आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिप्लोमा करिअरसाठी वेगळा पर्याय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता पदवी अभ्यासक्रमाचे विविध पर्याय आपण गेल्या तीन लेखांमध्ये पाहिले आहेत. पण अनेकदा बारावी केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे पदवी कोर्समध्ये तीन वर्षे खर्च न करता अल्प कालावधीचे पदविका कोर्सेस करण्यात जास्त रस असतो. तसेच बारावी नापास झालेले विद्यार्थीही असे विविध पदविका कोर्सेस करू शकतात. असे कोर्स सरकारमान्य संस्थेतून केल्यास भविष्यात अडचणी येत नाहीत. पण पदवी (डिग्री) मिळवणे हे आपला बायोडेटा चांगला करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. डिप्लोमा कोर्स करत असताना मुक्त विद्यापीठाच्या मार्फत करस्पॉडन्स पद्धतीने एखाद्या विषयात पदवीही मिळवता येऊ शकते किंवा अशा विद्यापीठातून डिप्लोमाही करता येतो. मुक्त विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या विषयांचे, आवडीचे अभ्यासक्रम असतात. खाली महाराष्ट्रातील काही संस्थांची माहिती देण्यात आली आहे.
नागपूरच्या जी. एच. रायसोनी पॉलिटेक्निकमध्ये विविध विषयांवर 14 डिप्लोमा कोर्सेस आहेत. यात काही कोर्सेसमध्ये प्रवेश पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. हे कोर्सेस बारावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही करिअरच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकतात.


महाराष्‍ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनशी (एमएसबीटीई) संलग्न असलेल्या संस्थेत विविध कालावधीचे फुलटाइम, पार्टटाइम टेक्निकल डिप्लोमा कोर्सेस आहेत. याशिवाय सायन्स शाखेतून बारावी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांकरिता डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशन आणि डिप्लोमा इन डेंटल टेक्नॉलॉजी हे प्रत्येकी दोन वर्षांचे कोर्सेस आहेत. डिप्लोमा इन डेंटल टेक्नॉलॉजी हा कोर्स नांदेड, वर्धा, लातूर, कोल्हापूर, चंद्रपूर, परभणी, अमरावती आणि मुंबईत आहे आणि डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशन नांदेड आणि रत्नागिरी येथे आहे. एम एसबीटीइशी निगडित संस्थेची आणि त्यांच्या टेक्निकल डिप्लोमा कोर्सेसची माहिती त्यांच्या http://msbte.com
या संकेतस्थळावर मिळेल.


एमएसबीटीइशी संलग्न असलेला गव्हर्नमेंट डिप्लोमा इन इंटेरिअर डिझायनिंग अँड डेकोरेशन हा गरोडिया स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज (जीएसपीएस) या संस्थेद्वारा चालवण्यात येतो. या कोर्समध्ये प्रवेश पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. हा कोर्स केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढे पदवी कोर्स करायची इच्छा असेल त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या प्रथम वर्षात प्रवेश तर मिळूच शकतो, पण गव्हर्नमेंट डिप्लोमा कोर्स केल्यामुळे ते काही ठरावीक विषय टाळू शकतात. ही सवलत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला मिळत नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा कोर्स मुंबईच्या रिझवी कॉलेजमध्ये पार्टटाइम चालवण्यात येतो. इतर ठिकाणी नसल्यास विद्यार्थी विद्यापीठातून हा कोर्स पत्रव्यव्हाराद्वारेही करू शकतात.


विज्ञान विद्याशाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता
* सर्टिफिकेट इन ऑर्गेनिक र्फामिंग : सहा महिन्यांचा हा कोर्स पुण्यातील विद्या प्रतिष्ठान स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी या संस्थेत चालवण्यात येतो.
* सर्टिफिकेट कोर्स इन प्लँट टिश्यू कल्चर : 1 वर्षाचा फुलटाइम कोर्स पुण्यातल्या आवटे कॉलेजद्वारा चालवण्यात येतो.
* डिप्लोमा इन मेडिकल रेडिओग्राफी टेक्नॉलॉजी (एक्स-रे) अँड ईसीजी : एक वर्षाचा पदविका कोर्स छत्रपती शिवाजी मेडिकल कॉलेज ऑफ योग अँड नॅचरोपॅथीमध्ये उपलब्ध आहे.
* डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री टेक्नॉलॉजी : हा दोन वर्षांचा कोर्स राज्यात अनेक शहरांत उपलब्ध आहे. इग्नूद्वारे आपण हा कोर्स करू शकता.
* डिप्लोमा इन डेंटल हायजीन : हा कोर्स दोन वर्षांचा असून तो दहावीनंतरही करता येतो. पुणे आणि अहमदनगरच्या महाविद्यालयांत उपलब्ध आहे.
वाणिज्य- कला शाखेतून 12वी उत्तीर्ण झालेल्यांकरिता पदविका कोर्स
* डिप्लोमा इन कॉमर्स : एक वर्षाचा हा कोर्स उत्तर प्रदेश आणि पंजाब विद्यापीठात उपलब्ध आहे.
* डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट : एक वर्षाचा हा कोर्स महाराष्‍ट्रात बहुतेक ठिकाणी आहे.
*डिप्लोमा इन लेबर लॉ : हा एक वर्षाचा कोर्स महाराष्‍ट्रात उपलब्ध.
* डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट : नॅशनल अकॅडमी ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट, नागपूर आणि मुंबईतील काही संस्थेत उपलब्ध आहे.
* डिप्लोमा इन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट : हा दोन वर्षांचा कोर्स मुंबई आणि पुण्यातल्या महाविद्यालयांत उपलब्ध आहे.
याशिवाय असेही अनेक कोर्सेस आहेत, जे ठरावीक महाविद्यालयांमध्ये चालवले जातात. याची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या शहरातील महाविद्यालयांत जाऊन घ्यावी.


डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (डीएमएलटी) : हा दोन वर्षांचा इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी (आय इग्नू) शी संलग्न असलेला हा कोर्स महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी आहे. तो ओरिसा, आंध्र प्रदेश आणि दिल्लीच्या महाविद्यालयांत उपलब्ध आहे.
डिप्लोमा इन फार्मसी (डी फार्मा) : दोन वर्षांचा हा कोर्स कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, उस्मानाबाद, हवेली, बीड, वर्धा, पुणे इतर ठिकाणी उपलब्ध आहे.
डिप्लोमा इन बँकिंग किंवा डिप्लोमा इन बँकिंग मॅनेजमेंट : एक वर्षाचा हा कोर्स पुणे, सांगली आणि इतर ठिकाणी उपलब्ध आहे.