आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह मशीन उर्फ लव्हरोबो उर्फ पिरर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाला काय हवं असतं? सात पिढ्यांना पुरेल इतका पैसा? अविरत प्रसिद्धी आणि चिरंतन लोकप्रियता? समाजाभिमुख क्षेत्रात वावरणार्‍यांना हे सगळं हवं असतंच, पण सामान्य माणसाचं काय? तो हे सगळं मिळावं याचं केवळ स्वप्न पाहत असतो. पण समाजाभिमुख असो वा सर्वसामान्य; पैसा-प्रसिद्धीपेक्षा किंवा जमलंच त्यांच्या जोडीने एकजात सगळ्यांना म्हणजे, नवजात बालकापासून ९०-९५ वर्षांच्या वृद्धांपर्यंतच्या सगळ्यांना प्राधान्याने हवं असतं, ते प्रेम (लव्ह), सुरक्षितता (सिक्युरिटी) आणि स्वीकारार्हता (अ‍ॅक्सेप्टन्स). ज्ञान आणि संपत्तीच्या बळावर आर्थिक सुरक्षितता आणि स्वीकारार्हता मिळतेही, पण त्या जोडीनं कुटुंब आणि समाजाचं प्रेम मिळेलच, याची शाश्वती नसते. म्हणजे, बाकीचे सगळे मिळूनही माणसाचा सगळा झगडा हा केवळ दुसर्‍यांचं प्रेम मिळवण्यासाठी चाललेला असतो. ते मिळालं की तो आनंदी राहतो, नाही मिळालं की निराश होऊन जातो. अत्याधुनिक, अतिवेगवान आणि अतिश्रीमंती ‘लाइफस्टाइल’साठी ओळखला जाणारा जपान हा देश सध्या नैराश्य आणि त्या पाठोपाठ येणार्‍या असह्य एकटेपणाशी झुंज देताना दिसतोय. हे एकटेपण िजतकं आर्थिक-सामाजिक समस्यांतून आलेलं आहे, तितकंच जीवनात यशस्वी होण्याच्या सक्तीतूनही आलेलं आहे.

या घटकेला राजधानी टोकियोतल्या घरांमध्ये वास्तव्यास असलेल्यांची सरासरी दोनच्या खाली घसरली आहे. एकेकट्या माणसांचं दुर्लक्षित मरण, ही तर तिथली सगळ्यांत मोठी सामाजिक समस्या बनली आहे. एनएलआय रिसर्च इन्स्टिट्यूट ही जपानमधील ‘थिंक टँक’ मानली जाणारी नावाजलेली संस्था म्हणते, २०२० पर्यंत एकट्याने राहणे, हे जपानमधले अपरिहार्य पण सर्वसंमत वास्तव बनलेलं असेल. किंबहुना, भविष्यातली ही एकटेपणाची अटळ चाहूल ओळखूनच ‘मुमीन हाऊस कॅफे’ ग्राहकांना ‘अँटी-लोनलीनेस’ सुविधा पुरवू लागले आहेत. आपल्याकडे जसे पोकेमॉन, शिनचॅन या कार्टून कॅरेक्टर्सच्या प्रतिमा आणि खेळणी लोकप्रिय आहेत, तसं जपानमध्ये फिनलंडहून आयात झालेला मुमीन नावाचा ‘हिप्पो’ लोकप्रिय आहे. तुम्ही एकटे आहात आणि तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये खायचं-प्यायचं असेल, तर रेस्टॉरंटवाले रिकाम्या राहणार्‍या समोरच्या खुर्चीत भलेमोठे मुमीन आणून ठेवतात, जेणेकरून तुमचा एकटेपणा निघून जावा. गेल्या काही वर्षांत ही ‘लोनली-फ्रेंडली’ संकल्पना जपानी समाजात इतकी लोकप्रिय झालीय की, एकेकट्याने येणारे ग्राहक मुमीनसाठी रेस्टॉरंटबाहेर रांगा लावताहेत. जपानमध्ये अशा प्रकारची तीन रेस्टॉरंट सध्या सुरू आहेत. त्यातलं ‘टोिकय डोम’ हे सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे.

बलाढ्य अमेरिकेलाही एकेकाळी आव्हान देणारा जपान सध्या नैराश्यग्रस्तांचा देश म्हणून बदलौकिक मिळवून आहे. एका बाजूला बुलेट ट्रेनसारख्या अत्याधुनिक सुखसोयी या देशात उपलब्ध आहेत, मात्र दुसर्‍या बाजूला बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे या देशाचा सकल राष्ट्रीय उत्पनाचा दर ३.५ इतका रखडला आहे. सर्वसामान्य जपानी माणसाच्या आयुष्याचा मोठा काळ नोकरीचा शोध घेण्यात व्यर्थ जातोय. १८८१ नंतर जन्माला आलेली पिढी ज्याला ‘एम्प्लॉयमेंट आइसएज’ असं संबोधलं जातंय, त्या नैराश्यपर्वाशी जोडली गेली आहे. ही पिढी विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर नोकरीसाठी वणवण भटकताना दिसतेय. ज्यांना नोकरीत नकार मिळतोय, ते आपल्या घरातून बाहेर पडेनासे झालेत. लग्न, मुलबाळं, संसार, नातेवाईक हे सगळं त्यांना मोठंच संकट वाटतंय. आयुष्यात यशस्वी होत नाही आणि माणसांची सोबत परवडत नाही, अशी ही विचित्र कात्री आहे. बीबीसी न्यूजच्या मारिको ओई या महिला पत्रकाराने मार्च २०१५मध्ये लिहिलेल्या एका लेखात ८० टक्के तरुण नैराश्यग्रस्त अवस्था अनुभवत असल्याचं नमूद केलंय. या अवस्थेत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्याचा बळी देणं, ही तिथली अपरिहार्यता बनत चालली आहे. या परिस्थितीतून उद‌्भवलेलं एकटेपण जपानच्या वातावरणात भरून राहिलंय. परंतु एकटेपणा घालवण्यासाठी सगळ्यांनाच ‘मुमीन’ हवे आहेत, असेही नाहीत.

त्यामुळे अनेक एकटे लोक ‘रेंट-अ-फ्रेंड’ सुविधेचा लाभ घेताहेत. सध्या जपानमध्ये कमीत कमी १० अशा कंपन्या अस्तित्वात आहेत, ज्या एकट्या माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवताहेत. त्यातली ‘हागेमाशि ताय’ ही कंपनी, आपल्या जाहिरातीत होतकरू नट-नट्यांचा समावेश करताना दिसतेय. ज्या ग्राहकांना गरज असेल त्यांनी कंपनीकडे पैसे भरायचे, त्या बदल्यात कंपनी या पगारी नट-नट्यांना गरजेनुसार, कुणाचा काका, मामा, बहीण, मैत्रीण म्हणून पाठवू लागली आहे. सणसमारंभ-अंत्यविधी आदी प्रसंगीसुद्धा नातेवाइकांची उणीव भरून काढण्यासाठी भाड्याने माणसं पाठवली जात आहेत... अशा प्रसंगी भाडं देऊन आलेल्यांनी बोलावं, भाषण करावं, अशी एखाद्याची इच्छा असेल तर त्याचे अतिरिक्त भाडेही ठरलेले आहे. एकट्याने पोराबाळांसह राहणार्‍या बाईला तासाला ४८ डॉलर्स मोजून नवरा भाड्याने मिळण्याचीही सुविधा या घटकेला जपानमध्ये उपलब्ध आहे. याचप्रमाणे औट घटकेसाठी तुम्हाला आधार म्हणून आई आणि वडीलही भाड्याने देण्याची काही कंपन्यांची तयारी आहे.

या सगळ्यांचा साधासरळ अर्थ हा आहे की, फेसबुक-ट्विटरसारखी दिवसाचे चोवीस तास संपर्कात ठेवणारी साधनं असतानाही, आजचा जपानी समाज माणसांचा, त्यातही माणसाच्या प्रेमाचा, प्रत्यक्ष सहवासाचा प्रचंड भुकेला आहे. जपानच्या सॉफ्टबँक कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीने (गेल्याच आठवड्यात कंपनीचे सीईओ मासायोशी सोन भारतात येऊन गेले. परत जाताना सोलर एनर्जी क्षेत्रात सुनील मित्तल यांच्या भारती एंटरप्रायझेसशी सहकार्य करत येत्या दशकभरात भारतात जवळपास दोन हजार कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा वायदा करून गेले.) भाव-भावना असलेला यंत्रमानव, म्हणजेच ‘लव्हमशीन किंवा लव्हरोबो’ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करणं, हा केवळ योगायोग नाही. एका अर्थानं, हे जपानीच नव्हे तर झपाट्याने एकटेपणाकडे वाटचाल करत चाललेल्या जगभरातल्या विविध समाजसमूहांचं प्रतीक आहे. म्हणूनच हा ‘लव्हरोबो’ आज जपानमध्ये जन्माला आला असला, तरीही भविष्यात तो उर्वरित जगाची गरज बनला तर आश्चर्य नाही.

जगात सगळं काही विकत मिळतं, पण प्रेम नाही, असं आजवर आपण एकेकांच्या मनावर बिंबवत आलो होतो, पण ‘लव्हरोबो’च्या निर्मितीने प्रेमही पैसे देऊन विकत घेता येतं, हे वास्तव आपल्यावर येऊन आदळलं आहे.

लव्हमशीन : किंमत एक लाख रुपये मात्र!
जपानच्या सॉफ्टबँक नावाच्या कंपनीने भाव-भावना जपणारा यंत्रमानव बाजारात विक्रीस आणला आहे. कंपनीने या यंत्रमानवाचे नाव ‘पिपर’ उर्फ लव्हरोबो ठेवले आहे. हा दिसतो माणसासारखा, वागतो माणसासारखा आणि व्यक्तही होतो माणसासारखाच. माणूस पंचेंद्रियांच्या आधारावर क्रिया-प्रतिक्रिया, साद-प्रतिसाद ठरवत असतो, तसाच हाही यंत्रमानव करणार आहे. माणूस जसा अनोळखी माणसांसोबत थोडासा सावध, थोडासा लाजाळू असतो, तसाच हा लव्ह रोबो प्रारंभी लाजाळूपणा दाखवणार आहे. मात्र तुम्ही त्याचं कौतुक केलं, तर तो खुश होणार आहे आणि रात्री दिवे मालवल्यावर घाबराघुबराही होणार आहे. ज्याच्या सोबत तो राहणार आहे, त्याच्या भावना समजून घेऊन तो त्याच्या इच्छेनुसार वागणार-बोलणारही आहे. या लव्हरोबोच्या पुढ्यात, छातीवर एक स्क्रीन बसवलेला आहे. त्याच्या भावना या स्क्रीनवर उमटणार आहेत. माहिती पुरवल्यास त्याच्यामध्ये भावना प्रदर्शित करण्याचीही क्षमता असणार आहे. अर्थात, असं सगळं असलं तरीही, लव्हरोबोचं प्रेम केवळ पैसे देऊन उपलब्ध होणारं नाही, तर प्रत्येकाला ते प्रयासाने जिंकावं लागणार आहे. एक लाख रुपये इतकी लव्हरोबोची सध्याची बाजारातली किंमत आहे. ही किंमत ज्याला परवडेल, त्याच्या वाट्याला यंत्रमानवी प्रेम येणार आहे.

दीपांकर
divyamarathirasik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...