आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipankar Article On Marathi Cinema And Multiplex

खा, प्या, 'जिवाचा सिनेमा' करा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा हे मनोरंजनाचे माध्यम असले तरीही, ही रंजनाची प्रक्रिया विशिष्ट वातावरणात पार पडायला हवी, ही या माध्यमाचा स्वीकार करण्यासाठी पहिली आणि महत्त्वाची अट होती. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात देशात अवतरलेल्या मल्टिप्लेक्स संस्कृतीने मोठा आघात करून सिनेमा या कलेपुढेच आव्हान उभे केले...

फ्रान्सच्या लुइस आणि ऑगस्ट या ल्युमिए बंधूंनी पॅरिस येथे (२८ डिसेंबर १८९५) तिकीट लावून चित्रपटाचा जगातला पहिला जाहीर शो केला आणि त्या क्षणी मानवी इतिहासातला कलानुभूतीचा नवा अध्याय सुरू झाला. तोवर नाटकांनी प्रेक्षकांपुढ्यात स्वप्नांचं नवं जग खुलं केलं होतं; पण त्याला स्थळ, काळ आणि अवकाशाच्या मर्यादा होत्या. या मर्यादा ओलांडण्याचं सामर्थ्य मॅजिक लँटर्न या तंत्राच्या आधारे विकसित झालेल्या सिनेमा कलेत दडलं होतं. त्याच सामर्थ्याच्या बळावर मिट्ट काळोखाच्या साक्षीने प्रेक्षकांच्या समूहाला वर्तमानापासून, वर्तमानातल्या चिंता-समस्यांपासून दूर नेत सिनेमाने अलौकिकतेच्या विश्वात नेलं. तेव्हापासून थिएटरमध्ये जाऊन ‘पर्सिस्टंट ऑफ व्हिजन’ या विज्ञानसूत्रावर आधारित सिनेमा बघणं हा वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवरचा ‘ट्रान्स’मध्ये नेणारा अनुभव ठरू लागला. सिनेमा बघताना डोळे आणि कान या दोन इंद्रियांच्या तादात्म्याची गरज असली तरीही, एकूणच शरीर-मनाची एकतानताही महत्त्वाची ठरू लागली. त्या एकतानतेमुळेच सिनेमा बघणे, या अनुभवाला परिपूर्णता येऊ लागली. परंतु उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे प्रसारमाध्यमं जसजशी विकसित होत गेली, तसतशी आधीची माध्यमं प्रभावहीन आणि कालबाह्य होत गेली. याचा परिणाम जसा अनुभूतीच्या स्तरावर होऊ लागला, तसाच तो कलेच्या अस्तित्वावर होऊ लागला.
भारतात ७०च्या दशकापर्यंत सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी स्थळ-काळ आणि अवकाशाला भेदून जाणारं सिनेमा हे एकमेव माध्यम उपलब्ध होतं. ७०च्या दशकात व्हीसीआरचा उदय झाला आणि त्यापाठोपाठ सिनेमा हॉलला, स्वत:च्या आवडीनिवडीनुसार स्थळाचा पर्याय उपलब्ध झाला. पण त्याहीआधी अवतरलेल्या दूरदर्शनने मोठ्या पडद्याचा अनुभव हिरावून घेण्यास प्रारंभ केला होता. दर रविवारी संध्याकाळी घरबसल्या प्रेक्षकांना सिनेमे बघायला मिळू लागले होते. तो खरं तर सिनेमाच्या स्वयंभू विश्वाला बसलेला पहिला हादरा. किंवा असंही म्हणता येईल, सिनेमा कलेवर झालेला पहिला सौम्य आघात. छोट्या पडद्याच्या टीव्हीमुळे आणि व्हीसीआरमुळे भाजी चिरता-चिरता, जेवण बनवता अथवा करता करता किंवा एका बाजूला गप्पागोष्टी करता करता किंवा पलंगावर पडल्या-पडल्याच सिनेमा बघण्याची सोय उपलब्ध झाली होती. तेव्हापासूनच रसभंग करणारा जाहिरातींचा ब्रेकही प्रेक्षकांच्या अंगवळणी पडत गेला. तीन तास एकचित्त होण्याची निकड संपली. डोळे, कान आणि शरीर-मनाची एकतानता राखण्याची गरज सरली. अनुभूतीची एकसलगता संपली. हा सिलसिला पुढे ३०-३५ वर्षं असाच सुरू राहिला. सिनेमा हॉल आणि घर अशा द्विस्तरीय सवयी प्रेक्षकांनी अंगवळणी पाडून घेतल्या होत्या. म्हणजे, थिएटरमध्ये गेल्यानंतर तीन तास पडद्याला शरण जाणेही त्याने सुरू ठेवले आणि रोजची व्यवधानं सांभाळत सिनेमे बघण्याची कसरतही त्याला जमू लागली. यात अनुभूतीचे पोत विस्कटले. एकसंधता, एकतानता भंग पावत गेली.
सिनेमा हे मनोरंजनाचे माध्यम असले तरीही, ही रंजनाची प्रक्रिया विशिष्ट वातावरणात शिस्तबद्ध, गाभीर्यपूर्वकच पार पडायला हवी, ही या माध्यमाचा स्वीकार करण्यासाठी पहिली आणि महत्त्वाची अट होती. ही अट खुंटीवर टांगण्याचे काम टीव्ही-व्हीसीआर-डीव्हीडी-होम थिएटर-टॅब-स्मार्टफोन अशा चढत्या क्रमाने झालेल्या तंत्रप्रगतीने केले. या सगळ्यावर मोठा आघात केला तो एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात देशात अवतरलेल्या मल्टिप्लेक्स संस्कृतीने. या संस्कृतीच्या मुळाशी बाजार व्यवस्थेचा दबाव आणि या व्यवस्थेमुळे रुजलेला ‘कन्झ्युमरिस्ट अॅप्रोच’ होता. खरं तर मल्टिप्लेक्स संस्कृतीचे रुजणे व्यवसायाच्या पातळीवर ‘फ्लड गेट्स’ उघडण्यासारखे होते. एकपडदा थिएटरच्या एकाधिकारशाहीला या संस्कृतीमुळे आव्हान मिळणार होते, ते एका पातळीवर योग्यही होते. कारण मल्टिप्लेक्समुळे सर्व प्रकारच्या सिनेमांना, मुख्य प्रवाहापलीकडच्या निर्माता-दिग्दर्शकांना पुरेशी स्पेस आणि संधी मिळणार होती. परंतु रुजणारी संस्कृती जशी नवनव्या संधी घेऊन येते, तशीच ती धोकेही सोबत घेऊन येते. तसेच काहीसे या मल्टिप्लेक्स संस्कृतीत घडत गेले.
म्हणजे, प्रेक्षकांना आपल्या मल्टिप्लेक्सकडे आकर्षित करताना लार्जर दॅन लाइफ अनुभव देण्यासाठी मल्टिप्लेक्सच्या मालकांनी डिझायनर्स थिएटर्स निर्माण केली, कुशनच्या गुबगुबीत खुर्च्या आणल्या, ‘कन्झुमरिस्ट’ ग्राहकांचा कल, आवडनिवड आणि सुखावणारे इगो ध्यानात घेऊन िथएटरमध्ये खाण्या-पिण्याच्या राजेशाही थाटातल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. म्हणजे, तुम्ही फक्त आमच्या मल्टिप्लेक्समध्ये या. तिकिटासोबत स्नॅक्सची कुपन्स घ्या, बाकी व्यवस्था आम्ही करतो, असा मामला तयार झाला. यामुळे एखाद्या पिकनिक स्पॉटला निघावे, अशा मानसिकतेत प्रेक्षकांची कुटुंबंच्या कुटुंबं गाड्या भरभरून मल्टिप्लेक्समध्ये येऊ लागली. िथएटरभर पॉपकॉर्नचे रिकामे कोन, कोक-पेप्सीचे ग्लास पायाशी जमा होऊ लागले. असा हा ‘जिवाचा सिनेमा’ करायला येणारा प्रेक्षक बघून, त्याच्या बुद्धीला झेपेल असे, ‘दिमाग का दही’ न करणारे सिंघम - रावडी राठोड - आर राजकुमार - दबंगसारखे जाता-येता कधीही पाहावे असे फुल टाइमपास सिनेमे बॉलीवूडच्या फॅक्टरीमधून पटापट बाहेर पडू लागले. एका बाजूला मूल हट्ट करतंय, आई-बाप त्याला पॉपकॉर्न खाऊ घालताहेत. दुसऱ्या बाजूला व्हाॅट्स-अॅप, फेसबुकवर अखंड ट्राफिक सुरूय, असं दृश्य मल्टिप्लेक्समध्ये नित्याचंच होऊ लागलं. पण हाच लक्झरींना चटावलेला प्रेक्षक ‘हैदर’, ‘लंचबॉक्स’ किंवा ‘फँड्री’, ‘कोर्ट’सारख्या गंभीर विषयांवरच्या सिनेमांचं भान सोडून पिकनिकवर आल्यासारखा चेकाळू लागला. ‘पांचसौ का टिकट खरीदा है,’ हा माज त्यांच्या देहबोलीत जाणवू लागला. इथेच सिनेमा या कलेकडे गांभीर्यपूर्वक नजरेने बघणाऱ्यांपुढे नव्याने आव्हान उभं राहिल्याचं दिसलं. रंजनाचा अलौकिकतेच्या पातळीवर जाऊन अनुभव घेण्याची आणखी एक जागा बाजारू व्यवस्थेने काबीज केली.
ज्या तंत्रज्ञानाने सिनेमाला जन्माला घातलं, त्याच तंत्रज्ञानाने कला म्हणून सिनेमाच्या अस्तित्वापुढे आव्हान उभं केलं. यात दोष खरं तर तंत्रज्ञानासोबत बौद्धिकदृष्ट्या परिपक्व न होत गेलेल्या प्रेक्षकांचा. भौतिक प्रगतीची दारे खुली करून देणारे तंत्रज्ञान हे निमित्तमात्र!