आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dinu Pednekar Article On The Goa Hindu Association.

'गोवे'करांचा नाट्याविष्‍कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी रंगभूमी केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे कर्नाटक-गोवा येथून आलेल्या ऊर्जावाही नाट्यकर्मींच्या बळावरही उत्तरोत्तर बहरत गेली. धी गोवा हिंदू असोसिएशन ही नाट्यसंस्था आणि संस्थेच्या सावलीत बहरत गेलेली नाटके व्यावसायिक रंगभूमीच्या इतिहासातले सोनेरी पान ठरले...
महाराष्ट्र राज्य शासनातर्फे नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या नावे नाट्यव्यवसायातील उत्कृष्ट कामगिरीकरता दिला जाणारा पुरस्कार धी गोवा हिंदू असोसिएशनचे रामकृष्ण नाईक यांना जाहीर झाल्याची बातमी वाचनात आली. खूप आनंद झाला. मी धी गोवा हिंदू असोसिएशनच्या नाटकांच्या तिकीट विक्रीचं काम अनेक वर्षं सांभाळलं आहे. १९१९मध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्य करण्याकरता मुंबईतील गोवेकरांनी एकत्र येऊन धी गोवा हिंदू असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. त्यानंतर १९५५मध्ये धी गोवा हिंदू असोसिएशनच्या कला विभागाची स्थापना करण्यात आली. त्याची धुरा रामकृष्ण नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली. त्या काळी रामकृष्ण नाईक यांच्या सोबतीला दामू केंकरे, मोहनदास सुखठणकर, सतीश म्हापसेकर, देवदत्त मणेरीकर, अवधूत गुडे आणि इतर अनेक मंडळी होती.
धी गोवा हिंदू असोसिएशनच्या कला विभागाची स्थापन झाल्यावर १९५५मध्ये ‘संगीत खडाष्टक’, १९५६मध्ये ‘संगीत संशयकल्लोळ’ आणि १९५७मध्ये ‘करीन ती पूर्व’ या नाटकांसाठी लागोपाठच्या तीन वर्षांत महाराष्ट्र राज्य शासनाच्या नाट्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार पटकावण्याचा मान मिळवला. १९५९मध्ये ‘संगीत शारदा’ या नाटकासाठी पुन्हा एकदा स्पर्धेत प्रथम पुरस्काराचा मान मिळवला. यानंतर ‘युद्धस्य रम्य कथा’, ‘मरणात खरोखर जग जगते’, ‘मृच्छकटीक’, ‘होनाजी बाळा’ या नाटकांची निर्मिती करून राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेतला.
१९६२मध्ये धी गोवा हिंदू असोसिएशन व्यावसायिक नाट्यनिर्मितीकडे वळली. वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या पहिल्याच नाटकाने उत्तम व्यावसायिक यश मिळवलं. त्या काळचे सुप्रसिद्ध अभिनेते मा. दत्ताराम यांनी या नाटकात शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. या नाटकाचे ७५०च्या आसपास प्रयोग झाल्यामुळे धी गोवा हिंदू असोसिएशन ही संस्था व्यावसायिक रंगभूमीवर नावारूपास आली. १९६४मध्ये वसंत कानेटकर लिखित ‘मत्स्यगंधा’ या संगीत नाटकाची निर्मिती केली. रामकृष्ण नाईक यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांना संधी देऊन या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर आणलं. या नाटकातील सर्व गाणी गाजली, पण विशेष करून आशालता वाबगांवकर यांचं ‘सावज माझं गवसलं’ या गाण्याने विशेष दाद मिळवली. ‘मत्स्यगंधा’चे ५०० प्रयोग सादर झाले. याच संस्थेने १९६६मध्ये वसंत कानेटकर लिखित ‘लेकुरे उदंड जाहली’ या नाटकाची निर्मिती केली. दया डोंगरे आणि श्रीकांत मोघे यांचा उत्तम अभिनय, अप्रतिम गाणी आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे तेवढेच अप्रतिम संगीत यामुळे हेही नाटक तुफान चालले.
यानंतर धी गोवा हिंदू असोसिएशनने आर्य चाणक्य, धन्य ती गायनी कला, तुझा तू वाढवी राजा, संगीत एकच प्याला, आटपाटची राजकन्या या नाटकांच्या निर्मितीनंतर नाट्यव्यवसायाच्या इतिहासात माइल स्टोन नाटक म्हणून नोंद झालेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाची निर्मिती केली. प्रख्यात लेखक वि. वा. शिरवाडकर लिखित या नाटकात शांता जोग आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रमुख भूमिका होत्या. डॉ. श्रीराम लागू (आप्पासाहेब बेलवलकर) आणि शांता जोग (कावेरी) यांच्या अभिनयाची आठवण त्या काळातील प्रेक्षक आजही आवर्जून काढतात.
‘नटसम्राट’मधील आप्पासाहेब बेलवलकर यांची व्यक्तिरेखा वि. वा. शिरवाडकर यांनी शेक्सपिअरच्या नाटकातील ‘किंग लिअर’ या पात्रावरून बेतली होती. याच ‘नटसम्राट’ नाटकावर आता प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी बनविलेला ‘नटसम्राट’ हा चित्रपटही येऊ घातला आहे. पद्मश्री धुंडीराज, मीरा मधुरा, बिऱ्हाड वाजलं, सभ्य गृहस्थहो या नाटकांनंतर जयवंत दळवी लिखित, माधव वाटवे दिग्दर्शित वृद्ध जोडप्याच्या आयुष्यावरील ‘संध्याछाया’ या नाटकाची धी गोवा हिंदू असोसिएशनने निर्मिती केली. या नाटकात विजया मेहता आणि माधव वाटवे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. १९७४मध्ये वसंत कानेटकर लिखित, दामू केंकरे दिग्दर्शित ‘अखेरचा सवाल’ नाटकाची संस्थेने निर्मिती केली. विजया मेहता आणि मधुकर तोरडमल या नामवंत अभिनेत्यांसोबत भक्ती बर्वे ही अभिनेत्रीही रसिक प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरली. १९७५ मधल्या ‘दिसतं तसं नसतं’ या नाटकानंतर १९७७मध्ये ‘बॅरिस्टर’ हे जयवंत दळवी लिखित, विजया मेहता दिग्दर्शित नाटक आलं. या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीला विक्रम गोखले नावाचा उत्तम अभिनेता मिळवून दिला. (विक्रमजींना नुकताच नाट्यव्यवसायातील उत्तम कारकिर्दीकरिता सांगलीचा विष्णुदास भावे पुरस्कार मिळाला आहे.)
१९७८मध्ये ‘सूर्याची पिल्ले’, १९७९मध्ये ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकांनंतर सुरेश खरे लिखित ‘मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक आलं. या नाटकात जयराम हर्डीकर, मीनल परांजपे आणि शांता जोग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या नाटकाच्या एका दौऱ्यात संस्थेच्या बसला अपघात होऊन आग लागल्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला, त्यात जयराम हर्डीकर आणि शांता जोग यांचा समावेश होता. नाट्यव्यवसायाला यामुळे फार मोठा धक्का बसला होता. १९८०मध्ये संस्थेने जयवंत दळवी लिखित, दामू केंकरे दिग्दर्शित ‘दुर्गी’ या नाटकाची निर्मिती केली. दामू केंकरे आणि सुधा करमरकर यांच्या अप्रतिम अभिनयाने हे नाटक लक्षवेधी ठरलं. १९८१मध्ये वि. वा. शिरवाडकर लिखित, दामू केंकरे दिग्दर्शित ‘चंद्र जिथे उगवत नाही’ नाटकाची निर्मिती केली. या नाटकात विनय आपटे प्रमुख भूमिकेत होते. या नाटकानंतर संस्थेने १९८३मध्ये गिरीश कर्नाड लिखित, चि. त्र्यं. खानोलकर अनुवादित, विजया मेहता दिग्दर्शित ‘हयवदन’ या नाटकाची निर्मिती केली.
उदय म्हैसकर आणि रवींद्र मंकणी यांच्या अप्रतिम अभिनयासोबत विजय चव्हाण यांनीही आपल्या अभिनयाने लक्ष वेधून घेतलं. ‘हयवदन’ला संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी दिलेलं संगीतही अप्रतिम होतं. वसंत कानेटकर यांनी लिहिलेलं शेवटचं नाटक ‘तू तर चाफेकळी’ याच संस्थेने रंगभूमीवर आणलं होतं. या नाटकाचं संगीत दिग्दर्शन पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी केलं होतं, अभिषेकींचंही हे शेवटचं नाटक ठरलं. धी गोवा हिंदू असोसिएशनचीही ‘तू तर चाफेकळी’ ही शेवटची व्यावसायिक नाट्यनिर्मिती.
धी गोवा हिंदू असोसिएशनने काही प्रायोगिक नाटकांचीही निर्मिती केली होती. ऐन वसंतात अर्ध्या रात्री, आभाळाचे रंग, स्थळ स्नेहमंदिर इत्यादी. मात्र या संस्थेने कालांतराने नाट्यनिर्मिती थांबवल्यामुळे रसिक प्रेक्षक दर्जेदार आणि उत्तमोत्तम नाटकांना मुकला आहे. गोव्यातून येऊन मुंबईला स्थायिक झालेल्या कलावंतांनी आपल्याबरोबर गोव्याच्या मातीतले गाणे, अभिनय असे अनेक गुणही आणले होते. त्याला या मुंबईनगरीत बहर आला. गोव्यातला माणूस हा कलासक्त असतो, हे समीकरण धी गोवा हिंदू असोसिएशनच्या कार्यामुळे अधिक पक्के झाले.
dinupednekar1963@gmail.com