आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींच्या शोधात... ३६५दिवस!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणी ही नरेंद्र मोदींची पहिली ओळख. ते जबर महत्त्वाकांक्षी आहेत.आक्रमक आहेत. त्यांच्यात दूरदृष्टी आहे. ते वर्कोहोलिक आहेत. ते टास्कमास्टर आहेत. मुख्य म्हणजे, विरोधकांना आणि स्वपक्षातल्या विरोधकांनाही धाकात ठेवणारा त्यांच्यासारखा दुसरा करारी नेता नाही. कामचुकार, पक्षपाती आणि भ्रष्टाचारी नोकरशहांचे ते कर्दनकाळ आहेत.

उद्योगपतींचे डार्लिंग आहेत. इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये परंपरांना फाटा देत नवे यम-नियम रचण्याची धमक असलेला त्यांच्या ताकदीचा दुसरा राजकीय नेता नाही. हे सगळं-सगळं कुणाला अमान्य होण्याचं कारण नाही. सध्याच्या परिस्थितीत तशी कुणाची बिशाद दिसत नाही. पण भारताच्या आजवरच्या या शक्तिमान पंतप्रधानांचं राजकारणापलीकडे जग आहे की नाही? प्रशासनावर जरब असलेल्या या पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्त्वाला ‘सॉफ्ट’ बाजू आहे की नाही? प्रश्न तातडीचा नसला तरीही महत्त्वाचा नक्कीच आहे…

एखादी कविता, एखादी कथा, एखादी कादंबरी, एखादा सिनेमा, एखादं नाटक, एखादं शिल्प, एखादं चित्र त्यांच्या मनाला स्पर्शून जातं की नाही? ‘चाय पे चर्चा’ ढिगानं झाल्या. पण कुणा लेखक-कवी-नाटककार-पटकथाकारासोबत क्रिएटिव्ह पातळीवरती चर्चा करण्याची उबळ त्यांना येते की नाही? शास्त्रीय संगीत-लोकसंगीत-चित्रपट संगीत त्यांच्या अतिश्रमाने क्लांत होत असलेल्या मनाला मोरपिशी स्पर्श देऊन जातं की नाही? प्रश्न तातडीचा नसला तरीही महत्त्वाचा नक्कीच आहे…

पण यापैकी कशाचाही थांग, आजचा दिवस धरून काटेकोरपणे सांगायचं तर गेल्या ३६३ दिवसांत आम जनतेला लागलेला नाही. जगावर स्वारी करायला निघालेल्या आपल्या ‘मॅचो’ नेत्याचं मन एखाद्या कलाकृतीने भरून येतं की नाही, याचा अंदाज विरोधकांना सोडाच, सत्ताधारी आणि त्यांच्या गावोगावच्या समर्थकांना आलेला नाही. म्हणूनच प्रश्न तातडीचा नसला तरीही महत्त्वाचा नक्कीच आहे…

तसं पाहता, दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे १२ महिने आपले पंतप्रधान या ना त्या माध्यमातून जनतेपुढे येताहेत. जगज्जेत्याच्या विविधांगी प्रतिमा जनतेच्या मनावर ठसवताहेत. त्यासाठी दुखभरे दिन बीत रे भैया…अब सुख आयो रें…असं फिल्मी गाणं ओठांवर आणताहेत. जपान, मंगोलियाच्या दौर्‍यावर असताना पारंपरिक वाद्यांवर ठेका धरताहेत, पण प्रत्यक्षात त्यांच्या जगण्यात गाण्याला, सुरांना आणि तालाला काही जागा आहे की नाही? प्रश्न तातडीचा नसला तरीही महत्त्वाचा नक्कीच आहे…

आपले पंतप्रधान कविमनाचे आहेत, असं गुजराती जनता सांगते. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे कर्तेधर्ते असलेले पद्मश्री पुरस्कारप्राप्त साहित्यिक तारक मेहता पंतप्रधानांचे घनिष्ठ मित्र असल्याचे गुजराती पत्रकार सांगतात.
लेखक-समीक्षक आकार पटेल म्हणतात, त्यांच्या कविता साधारण दर्जाच्या असल्या तरीही त्यांचं मन बहुधा कवीचं आहे. पण आता ते मनही जाणवत नाही आणि त्यांनी केलेल्या कविताही ऐकायला येत नाहीत…म्हणूनच प्रश्न तातडीचा नसला तरीही महत्त्वाचा नक्कीच आहे…

देशाचा वायुवेगाने विकास घडवायचा, देशाला प्रगतिपथावर न्यायचं, देशाची सदान््कदा काळजी करायची म्हणजे, राजकारण एके राजकारण, डावपेच एके डावपेच एवढंच उरतं का? तसं ते प्रत्यक्षात असावंही. कारण, गझलनवाज गुलाम अली खाँसाहेबांना भेटल्यानंतर फॉर्मल ट्विटर रिलीजपलीकडे पंतप्रधान त्यांच्याशी काही बोलल्याचं जनतेपर्यंत पोहोचलं नाही. भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केल्यानंतर अधिकृत भाषणापलीकडे त्यांच्यात आणि नेमाडेंमध्ये झालेल्या साहित्यविषयक चर्चेचा अंश कुठे डोकावला नाही. म्हणूनच प्रश्न तातडीचा नसला तरीही महत्त्वाचा नक्कीच आहे...

पण हे सगळं कदाचित सर्वशक्तिमान कणखर नि कडव्या नेत्याच्या प्रतिमेला शोभणारं नसावं, विकासपुरुष या व्याख्येत न बसणारं असावं. किमान त्यांच्या मीडिया मॅनेजर्सना तरी तसंच वाटत असावं…म्हणूनच प्रश्न तातडीचा नसला तरीही महत्त्वाचा नक्कीच आहे.

‘मी एकही दिवस रजा घेतलेली नाही. सुटी घेऊन एकाही क्षणाची मौजमजा केलेली नाही. देशात, विदेशात एअरपोर्टवरून ‘बिझनेस फर्स्ट’ म्हणत मी थेट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सभा-संमेलन-बैठकांत प्रकट झालो. हेक्टिक शेड्यूल संपवून भारतात परतल्या परतल्या क्षणाचीही उसंत न घेता मी मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्या...’ हे सगळं थोरच आहे; पण ते मानवाचं नव्हे, यंत्रमानवाचं लक्षण आहे. शिक्षक दिनानिमित्त मुलांमध्ये रमणं, दक्षिण कोरियात गेल्यावर छोट्या बाळाला कडेवर घेणं चांगलंच आहे, पण राजकीय हिशेब न मांडता साहित्य-संस्कृती आणि कलेत रस घेणं, त्यावर वेळोवेळी
आपला अभिप्राय नोंदवणं त्याहून महत्त्वाचं आहे. उद्योग-धंदेवाल्यांचा देश ही प्रतिमा चांगलीच आहे, पण आस्वादक पंतप्रधानांचा देश ही प्रतिमा त्याहून उत्तुंग आहे… म्हणूनच हा प्रश्न तातडीचा नसला तरीही महत्त्वाचा नक्कीच आहे…
बातम्या आणखी आहेत...