आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दृष्टी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामाचा ताण फक्त नोकरी करणाऱ्या पुरुषांवरच असतो, असा एक गैरसमज आहे. मात्र घरातल्या ज्या गृहिणीमुळे पुरुष सहज नोकरी-व्यवसाय करू शकतात त्यांना गृहिणींच्या कष्टाचं मोल कधी लक्षातच येत नाही. हाउसवाइफ म्हणजे दिवसभर घरीच राहणारी स्त्री, असा समज काहीसा कमी झाला असला, तरी तो आहेच. ‘फक्त’ गृहिणी, असं काही नसतं, तिच्या जिवावर घर चालत असतं, असं ठणकावून सांगणाऱ्या आमच्या वाचक मैत्रिणींचे हे लेख.
मध्यंतरी माझी मैत्रीण जयश्री घरी आली होती. आम्ही दोघी कॉलेजच्या मैत्रिणी. गप्पांना तर अगदी उधाण आलं होतं. कारण मधली बरीच वर्षे आम्ही एकमेकींना भेटलोही नव्हतो. काय काय बोलू नि काय काय सांगू, असं झालं होतं अगदी! मी जुजबी शिक्षण पूर्ण केलं आणि लवकरच माझं लग्न झालं. नवरा, मूल, घर-संसार यातच मी गढून गेले. जयश्रीने मात्र जिद्दीने उच्च शिक्षण पूर्ण केले आणि आज ती सोलापुरात आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे.

गप्पा मारता-मारता गाडी भूतकाळातून वर्तमानकाळात आली, तसं तिने मला सहजच विचारलं, ‘अजून काय चाललंय नवीन विशेष?’ बस! माझं मन बोलू लागलं, ‘मी काय फक्त गृहिणी आहे ग! मी काहीच करत नाही. चाललंय आपलं चूल आणि मूल!’ माझा स्वर नाराजीचा होता. त्याला एक हलकीशी न्यूनगंडाची झालर होती. मी तिला म्हटलं, ‘तुझं मात्र छान आहे बाई! तू कर्तृत्ववान आहेस, स्वावलंबी आहेस. मस्तपैकी नोकरी करतेस, किती छान नाही?’ मी मनातली ही सल व तिच्याबद्दल नकळत वाटणारा हेवा बोलून दाखवलाच! माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत तिने माझा हात हातात घेत म्हटलं, ‘अगं वेडाबाई you are doing important skill work most than me. अगं, गृहिणी हे पद खूप मोठं आहे. ते उत्तमरीत्या सांभाळणं म्हणजे मोठं कौशल्याचं काम आहे.’ मग ती मला तिच्या नि माझ्या कामातला फरकच सांगू लागली. ‘आम्ही एक-दोन दिवस ऑफिसला नाही गेलो तरी ते काम करणारं ऑफिसमध्ये कुणीतरी असतं किंवा नंतरही ते काम आम्ही पूर्ण करू शकतो. तसं तुझ्या बाबतीत नाही. तू घरी नसलीस की सगळं कल्याण! सगळ्यांची जणू आबाळ!’

‘आम्ही स्वावलंबी अन् तुमच्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे. माझं काम, माझ्या हाताखालची माणसं यांची कामं ठरलेली. तसं गृहिणीच्या बाबतीत होत नाही. तुला मात्र सगळ्यांचे वेगवेगळे स्वभाव, आवडी-निवडी, त्यांच्या वेळा, त्याप्रमाणे नियोजन हे सगळं एकटीलाच पाहायचं असतं. स्वत:ला इतरांच्या मूडप्रमाणे टर्न करायचं. घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी सतत प्रयत्नशील. नाव एक अर्थात पद एक म्हणजे ‘गृहिणी’ असलीस तरी त्या घरासाठी स्वच्छता दूत, स्वयंपाकी, परिचारिका, वॉचमन, अभ्यास घेणारी, संस्कार करणारी आई कम शिक्षिका, अर्थव्यवस्थापन तेही काटकसरीने शिवाय पै-पाहुणे, अधे-मध्ये बाहेरची कामे, भाजी, दळण… इ. ही यादी न संपणारी. अशी कितीतरी कामे तुम्ही लीलया करता. आणि म्हणतेस, मी काहीच करत नाही ग! अगं, तसा विचार केला तर महिना २५-३० हजार पगार देऊनही कुणी एवढी कामं करणार नाही. शिवाय हे सगळं मनापासून, प्रेमानं, आपुलकीनं केलेलं, याची किंमत तर न केलेलीच बरी!’
‘तू काय किंवा मी काय, कुठलीही स्त्री ही घराचा कणा असते गं! आम्ही नोकरी करतो, याचं एक समाधान असलं तरी तारेवरची कसरत काही कमी नाही. मुलांना वेळ देता येत नाही, ही खंत असतेच.’ बोलता बोलता तिनं घड्याळाकडं पाहिलं. म्हणाली, ‘चल दीपा, मी निघते आता. मस्त राहा, पुन्हा भेटू.’ ती निघाली, पण माझ्या मनात तिचे विचार रुंजी घालू लागले. तिने मला खरंच अंतर्मुख केलं. मनात स्वत:बद्दल असलेलं न्यूनगंडाचं मळभ दूर होऊन मलाही स्वत:चा अभिमान वाटू लागला. स्वत:कडे पाहण्याची नवी दृष्टीच मला मिळाली जणू. थँक्यू जया!

दीपाली संकलेचा-चुत्तर, अहमदनगर
बातम्या आणखी आहेत...