आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipali Sapkal Article About A Young Woman’s Expectations From Family

मोकळा श्‍वास घ्‍यायचाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रियांनी शिपायापासून कलेक्टरपर्यंत आणि सरपंचापासून राष्ट्रपतीपर्यंत पदे सांभाळून स्वत:ला सिद्ध केले आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे दुसरीकडे संसार, कुटुंबदेखील त्या तेवढ्याच ताकदीने सांभाळत आहेत. ती कुठेच कमी पडत नाही. पण दुसरीकडे ती एक मुलगी आहे म्हणून तिला गर्भातच मारले जात आहे. कारण काय तर लग्नाच्या वेळी तिला भरपूर हुंडा द्यावा लागतो. काही ठिकाणी तर तिच्यावर असंख्य बंधने लादली जातात, ज्यामुळे तिची गुलाम असल्याची भावना वाढत जाते आणि त्यातूनच तिची घुसमट होते. तिने तिचे स्वत:चे आयुष्य जगावे तरी कधी? ती कधी मुक्तपणे जगूच शकत नाही. आधी आईवडील आणि नंतर नवरा व सासरची मंडळी यांचाच विचार करून ती स्वत:चे मन मारत असते.
तिच्यासाठी शिक्षणाची दारे उघडली पण तेथे तरी ती मनाप्रमाणे निर्णय घेऊ शकते का? महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तिच्यावर अनेक बंधने लादली जातात. वेळेवर घरी यायचे, त्यासाठी तिला सतत फोन करायचे. विचारपूस करणे एका दृष्टीने चांगले असले तरी त्याचा मुलीच्या मनावर काय परिणाम होतो याचा पालकांनी कधी विचार केला का? तिला सतत फोन करायचे, कोणासोबत बोलते, काय करते असे सतत विचारल्याने पालकांना माझ्यावर विश्वास नाही का, असे प्रश्न मनात निर्माण होतात व त्यातून तिचा आत्मविश्वास कमी होत जातो.


महाविद्यालयीन जीवन भरभरून जगा, असे आम्हाला नेहमी सांगितले जाते. मात्र, मुलीला ते जगता येतं का? कॉलेजमध्ये नकळत ती कोणाच्या तरी प्रेमात पडते आणि जग नवीन वाटायला लागते. जीवनाचा खरा आनंद हाच आहे, असे तिला वाटू लागते. त्याच्यासोबत आयुष्य स्वच्छंदीपणे जगावे, याचे ती स्वप्न पाहू लागते. आयुष्यातील प्रत्येक घटना, प्रत्येक क्षण ती त्याच्यासोबत जोडू लागते. तो म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व होतो. घरच्यांना कसे सांगावे, काय करावे, याबाबत त्यांचे प्लॅनिंग सुरू होते. अशातच घरच्यांना माहीत होते आणि कायमचे शिक्षणच बंद होते. घाईगडबडीत तिचे लग्न लावून दिले जाते आणि नीरसपणे तिचे आयुष्य सुरू होते. येथे तिच्या मनाचा किती विचार केला गेला पाहा. फक्त एक मुलगी म्हणून तिने तिच्यासमोर आले ते निमूटपणे स्वीकारावे, असा अलिखित नियमच दिसतो.


मुलीला कधी स्वत:चे आयुष्य जगता येणार नाही का? हा प्रश्न मी माझ्या महाविद्यालयातील मुलींना विचारला तेव्हा त्यांची उत्तरं ऐकून मला फारच आनंद झाला. ‘आम्हाला शिक्षण व नोकरी करूनही स्वत:चे निर्णय घेण्याचा अधिकार नसेल तर आम्ही पालकांना समजावून सांगूच शकतो की मुलींनादेखील जगण्याचा अधिकार आहे. हे समाजाला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. आम्ही काय बाजारातील शोभेच्या वस्तू नाही की तुम्ही आमचा भाव ठरवणार आणि लग्न करता म्हणजे आमच्यावर उपकार करत नाही, की आम्ही हुंडा द्यावा. असंच जर असेल तर आयुष्यभर आम्ही बिनालग्नाच्या राहू.’ हे विचार जेव्हा मी त्यांच्या तोंडून एकले तेव्हा हीच ती 21व्या शतकातली स्त्री जी समाजाला दिशा दाखवेल, असे विचार मनात तरळून गेले. आजची तरुणी ही अन्याय सहन करून जगणारी नाही तर कर्तृत्व सिद्ध करणारी आहे. आपल्या हक्कासाठी लढताना दुस-याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. तरुणींनी स्वत:ची शक्ती ओळखून कार्य केले तर तिच्याकडे सहानुभूतीने पाहणा-या नजरा अभिमानाने पाहतील. मुलींना दुय्यम दर्जा देण्या-या समाजाला आपले स्थान काय आहे, हे सिद्ध करून दाखवण्याची वेळ आली आहे, आणि आजची तरुणी ते करण्यात कुठेच कमी पडणार नाही हे तेवढेच सत्य.