आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपस्‍वी बोरकरदादा (दिनू पेडणेकर)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीतकार, प्रकाशयोजनाकार, वेषभूषाकार आणि कलाकार यांचं जसं कौतुक होतं, तसं रंगभूषाकाराचं होत नाही. पण नाट्यव्यवसायात एक रंगभूषाकार असे आहेत, ज्यांच्या कामाचं कौतुक तर झालं, पण त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे ते म्हणजे कृष्णा बोरकर. रंगभूषाकार बोरकरदादांचे नाव अनेकांच्या परिचयाचं आहे.

कृष्णा बोरकर नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेत होते, पण त्यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. दादांच्या रंगभूषा कारकिर्दीची सुरुवात वयाच्या अकराव्या वर्षी कामगार रंगभूमीपासून झाली. पांडुरंग हुले नावाचे मेकअपमन त्यांचे गुरू होते. हुले यांच्या हाताखाली बोरकरदादांनी दहा वर्षं रंगभूषा साहाय्यक म्हणून काम केलं. १९४३मध्ये ‘सूडाची प्रतिज्ञा’ या नाटकासाठी बोरकरदादांनी प्रथमच स्वतंत्रपणे मेकअपमन म्हणून काम पाहिले.
कामगार रंगभूमीनंतर बोरकरदादांनी व्यावसायिक रंगभूमीवर रंगभूषाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. केशवराव दाते यांच्या ‘शिवसंभव’ नाटकासाठी रंगभूषेचे काम केल्यानंतर प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा, विद्याधर गोखलेंच्या रंगशारदा, यशवंत पगार यांच्या श्रीरंगसाधना आणि मोहन वाघ यांच्या ‘चंद्रलेखा’ संस्थेसाठी बोरकरदादांनी रंगभूषाकार म्हणून काम केले आहे. त्या काळी ‘नाट्यदर्पण’तर्फे नाटकांना प्रत्येक वर्षी पुरस्कार दिला जात असे, पण फक्त सर्वोत्कृष्ट नाटक, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना या विभागांसाठीच दिला जात असे. १९७७मध्ये नाट्यदर्पणतर्फे बोरकरदादांना रंगभूषेसाठीचा ‘मॅन ऑफ द इअर’ हा विशेष पुरस्कार ‘चंद्रलेखा’च्या ‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकातील रंगभूषेसाठी जाहीर केला. माझ्या माहितीनुसार, नाट्यव्यवसायात रंगभूषेसाठीचा हा पहिलाच पुरस्कार असेल, जो बोरकरदादांना मिळाला. (‘गुड बाय डॉक्टर’ नाटकात बोरकरदादांनी रंगभूषेने मधुकर तोरडमलांचा करारी चेहरा कुरूप करून दाखवण्याची किमया केली होती. मधुकर तोरडमल यांच्या एंट्रीच्या वेळी त्यांच्या त्या कुरूप चेहऱ्यावर स्पॉट मारला जात असे, या वेळी नाट्यगृहात अनेकदा स्त्रिया किंचाळल्याच्या घटना घडलेल्या आहेत.) या पुरस्कारानंतर राज्य शासनातर्फे आणि इतर अनेक संस्थांनी रंगभूषेसाठी पुरस्कार देण्यास सुरुवात केली.

कृष्णा बोरकरदादांनी चंद्रलेखा संस्थेसाठी काम करण्यास सुरुवात केल्यानंतर इतर नाटक कंपन्यांसाठी काम करणे बंद केले. चंद्रलेखाचे ते प्रमुख रंगभूषाकार बनले. गरुडझेप, स्वामी, गगनभेदी, दीपस्तंभ, प्रेमाच्या गावा जावे, सोनचाफा, सुख पाहता, रंग उमलत्या मनाचे, नटसम्राट, रमले मी, वादळ माणसाळतंय, घरोघरी, ऑल दि बेस्ट, रणांगण, चेहरामोहरा आदी ‘चंद्रलेखा’च्या नाटकांसाठी बोरकरदादांनी रंगभूषेचे काम केले आहे. ‘वादळ माणसाळतंय’ हे वसंत कानेटकर लिखित नाटक बाबा आमटे यांच्या आयुष्यावर आधारित होतं, यात बोरकर दादांनी काही कलाकारांना कुष्ठरोग झाल्याची रंगभूषा केली होती. वसंत कानेटकर यांनीच लिहिलेल्या ‘सुख पाहता’ या नाटकात अभिनेता यशवंत दत्त यांच्या पाच विविध भूमिका होत्या. या पाचही भूमिकांची रंगभूषा बोरकरदादांनी इतकी अप्रतिम केली होती, की लेखक वसंत कानेटकर यांनी ‘सुख पाहता’ पुस्तकाच्या प्रस्तावनेत बोरकरदादांच्या रंगभूषेचा विशेष उल्लेख केला आहे. ‘दीपस्तंभ’ नाटकातही एका कलाकाराचा चेहरा जळल्याची उत्कृष्ट रंगभूषा केली होती. ही रंगभूषा करण्याकरता बोरकरदादांना मिळत, फक्त दहा मिनिटं. या अल्प वेळेतही बोरकरदादा ही कमाल करून दाखवत.
बोरकरदादांनी व्ही. शांतारामबापूंच्या चित्रपटांसाठीही साहाय्यक रंगभूषाकार म्हणून काही काळ काम केले आहे. रंगभूषाकार बाबा वर्दम हे शांताराम बापूंच्या राजकमल चित्रपट कंपनीत प्रमुख मेकअपमन म्हणून काम करत. बाबा वर्दमांनी दादा बोरकरांना राजकमल कंपनीत साहाय्यक रंगभूषाकार म्हणून आणलं. त्या काळी साहाय्यक रंगभूषाकाराला जेवढे पैसे मिळत होते, त्यापेक्षा जास्त पैसे बोरकरदादांना मिळत होते. ‘दो आँखे बारह हाथ’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी पहिल्यांदाच बोरकरदादांनी शांताराम बापूंचा मेकअप केला. शांताराम बापूंना बोरकरदादांनी केलेला मेकअप खूप आवडला. त्यानंतर शांताराम बापू बोरकरदादांवर विशेष लक्ष देऊ लागले. बोरकरदादांनी ‘दो आँखे बारह हाथ’ नंतर बापूंच्या नवरंग, मौसी, स्त्री या चित्रपटांसाठी साहाय्यक रंगभूषाकार म्हणून काम केले.

महाराष्ट्र शासनाच्या हौशी व व्यावसायिक मराठी नाटक आणि चित्रपटांसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. बोरकरदादा गेली अकरा वर्षं मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट‌्सच्या अभ्यासक्रमातील रंगभूषा या विषयावर प्रात्यक्षिकांसहित शिकवत आहेत. वयाची ८४ वर्षे पूर्ण केलेले, कृष्णा बोरकरदादा एखाद्या युवकाला लाजवेल, अशा तडफेने आजही कार्यरत आहेत.

dinupednekar1963@gmail.com
बातम्या आणखी आहेत...