहमीप्रमाणे मोहनशेठ बुकिंग काऊंटरला आले, ‘पुरुष’च्या प्लॅनवर नजर टाकली, किती बुकिंग आहे, असं मला विचारल्यावर मी हिशेब करून त्यांना आकडा सांगितला. पुढे त्यांनी मला कंपनीकरता कुठल्या जागा राखीव ठेवल्या आहेत, असं विचारलं. मी म्हणालो, संस्थेने घेतलेला प्रयोग आहे, पुढची तिकिटं त्यांनी बाहेर खपवली आहेत, शिल्लक तिकिटं काऊंटरला विकायला दिली आहेत. त्यावर ते म्हणाले, तू संस्थेच्या लोकांना कंपनीकरता राखीव जागांचं सांगितलं नाहीस का? मी म्हणालो, नाही. त्यावर ते खूप चिडले आणि मला बडबडू लागले. मी काहीही न बोलता त्यांचं ऐकून घेत होतो. शेवटी त्यांनी तुमची बुकिंग काढून घेईन, हे वाक्य मला ऐकवताच मीही भडकलो आणि म्हणालो, तुम्ही कॉण्ट्रॅक्टने प्रयोग दिला आहे ना, मग तुम्हीच त्या संस्थेला कंपनीकरता जागा राखून का ठेवायला सांगितले नाही? पुढच्या प्रयोगाला ‘पुरुष’चं बुकिंग आमच्याकडे नव्हतं!
या घटनेनंतर एखादा माणूस कायमचा रागावू शकतो; पण मी नाही मोहनशेठ तोंडवळकरांवर राग धरला कधी. कारण असा अनवट वाटेवरचा निर्माता होणार नाही. मोहनशेठनीही फार काळ माझ्यावर राग धरला नाही. पुढे मीही जेव्हा वेगळ्या प्रकारच्या नाटकांची निर्मिती केली, तेव्हा माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. असं दुसऱ्याचं कौतुक करण्याचा गुण फार कमी लोकांकडे असतो.
लेखक अजितेम जोशी हा माझा एकदम खास मित्र. मी ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’, ‘फायनल ड्राफ्ट’, ‘खेळ मांडियेला’, ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’, ‘लव्ह बर्ड‌्स’ या नाटकांची निर्मिती केल्यावर अजितेम मला ‘मोहनशेठ’ अशी हाक मारू लागला. मी त्याला कारण विचारल्यावर म्हणाला, तू मोहन तोंडवळकर यांच्यासारखी वेगळी नाटकं करतोस, याकरता मी तुला ‘मोहनशेठ’ हाक मारतो. मी अजितेमला म्हणालो, मोहनशेठ हे नाटकाच्या स्क्रिप्टवर जेवढा अभ्यास करतात त्याच्या दहा टक्केही माझा होत नाही, त्यामुळे त्यांच्याबरोबर माझी बरोबरी होऊच शकत नाही. आता विचार केला की जाणवते, मोहनशेठ तोंडवळकरांनी निर्मिलेल्या नाटकांची मोहिनी प्रेक्षकांवर इतकी होती की, कलावैभवचे नाटक म्हटले की ते दर्जेदारच असणार, हे समीकरण झाले होते. ते समीकरण आजही माझ्या मनात घट्ट रुजलेले आहे.
dinupednekar1963@gmail.com
बातम्या आणखी आहेत...