आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंत फोडली पण गाडी शिकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयाच्या पन्नासाव्या वर्षी चारचाकी शिकायची तीव्र इच्छा गप्प बसू देईना. कार शिकायची राहून गेली, ही खंत राहू नये, म्हणून ड्रायव्हिंग स्कूलमध्ये क्लास लावून हट्टानं गाडी शिकलेल्या एका मैत्रिणीचा हा अनुभव...
 
अगदी क्लासच्या पहिल्या दिवशी A, B, C ने सुरुवात झाली. ए म्हणजे अॅक्सलरेटर, बी म्हणजे ब्रेक आणि सी म्हणजे क्लच, गाडीचे गिअर इ... अशी तोंडओळख करून देऊन पहिल्याच दिवशी गाडीचे चाक ताब्यात दिले. सुरुवातीला खूपच भीती वाटत होती. रस्त्यावर लांबून कोणीतरी आलेला दिसलं तरी आमची गाडी पुढं जायची नाही. सर ओरडायचे. असं थांबल्यावर तुम्ही गाडी कशी शिकणार? सोडा हळूहळू क्लच अन् द्या अॅक्सलरेटरवर दाब. मग घाबरतच क्लच सोडायला सुरुवात व्हायची. क्लच हळूहळू सोडायला शिकणं हीसुद्धा मोठी दिव्य गोष्ट वाटायची. पटकन सुटला की, गाडी बंद पडायची. पण एकदोन दिवस गेल्यानंतर आपण गाडी चालवू शकतो, हा आत्मविश्वास हळूहळू वाढायला लागतो. परंतु ड्रायव्हिंग व्हील मात्र फार घट्टपणे धरले जायचे. सर म्हणायचे, व्हील सैल हाताने पकडा, एक हात व्हीलवर आणि एक हात गिअरवर पाहिजे. व्हील असं काही घट्ट पकडता की, जणू तुम्ही गाडीतून बाहेरच पडता आहात. हळूहळू आत्मविश्वास वाढत गेल्यानं क्लच, गिअर आणि अॅक्सलरेटर यांचं गणित बऱ्यापैकी जमू लागलं आणि आता गाडीची प्रॅक्टिस सातत्यानं ठेवायची, चांगली गाडी शिकायची तर स्वत:ची गाडी असायलाच पाहिजे, म्हणून गाडी बुक केली.

अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर गाडी घरी आली. अनेक दिवसांचं स्वप्न साकार झालं. गाडी घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी मिस्टरांना दवाखान्यात घेऊन जायचं होतं. मग रिक्षानं कशाला जायचं? आता दारात गाडी आहे. शेजारच्या बाळूला घेऊन दवाखान्यात गेलो. येताना गाडी चालवायचा मोह काही आवरला नाही. सुदैवानं त्या दिवशी रस्ता बऱ्यापैकी रिकामा होता. पहिल्या व दुसऱ्या गिअरवर दुसऱ्या एका गाडीला किंचित स्पर्श करीत गाडी घरापर्यंत आणली. माझ्या शेजारी बसलेला बाळू ब्रेक मारा, म्हणत होता; पण ब्रेक दाबायची सवयच नव्हती. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ब्रेक आणि क्लच शिकवणाऱ्याच्या पायाजवळ असल्याने ब्रेक मारण्याची फारशी प्रॅक्टिस झालेली नव्हती. बाळू म्हणाला, ‘काकू, तुम्ही ब्रेकवर पाय ठेवायला शिका.’ त्याच्या सूचनेचं तेव्हा काही गांभीर्य वाटलं नाही. मी माझी गाडी चालवत आले. दुसऱ्या दिवसापासून दररोज भाऊ किंवा दीर यांना घेऊन मैदानावर प्रॅक्टिससाठी जमेल तशी जात होते. गाडी चालवणारे, सफाईदारपणे गाडी चालवणारे लोक माझ्यासाठी खूपच कौतुकाचे वाटू लागले. मी कधी अशी गाडी चालवू शकेन, असं सारखं वाटायचं. भावाला आणि दिराला जसा वेळ मिळेल तसे येत असल्यानं सातत्य नसायचं. मग मी शेजारी राहणाऱ्या माझ्या मुलाच्या मित्राला समर्थला गाडी शिकविण्याचा आग्रह धरला.
 
मला गाडीचा अनुभव असल्याचे गृहीत धरून त्याने मला गाडीची चावी दिली आणि म्हणाला, ‘घ्या चावी काकू, आणि सुरू करा गाडी फर्स्ट गिअरवर.’ मग काय माझा उत्साह दुणावला. मी ऐटीत गाडीत बसले, गाडी सुरू केली, गिअर हळूहळू सोडत अॅक्सलरेटरवर दाब दिला अन् काही सेकंदातच गाडी शेजारच्या कंपाउंडला जोरात धडकली. कंपाउंडची भिंत चिरली, गाडीचं मडगार्ड चेमटलं. हे सारं एवढं पटकन झालं की, मला काहीच कळलं नाही. सगळी कॉलनी गोळा झाली. काही लागलं का? कसं झालं? जाऊ द्या, कशाला गाडी शिकताय? जिवाला काही झालं तर... आणि बरंच काही.

मी प्रचंड घाबरले होते. वाटते तेवढे गाडी प्रकरण सोपे नाही. अशी कशी काय गाडी सरळ न जाता वाकडी जाऊन भिंतीला धडकली, हे मला समजलेच नाही. मग लक्षात आले की, गाडीचे व्हील अगोदरच उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणावर फिरवलेले होते. त्यामुळे गाडी पुढे न जाता धाडकन भिंतीवर आदळली. एवढं सारं झालं तरी समर्थ म्हणाला, ‘चला काकू मैदानावर.’ तिथे गेल्यावर त्याने केवळ क्लचवर गाडी हळूहळू कशी पुढे जाते, ते दाखवले. मी प्रॅक्टिस केली. घडलेला प्रसंग डोळ्यासमोरून जाता जाईना. मध्ये काही दिवस जाऊ दिले. दिवसरात्र, ध्यानीमनी गाडी गाडी गाडी. या अनपेक्षित घटनेमुळे मात्र मी ब्रेकचा वापर करायला शिकले. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गाडी शिकणे आणि प्रत्यक्ष गाडी चालवणे, यात खूपच फरक असतो. कारण क्लच आणि ब्रेक शिकवणाऱ्या व्यक्तीच्या पायात असल्यानं गाडीचा कंट्रोल कसा करायचा, याची प्रॅक्टिस ड्रायव्हिंग स्कूलमध्ये निदान आमच्यासारख्यांना येत नाही, हे अगदी प्रामाणिकपणे कबूल करायला हवे. हळूहळू गाडी एकटीने चालवायला लागले. दिराने छान प्रॅक्टिस करून घेतली. शेजारच्यांची भिंत बांधून दिली. गाडीचा पुढचा भाग दुरुस्त करून घेतला आणि अखेर मी सफाईदारपणे दिमाखात गाडी चालवू लागले.
 
- दीपाली करजगीकर
kdeepali.8691@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...