एरवी बंद दरवाजाआड दबून राहणार्या स्त्रीजीवनाशी निगडित वैयक्तिक समस्यांची जाहीर वाच्यता करणारी दीपिका पडुकोन ही नव्या पिढीतल्या नट्यांमधली बहुदा पहिली असावी. गेल्या वर्षी, टाइम्स वृत्तसमूहाने तिच्या नकळत तिच्या स्तनांचे दर्शन घडवणारा फोटो अपलोड केला. स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याच्या या कृतीचा जाहीर निषेध नोंदवताना तिने, ‘When a woman says ‘Yes’, only then she is ready to have sex,’ अशा स्वरूपाचं विधान करून तिची भूमिका सुस्पष्ट केली. त्यानंतर कमरेखालच्या विनोदांमुळे वादग्रस्त ठरलेल्या ‘एआयबी - नॉट आउट’ शोला हजेरी लावून तिने तिची मतं काय आहेत, हे न बोलताच तिने सूचित केलं.
बहुसंख्य महिलांना अनुभवास येणार्या नैराश्याच्या समस्येवर स्वत:च्या अनुभवाच्या आधारे जाहीर चर्चा करण्याचं धाडसही तिने दाखवलं. महिलांमध्ये सहन करण्याची ताकद असलीच पाहिजे, त्यांनी सोशीकपणा अंगी बाणवलाच पाहिजे, या मानसिक शोषणाला धग देणार्या परंपराप्रिय समाजाच्या भूमिकेला छेद देणारी हीसुद्धा तिची जाणीवपूर्वक भूमिका होती. महत्त्वाचं म्हणजे, नैराश्य आलेल्या महिलांनी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन न करता धाडसाने, कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता पुढे आलं पाहिजे, असा तिचा त्या वेळचा आग्रह लपून राहिला नव्हता.
आता तीच दीपिका, ‘माय चॉइस’ नावाच्या जनजागृतीविषयक व्हिडिओमधून स्त्रीच्या शरीर-मनावरच्या हक्काबाबत बोलती झालेली आहे. तसे होताना, बाईने लग्नाआधी शरीरसंबंध ठेवावे की न ठेवावे, विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवावे की न ठेवावे, किंवा लग्न न करताच शरीरसंबंध ठेवावे की न ठेवावे, शरीरसंबंध कुणाशी ठेवावे बाईशी की पुरुषाशी, याचा निर्णय घेण्याचा तिला पूर्ण हक्क आणि अधिकार आहे, अशा स्वरूपाचा उच्चार केला आहे. तिने घेतलेल्या या भूमिकेवर अपेक्षेप्रमाणे उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. शोभा डेसारख्या प्रसिद्ध लेखिकेने दीपिका आणि फिल्मचा दिग्दर्शक होमी अदजानिया याच्यावर छद्मी टीका केली आहे. संस्कृतिरक्षक पित्याची “गुणी आणि संस्कारी’ मुलगी असलेल्या सोनाक्षी सिन्हाने sex outside marraige is not empowerment असं टाळ्याघेऊ विधान करून
आपण भावनेपेक्षा बुद्धीचा तसा कमीच वापर करतो, हे पुन्हा एकवार सिद्ध केलं आहे.
सोशल मीडियावर तर ‘हार्डकोअर’ संस्कृतिरक्षक, पुरोगामी, मुखवटा घातलेले पुरोगामी आणि कुंपणावर राहण्याचं कसब बाणवलेले यांच्यात शब्दयुद्ध चाललं आहे. इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये २ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणानुसार ७१ टक्के पुरुषांनी आणि २१ टक्के महिलांनी हा व्हिडिओ बघितलाय. ही तफावतच खूप काही सांगणारी आहे. त्यात ६२ टक्के पुरुषांनी आणि ३८ टक्के महिलांनी सकारात्मक प्रतिसाद नोंदवलाय, तर ८७ टक्के पुरुषांनी आणि १३ टक्के महिलांनी नकारात्मक. अर्थात, दीपिकाचं म्हणणं खरोखर किती जणांना समजलं हे मात्र त्यात प्रतिबिंबित झालेलं नाही. किंवा तसं सर्वेक्षण करणार्यांनीही नमूद केलेलं नाही. या प्रतिसादांची गोळाबेरीज करता असं ढोबळपणे म्हणता येतं की, हक्क अधिकारांबाबत दीपिकाचं म्हणणं योग्य आहे, पण सेक्सच्या बाबतीत तिला जे अपेक्षित आहे, ते चुकीचं आहे, असा बहुसंख्यांचा सूर आहे. त्यातही पुरुषांची याबाबतची भूमिका प्रेडिक्टेबल आहे, म्हणजे- ज्यांनी आजन्म संस्कृतीरक्षणाचा झेंडा खांद्यावर घेतला, त्यांच्या दृष्टीने दीपिका संस्कृती नष्ट करायला निघालेली स्वैराचारी ठरली आहे. अर्थात, काहींनी दीपिकाच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे, पण त्यामागे, विचारांच्या प्रगल्भतेपेक्षा पुरुष म्हणून आपला होणार्या फायद्याचं गणित दडल्याची शंका अधिक आहे. कारण, स्वत:हूनच कुणी मुलगी, अशा प्रकारे बोल्ड अॅटिट्यूड ठेवत असेल, तर कुणा पुरुषाला ते नकोय?
आपल्या थोर-थोर संस्कृती-परंपरेनुसार स्त्रीचा स्वत:वर कोणताच हक्क वा अधिकार असता कामा नये. तो ठरवण्याचा परंपरागत हक्क पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचा. वंशवृद्धीसाठी आवश्यक वीर्य स्त्री नव्हे पुरुष प्रसवतो. याचंच तर तो दान करत असतो. यात स्त्री ही याचक आहे. पुरुषाने दिलेल्या दानाचा सांभाळ करणं एवढंच तिचं जीवितकार्य आहे. अशा वेळी तिने फक्त जन्माला यायचं, पण या जन्मात तिने काय -काय करायचं, याचा निर्णय समाजाने घ्यायचा, तिने नव्हे. या समाजसंमत गृहीतकाच्या “माय चॉइस’ व्हिडिओ ठिकर्या उडवतोय. स्त्रीच्या शरीर-मनाची मालकी पुरुषप्रधान समाजाकडे नाही, तिच्या स्वत:कडे आहे. असायला हवी. हेच इथे निर्मात्यांनी ठसठशीतपणे सांगितलं आहे. या परिप्रेक्ष्यातून बघितलं तर शरीरसंबंधांबाबतची तिची विधानं समजून घेता येतात. पण तशी न घेता, दीपिका उच्छृंखल आहे, उथळ आहे, असा सरसकट निष्कर्ष काढता येतो.
शरीरसंबंध ही वैयक्तिक बाब खरी, पण शरीरसंबंध कुणाशी असायला हवा, कधी असायला हवा, याचा निर्णय बायका नव्हे पुरुषच घेत असतात, तसं त्यांना परंपरेनं स्वातंत्र्य बहाल केलेलं असतं. ही कृती पुरुषी अहंकाराचं, पुरुषी बळाचं सर्वोच्च प्रतीक मानली जाते. व्हिडिओमधून या प्रतीकावरच हिमतीने घाव घालण्यात आला आहे. तसे करताना, स्त्रीवरच्या हक्क-अधिकाराची मालकी नेमकी कुणाची आहे, हेसुद्धा निर्मात्यांना अधोरेखित करायचं आहे. यात स्वत: दीपिकाने असं चुकूनही इंडिकेट केलेलं नाही की, ती शरीरसंबंधांच्या बाबतीत अशीच वागत आलीय किंवा वागत राहणार आहे. आणि तिने असंही सुचवलेलं नाही की, समाजबिमाज गेला खड्ड्यात. वाटलं, तर लग्न न करता बिनधास्त शरीरसंबंध ठेवा किंवा विवाहबाह्य संबंध ठेवा. परंतु शांतपणे विचार केला, तर यातली प्रतिकात्मकता आपल्या ध्यानात येते. हेही ध्यानात येतं की, केवळ स्त्रीच्या शरीर-मनावरच्या मालकीसंदर्भातली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही टोकाची आणि धोक्याची प्रतिकात्मकता जाणूनबुजून पुन:पुन्हा वापरणे एका पातळीवर गरजेसुद्धा आहे.
दीपांकर, मुंबई