आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफरत तो सियासत का काम है...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुणीतरी हुकुम सिंग, कुणीतरी संगीत सोम "हिंदू धर्म खतरे में हैं'चा गगनभेदी नारा देतात. मीडिया खळबळ माजवतो. जनता भयभीत होते. पण आधुनिक विकासपर्वाचे प्रणेते माननीय पंतप्रधान हे सोडून "मन की बात' करतात, त्यांचे अत्यंत विश्वासू अध्यक्ष अमित शहा हळूच राम मंदिराची भाषा करतात, आणि मंत्रीमंडळातले इतर साजिंदे नित्याच्या पेटवापेटवीकडे बघून न बघितल्यासारखे करून आपापल्या दिशांना पांगतात...

कला आणि व्यापारउदीम या दोन गोष्टींनी माणसं जवळ येतात. त्यात अडथळा आला की, माणसं दुरावतात, दुखावतात, प्रसंगी एकमेकांचे मुडदेही पाडतात. पण हे काही आताच उमगलेलं वैश्विक सत्य नाही, हा मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीचा प्रारंभापासूनचा राजमार्ग आहे.
पण मानवी संस्कृती-उत्क्रांती गेली खड्ड्यात; कापा साल्यांना, राज्य आपलंच असलं पाहिजे, धर्म आपलाच श्रेष्ठ ठरला पाहिजे. जमत असेल तर मुकाट्याने आमच्याशी समरस व्हा, नाही तर कुत्र्याच्या मौतीला तयार राहा...

उत्तर प्रदेशातल्या कैरानात (शास्त्रीय गायकीला जन्म देणाऱ्या गावात) धार्मिक विद्वेषाचा सूत्रबद्ध वणवा पेटवला जातोय, त्यामागे नेमकी हीच तर मानसिकता आहे. कुणीतरी हुकुम सिंग, कुणीतरी संगीत सोम ‘हिंदू धर्म खतरे में हैं’चा गगनभेदी नारा देतात. मीडिया खळबळ माजवतो. जनता भयभीत होते. पण आधुनिक विकासपर्वाचे प्रणेते माननीय पंतप्रधान हे सोडून ‘मन की बात’ करतात, त्यांचे अत्यंत विश्वासू अध्यक्ष अमित शहा हळूच राममंदिराची भाषा करतात, आणि मंत्रीमंडळातले इतर साजिंदे नित्याच्या पेटवापेटवीकडे बघून न बघितल्यासारखे करून आपापल्या दिशांना पांगतात. बुलेट ट्रेन येतेय ना भारतात, हंड्रेड पर्सेंट एफडीआयला परमिशन मिळालीय ना, मग गप्प बसा. नरडं खरवडू नका. दोन-पाच माणसं मेली तर तुमच्या बापाचं काय जातंय! भक्तगण ट्विटर-फेसबुकवर दम देतात.

ज्या गावात अब्दुल करीम खाँसाहेबांच्या छत्रछायेखाली किराणा घराण्याची गायनकला फुलली, त्यातून पुढे देश-प्रदेशाच्या सीमा ओलांडून हिंदुस्थानी आणि पाकिस्तानी खयाल घराणी बहरत गेली. भारतरत्न पं. भीमसेन जोशींपासून उ. राशिद खानांपर्यंत आणि गंगुबाई हनगलांपासून हिराबाई बडोदेकर-प्रभा अत्रे पर्यंतचे दिग्गज संगीतविश्वात तेजाने चमचमले, त्या शास्त्रीय गायकीचा प्रेमभराने सांभाळ करणाऱ्या कैराना गावात आता जातीयवाद्यांनी यथासांग प्रयोगशाळा मांडली आहे. त्या प्रयोगशाळेत रोज नवनवे सुडाचे प्रयोग होताहेत. म्हणजे, एकेकाळी गुजरातमध्ये स्थापन झालेल्या प्रयोगशाळेच्या शाखांचा निवडणुकांच्या वेळा साधून आता जोमानं विस्तार होतोय. या सगळ्याला सध्याचं कैरानातलं वातावरणही पोषकच आहे, कारण खुद्द कैरानात शास्त्रीय गायकीच्या परंपरेचे भान आणि ज्ञान असलेले फार थोडे राहिलेत. पण हे हुकुम सिंग, हे संगीत सोम, हे गिरीराज सिंग, हे प्रवीण तोगाडिया, हे योगी आदित्यनाथ, हे ओवैसी, हे आझमखान कधी गाणं-बिणं ऐकतात की नाही? म्हणजे, किराना घराण्याचं अति-विलंबित बढत असलेलं, समाधिस्थ गायक-गायिकेच्या गळ्यातून उतरलेलं अगदी हार्डकोअर शास्त्रीय नव्हे; हलकंफुलकं, मेहदी हसन किंवा गुलाम अली यांचं? एखादं ‘रंजिश ही सही’ टाइपचं? यूट्यूबवर ते एेकून सीमेपलीकडचा, कुणाच्याही खिजगणतीत नसलेला मोहम्मद अली खान नावाचा कदरदान म्हणतो, मेहदी हसन इज प्रोबाबली दी टॉप सक्सेसफुल सिंगर ऑफ साऊथ एशिया इन मेकिंग यूज ऑफ एन्शंट शास्त्रीय संगीत फॉर लाइट गजल्स. त्यावर हसनत शाह नावाचा दुसरा बिनचेहऱ्याचा गृहस्थ उत्तरतो, आय एम व्हेरी हॅपी अॅण्ड फिलिंग प्राऊड आफ्टर सी दॅट ऑलमोस्ट ऑल इंडियन लाइक अँड कॉमेंट ऑन धिस गजल, अहमद फराजसाब फ्रॉम पाकिस्तान, मेहदीसाब फ्रॉम पाकिस्तान, बट इन्होंने अपने लोगों के साथ इंडियन लोगों के दिलों मे भी घर किया, अल्लाह इतनी इज्जत भी किसी किसी को देता है. वुई ऑल लव्ह यू डिअर इंडियन...

त्यावर सौरभ श्रीवास्तव नावाचा सीमेच्या अलीकडचा रसिक लिहितो, हसनतभाई लव्ह यू... इन्सान तो मोहब्बत करता है, नफरत तो सियासत का काम है, मोहब्बत खुदा की नेमत है, एक शेर है... अल्लाह बरकतों से नवाजेगा इश्क में, हो जितनी पुंजी लगा देनी चाहिए...

पुढे संदीप उन्नियाल, पूजा सिंग, अचिंत्य सेन, वाजिऊद्दीन, सुजाता, निलेश शहा, कुंवर नरेंद्र सिंग सोलंकी, प्रणव कोडियाल, रिषी व्यास, अम्मान हुसेन, हेमंत दीक्षित... असे सीमेच्या अलीकडचे- पलीकडचे भावव्याकूळ होत व्यक्त होतात... त्यातली सुजाता, ‘हसनत शाहजी व्हेरी व्हेरी थँक यू फॉर युवर लव्ह’ असे म्हणते, त्यातला रमण्णा सिलम, ‘हसनत भाई थँक्यू... वुई टू लव्ह दी म्युझिक ऑफ पाकिस्तान’ असं रिअॅक्ट करतो. अर्थातच हा एक नमुना.

पण कोण हा हसनत, कोण ही सुजाता आणि कोण हा रमण्णा... पण सगळे एकजात माणुसकीची, प्रेमाची भाषा बोलतात. त्यांना जोडतं कोण? मेहदी हसन. तो कुठला, पाकिस्तानचा. त्याच्या गायकीचं मूळ कशात शास्त्रीय गायकीत... पतियाला घराण्यापासून कैरानापर्यंत पाळंमुळं पसरलेल्या.

सध्या याच कैरानात जोमाने जातीय प्रयोग चाललेत. हुकुम सिंग आणि मंडळींचा तर प्रश्नच नाही. त्यांचं जॉब प्रोफाइलच त्या स्वरूपाचं आहे. पण आक्रस्ताळी हिंदूधर्माभिमान्यांचा विरोध डावलून गुलाम अली खाँसाहेबांना वाराणसीत आणणाऱ्या व्यवहारचतुर आणि व्यापाराचा अचूक सेन्स असलेल्या पंतप्रधानांचं काय? ऐन मोक्याच्या क्षणी ते का गप्प आहेत? किंवा राहतात? अनुचित प्रसंग रोखू नये; घडू द्यावा, असं राजकीय लाभ देणारं तंत्र सांगतं; पण ते त्यांना माणूस आणि माणुसकीपेक्षा का अधिक प्रिय होत चाललंय? बहुधा ते गप्प नाहीत. ते सुपरबिझी आहेत. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. एक सेकंदही देशकार्य थांबवलेलं नाही.

पण धर्मसेवा-देशसेवा करणाऱ्या इतर भक्तांना गाणं ऐकणं-बघणं वर्ज्य असतं कदाचित. त्याने आपल्यात माणुसकी जागी होईल, विद्वेषाची जागा प्रेमभाव घेईल, याची त्यांना आणि विकासाची बात करणाऱ्या त्यांच्या राजकीय गुरूंना कायम भीती असते, अनेकदा.

एरवी, विचार केला की प्रश्न पडतात आणि प्रश्न पडले की विचार सुरू होतात. पण विचार करण्याची स्पेसच मिळू न देण्याचा कट राजकारण्यांच्या-सत्ताधाऱ्यांच्या पातळीवर दररोज रचला जातो. रोज नव्या घोषणा. रोज नवे वाद. रोज नव्या धमक्या. रोज नवे खुलासे. आलटून-पालटून खेळ सुरूच आहे. या खेळात किराना घराण्याच्या गायकीलाही काही किंमत नाही. कलेतून साधणाऱ्या सौहार्दालाही महत्त्व नाही. माणुसकीचा तर इथे कुठे प्रश्नच दिसत नाही...
(divyamarathirasik@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...