आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवा...शिवा...शिवा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉलेजचा दादा असलेल्या जे. डी.ने (जे. डी. चक्रवर्ती)आशाची (अमला) विनाकारण छेड काढलेली असते. कॉलेज कॅम्पसमधल्या सायकल स्टँडजवळ हस्तकांसह हॉकी स्टिक्स घेऊन तो उभा असतो. शिवा (नागार्जुन) आणि त्याची मैत्रीण आशा (अमला) तिथं पोहोचतात. जे. डी. आणि शिवामध्ये बाचाबाची होते. संतापलेला शिवा जेडीला जोरदार धक्का मारतो. तसा जेडी सायकल स्टँडवर उभ्या सायकलींवर पडतो. जेडीचे गुंड मित्र पुढे सरसावतात, तेवढ्यात शिवा आडव्या पडलेल्या सायकलच्या चेनला हात घालतो. खाटकन् ती सायकलचेन तोडून हातात घेऊन जेडीचा नव्याने पाठलाग करू लागतो. कॉलेजचं मैदान, कँटीन, मग कॉरिडोर, पीरियड सुरू असलेली क्लासरूम असा तब्बल दोनेक मिनिटं हा वेगवान सीन सुरू असतो. स्टेडीकॅम त्याच वेगाने जिवाच्या भीतीने पळणारा जेडी आणि त्वेषाने पेटून उठलेल्या शिवाला टिपत असतो. त्या क्षणी जेडी शिवाच्या हाताला लागला तर त्याची काय गत होईल, या विचाराने प्रेक्षकही हबकून गेलेला असतो… हिंदी चित्रपटांना सरावलेल्या प्रेक्षकांनी आजवर पाठलागाची अनेक दृश्यं बघितलेली असतात, पण हृदयाची धडधड वाढवणारं रिअल टाइम वाटावं, असं दृश्यं त्याने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं...आणि हाताला सायकलचेन गुंडाळणारा नागार्जुन किंवा हाताच्या मुठीत घट्ट धरलेली सायकलचेन त्या वेळी बंडखोरीचं प्रतीक बनली होती.
तोवर माफिया डॉन असलेल्या भवानीचं (रघुवरन) नाव अनेकांच्या तोंडी आलेलं असतं. पण कोण हा भवानी? कसा दिसतो? कसा बोलतो? काहीच पत्ता नसतो… पडद्यावर ब्लॅकआऊट होतो…आपण बेसावध असताना कुणीतरी सर्रकन अंगावर ओरखडा ओढावा, तशी आगपेटीवर काडी ओढली जाते. पेटत्या काडीच्या काजळलेल्या प्रकाशात सूडभावनेने पेटलेल्या भवानीचा चेहराच तेवढा दृश्यमान होतो…सिग्रेटच्या धुराने वेढलेल्या त्याच्या चेहर्‍यावर असतात, केवळ खुनशी भाव आणि दादागिरीचा माज. दीर्घ पॉझ घेऊन ‘फिल्मी’ डायलॉगबाजी न करता, शिवा…शिवा…शिवा…या तीन शब्दांतून तो आपलं खलनायकपण प्रेक्षकांवर ठसवतो…रात्रीचा शो बघून एकट्यानेच घरी परतणार्‍या शिवाच्या मित्राचा जेडीचे गुंड पाठलाग करत असतात. भिंतीवर पडणार्‍या गुंडांच्या लांबसडक सावल्यांतून भीषणता अधोरेखित होत जाते. स्वत:चा बचाव करण्यासाठी म्हणून शिवाचा मित्र पळत सुटतो, आणि एका क्षणी धाडकन दिव्याच्या खांबावर आदळतो. त्याचं ते आदळणं प्रेक्षकांच्या हृदयातही कळ उठवून जातं…या आणि अशा कितीतरी प्रसंगांतून पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत शिवा प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत जातो. तसं बघता, शिवा ही राजकारणी आणि गुंडांनी व्यापलेल्या व्यवस्थेविरोधात पेटून उठलेल्या कॉलेजगोइंग तरुणांची साधीसरळ गोष्ट होती.

या गोष्टीत नायक-नायिका-खलनायक-राजकारणी असा नेहमीच्याच व्यक्तिरेखांचा भरणा होता. संघर्षाची बरीचशी परिचित वळणं होती. पण हीच साधीसरळ गोष्ट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा नावीन्यपूर्णरीत्या सांगत गेला. ते करताना तो शॉट टेकिंगपासून एडिटिंगपर्यंतच्या सिनेतंत्राचा सर्व प्रचलित नियम तोडून वापर करत सिनेमाचा आशय अधिकाधिक गडद करत गेला. तोपर्यंत नायक-नायिका आणि खलनायकाची हिंदी चित्रपटसृष्टीची स्वत:ची म्हणून एक चौकट होती. त्या चौकटीत नायक म्हणजे चॉकलेटी चेहर्‍याचा, आज्ञाधारक, झाडाभोवती प्रेमगीतं गाणारा, ऊठसूट नाचणारा, भावुक होत अश्रू ढाळणारा, विनोद करण्यात भूषण मानणारा असा होता. अंकुश, अर्जुन, अर्धसत्य, कालचक्र या काही मोजक्या सिनेमांत चौकटीबाहेरचा नायक-खलनायक प्रेक्षकांना बघायला मिळाला होता, परंतु ‘स्टोरीटेलिंग’चं तंत्र जुन्याच पठडीतलं असल्यामुळे सादरीकरणात फारसं वेगळंपण दिसत नव्हतं. पण शिवाचा नायक ‘इंट्रोव्हर्ट’ आणि आणि प्रसंगी ‘व्हायोलंट’ वृत्तीचा होता. पडद्यावर संवादबाजीपेक्षाही त्याचे ‘इंटेन्स’ डोळेच पुढे घडणार्‍या प्रसंगांची कल्पना देत होते. नायक असूनही तो माणसाची पातळी सोडणारा नव्हता. त्याच्या हालचालीत, त्याच्या हाणामारीत लार्जर दॅन लाइफ असं काहीही नव्हतं. होता तो, मेंदूला झिणझिण्या आणणारा रिअ‍ॅलिझम.

‘शिवा’चा नायक जितका अबोल होता, तितका ‘शिवा’चा खलनायक मितभाषी. किंबहुना, त्याचं भवानी हे नावही खलनायकाला न शोभणारं, काहीसं स्त्रीधर्मी म्हणता येईल, असं होतं. त्याचा खर्जातला आवाज भीतिदायक होता. त्याचं बोलणं तुटक, बरंचसं तोंडातल्या तोंडात बोलल्यासारखं होतं. त्याच्या वाट्याला आलेला एकही डायलॉग टाळ्या-शिट्या घेणारा नव्हता. मनातली सूडभावना तो केवळ डोळे आणि चेहर्‍यावरच्या हावभावावरून व्यक्त करत होता. तीच गोष्ट भवानीचा राइटहँड असलेल्या ‘नानाजी’ची होती. हा नानाजी तर थेट कुणा टोळीतून उचलल्यासारखा भासत होता. तोवर हिंदी सिनेमाचा नायक-नायिका आणि खलनायक आदींच्या व्यक्त होण्याची पातळी ‘लाऊड’ स्तराचीच होती. तो व्यक्तिरेखांना पेश करण्याचा प्रचलित नियम दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं मोडीत काढला होता. संवादभाषेपेक्षा ‘शिवा’ची दृश्यभाषा अधिक प्रभावी होती. गोष्टीला प्रवाहीपण देण्यासाठी जम्पकट, शार्पकट हे एडिटिंगचं तंत्र त्याने जाणीवपूर्वक वापरलं होतं. हिंदी असो, पुढारलेला तामिळ-तेलुगू-मल्याळम सिनेमा असो; ट्रॉलीशॉट अनेक सिनेमांत दिसले होते. अगदी एरिअल शॉटचंही कुणाला फारसं अप्रूप राहिलं नव्हतं, पण तोवर एकाही सिनेमात स्टेडीकॅमचा वापर झालेला नव्हता. चेन्नईच्या स्टुडिओमध्ये परदेशातून आयात केलेले स्टेडिकॅम धूळ खात पडून होते. वर्माने या तंत्राचा वापर करून वास्तवाचा परिणामकारक आभास साधला होता. वर्माने केलेला प्रयोग यशस्वी झालाय, बघून तेव्हा एकाच वेळी १०-१२ स्टेडीकॅम भारतात मागवले गेले होते. वर्माने शिवाची गोष्ट पात्रांच्या संवादांपेक्षाही चित्र आणि तंत्राच्या साहाय्याने अधिक सांगितली होती. किंबहुना, हाच ‘शिवा’चा युनिक सेलिंग पॉइंटही ठरला होता.

भीती, हिंसा, प्रेम, रितेपण, दु:ख आदी भावना व्यक्त करणारं शिवाचं पार्श्वसंगीत कथेला उठाव देणारं होतं, प्रत्येक दृश्याला पूरक असं होतं. परंतु इलय्या राजासारखा दिग्गज संगीतकार असूनही गाणी फारशी ओठी रुळणारी नव्हती. शिवाच्या संघर्षमय गोष्टीत गाणी अडथळा ठरत होती. केवळ व्यावसायिक अपरिहार्यता हेच सिनेमात गाणी असण्याचं एकमेव कारण होतं. सादरीकरणात सगळ्याच बाबतीत बंडखोरी करणार्‍या वर्माला सिनेमात गाणेविरहित सिनेमा करण्याचं धाडस मात्र झालं नव्हतं. कैक वर्षांनंतर ते धाडस त्यानं मनोज वाजपेयी-ऊर्मिला मातोंडकर अभिनीत ‘कौन’ नावाच्या सिनेमात दाखवलं होतं. वर्मानं फिल्ममेकिंगचे सगळे नियम तोडले, असं जाहीर कौतुक जाणकार-समीक्षकांनी शिवाच्या वेळी केलं होतं. त्यावर, तुम्ही म्हणता मी नियम तोडले; मला तर मेकिंगचा एकही नियम ठाऊक नव्हता, असं तेव्हा निर्मितीचा शू्न्य अनुभव असलेल्या रामगोपाल वर्माचं प्रांजळ उत्तर होतं.

आज पंचवीस वर्षांनंतरही रामगोपाल वर्मा हिंदी-तेलुगू चित्रपटसृष्टीत नाव राखून आहे. नागार्जुन, अमला आदी कलावंतांसोबत हैदराबादला ‘शिवा’ची पंचविशी साजरी करताना वर्माच्या चेहर्‍यावर अनोखं समाधान झळकल्याचं अनेकांनी बघितलंय. पण, २५ वर्षांपूर्वीचा आणि आताचा रामगोपाल वर्मा यात जमीन-अस्मानाचं अंतर पडलंय. ‘शिवा’मध्ये तंत्र आणि आशयाचा अचूक मेळ साधणारा वर्मा आशय हरवून बसलाय. अलीकडेच त्याचा शिवाचा नवा अवतार येऊन गेला. सपशेल फसला. त्याने सिनेमा बनवण्याचा कारखाना उघडलाय. त्यात आता केवळ तंत्र आणि तंत्र एवढंच उरलंय. व्यवस्थेविरोधातली त्या वेळच्या शिवाच्या हृदयातली धग तरी आता किती तरुणांत दिसतेय?