आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipak Kulkarni Article About Memory Of Independents Day

दाणादाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा किस्सा आहे १५ ऑगस्ट १९९८चा! गीतांजलीचे म्हणजे माझ्या ताईचे लग्न ठरले होते. घरात आम्ही दोघंच होतो. आम्ही दोन मित्रांसोबत जवळच दुगारवाडीला जाण्याचे ठरवले व आपापल्या बाइक्सवर टांगा मारून निघालो!

जून, जुलैमधल्या भरपूर पडलेल्या पावसाने त्र्यंबक रोड मस्त हिरवागार झाला होता. त्या हिरवळीची मजा लुटत आम्ही दुगारवाडी फाट्यापर्यंत पोहोचलो. गावातच बाइक्स लावल्या आणि कधी शेतातून, तर कधी रानातून चिखल तुडवत, पाऊस अंगावर झेलत आम्ही धबधब्याचे वरून दर्शन होते त्या कड्यापर्यंत येऊन पोहोचलो. तिथून धबधबा अतिशय सुंदर दिसत होता. इथे वरच्या कड्यापासून थेट धबधब्याखाली जाण्यासाठी रानातून पायवाट तयार झाली आहे. आम्ही त्या वाटेने हळूहळू उतरत धबधब्याच्या प्रवाहापर्यंत येऊन पोहोचलो. हा प्रवाह पार करून, पलीकडच्या तीरावरून धबधब्यापर्यंत जाण्यासाठीचा सोपा मार्ग आहे. तेव्हा प्रवाहाला पाणीही बेताचेच होते. म्हणून तो सहजगत्या पार करून आम्ही धबधब्याच्या खाली पोहोचलो आणि मग सभोवतालचे दृश्य, हलकासा पडणारा पाऊस, गप्पा-गाणी यातच किती तरी वेळ रमून गेलो.

दोन-तीन तास निघून गेले. आणि अचानक आभाळ खूप भरून आले. दुपारचे तीनच वाजले होते. पण अंधार दाटून आला आणि पुढे काय करायचं हे ठरवेपर्यंत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आम्ही झाडांचा आडोसा घेऊन पाऊस थांबायची वाट बघत राहिलो. पण पाऊस अजिबातच थांबायचं नाव घेत नव्हता. शेवटी तास-दीड तास वाट पाहून आम्ही निघण्याचा निर्णय घेतला. त्या तुफान पावसात, एकमेकांचा हात धरून पाण्याच्या प्रवाहापर्यंत येऊन पोहोचलो मात्र... आणि समोरचे दृश्य पाहून आमचे अवसानच गळाले. धबधब्याची रुंदी कित्येक पटींनी वाढली होती! समोरचा प्रवाह िजथे आम्ही गुडघ्यापर्यंत पाणी असताना पार केला होता, तो आता वेगाने वाहायला लागला होता. आता संध्याकाळचा अंधार, तुफान पडणारा पाऊस, पार करता येऊ न शकणारा पाण्याचा जोरदार प्रवाह आणि रानात अडकलेले आम्ही चौघे! आम्ही फारच धास्तावून गेलो. आईबाबांना आम्ही इथे आहोत याचा पत्ताही नव्हता. ताई बिचारी तर फारच रडवेली होऊन गेली होती. मग आम्ही उलट बाजूने कड्यावर जाण्याचे ठरवले. रस्ता पायाखालचा नव्हता. काट्याकुट्यातून मार्ग काढत, पावसाचा मारा झेलत, अंधारात चाचपडत आम्ही कसेबसे वर कड्यापर्यंत चढून आलो. रात्रीचे आठ-साडेआठ वाजले होते.

आधी ठरलेले केळवण गाठण्यासाठी तडक घराची वाट धरली आणि मग त्या ठिकाणी जाऊन जेवणावर मस्त आडवा मारला! आजही मी आणि ताई, तिची माहेरची ही शेवटची ट्रिप कशी ‘यादगार’ झाली ते पुन:पुन्हा आठवतो.